जीवनात पदार्पण झाल्यावर आणि कळते पण वाढीस लागल्यावर, एक ध्येय निश्चित करुन वाटचाल करावी लागते.
क्षितीज ही एक अशी कल्पना आहे की, आभाळ हे जमिनीला कुठेतरी टेकले आहे असा भास होतो. पण पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता ते अधिक पुढे आहे असं जाणवतं. म्हणजेच क्षितीजाला उंबरठा नसतो. आपले ध्येय हे सुद्धा असेच असले पाहिजे, अमर्याद !
अशा ध्येयात जीवनाची परिपूर्ती असते. आपल्या बरोबर नशीब दिलेले असते. नशिबाला प्रयत्नांची जोड मिळाली की, ध्येयाकडे जाता येते. वाटेत अनेक अडथळे येतात. प्रयत्न करुन ध्येय गाठता यावे या साठी नशीब असता जगजेठीचा आशीष ही प्राप्त होतो. वास्तवाची जाण मात्र असावीच लागते, आणि त्या साठी मेहनत घ्यावीच लागते.
या मेहनतीने क्षितिजाकडे जाता येते. ही वाटचाल वाटते तेव्हढी सहज नसते. या वाटेत अनेक अडथळे, काटे, पाणी या सारखे अडथळे येतात, येऊ शकतात. म्हणून वाटा सापडण्यासाठी शोध घ्यावा लागतो. माणसं भेटतील, ती बदलतील, बदललेली असतील, तरी त्यांना स्वीकारुन पुढे जायचं असतं. कालपरत्वे परिस्थिती अनुभवावी लागेल, आणि त्यातून शिकावे लागेल. अनुभवाचे क्षण निघून जातील, पण त्यांना जपून ठेवणे आवश्यक असते. काहीजण विश्वासघात करतील, पण तरीही त्यातून सावरुन, पुढे जायचं असतं. अनेक प्रसंग परीक्षेचे असतील. त्यात आपली क्षमता सिद्ध करावी लागते. आपल्यात ही क्षमता पात्रता आली असेल, आणली असेल तर, ध्येय आपली वाट पहात असेल हे निश्चित.
ध्येय हे क्षितिजासारखे असते. त्याला उंबरठा नाही, हे लक्षात घेतले तर जीवनाची परिपूर्ती त्यात नक्की असेल हा विश्वास आल्याशिवाय राहणार नाही.
म्हणूनच….
जगाचा तो सूत्रधार त्याचे सारे तंत्र नवे । क्षितीज बांधताना अंतरीचे मंत्र हवे ।। ।। तथास्तु ।।
— लेखन : अरुण पुराणिक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
आपण ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोच ना हीच आपल्या आयुष्यातली खरी प्रगती असते.. आणि ते दे गाठल्यानंतर झालेला आनंद असतो तो अद्विगणित असतो…खुपचं सुंदर लेखन केले आहे…👌👌🙏🏻