उसळणाऱ्या लाटांमध्ये उसासलेला श्वास
खळाळत क्षितिजाला भिडणारा आभास,
शब्द फुटत नाहीत, फक्त गुदमरतो वारा,
तरी अमर्याद अथांगतेचा जल्लोष सारा
खोल तळाशी शांतीचे आभाळ
नितळ, नितळ, की ढगाळ ढगाळ ?
चांदणं कधी तरंगतं वर, कधी डोकावतं आत,
गूढ गहिरं उलगडत जातं नि:शब्द डोहात
मग होतो त्या डोहाचा एक थेंब,
त्या लाटांचा एक तुषार,
तुझ्या हातातल्या बाटलीत भरलेला
साऱ्या सागराला बंदिस्त करून घेत
असीम अनंताला सीमांचा अर्थ शिकवत
तुझ्या नजरेत, काचेत कोंडलेल्या
तुझ्या भावनांचा आरसा
पण बाटलीत समुद्र कधी थांबतो का ?
मुक्ततेचा प्रवाह
झाकण उघडताच थेंब थेंब ओघळतो,
शब्दांतून, स्वप्नांतून, श्वासांतून वाहत जातो
आणि पुन्हा एका क्षणात संपूर्ण जग व्यापतो
बाटलीतून फेसाळत हा समुद्र,
शिरांमध्ये उतरतो हळूहळू माझ्या
आणि नशा होऊन तुझ्या श्वासात सामावतो
आपण होतो समुद्र, डोह, थेंब आणि आभाळ, एकाच वेळी
की फक्त ओठांवर उसळणारा मादक झरा ?
— रचना : नयना निगळ्ये. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूपच सुंदर….