मी शाळेत चालत जात होते, त्यामुळे बसमध्ये खिडकीत बसण्याचा प्रश्नच आला नाही. वर्गात कुठेही बसले तरी सहसा बाहेर बघायला सवड नसायची – खोड्या आणि अभ्यास यामधेच वेळ निघून जायचा. पण मी साधारण १० वर्षांची असताना माझ्या वडिलांनी गाडी घेतली आणि आमचा पुणे, अलिबाग, नाशिक असा जवळपास प्रवास सुरु झाला. मी चणीने लहानखुरी होते, त्यामुळे पुढच्या सीटवर दोन मोठ्या माणसांमध्ये मला छान बसता यायचे. त्या समोरच्या मोठ्या खिडकीतून पुढचा रस्ता आणि आजूबाजूचे दृश्य संपूर्ण दिसायचे. मला वाटते तेव्हाच मला हा खिडकीत बसायचा नाद लागला. आणि आता साठी उलटून गेलीय तरी अगदी लहान मुलांच्या उत्सुकतेने मी खिडकी पकडायला धावते.
खिडकी तर खरी जागोजागी असते. आमच्या मुंबईच्या घरामागे मोठे स्टेडियम होते आणि आमचे अप्पा पडदे लावून उजेड बंद करण्याच्या अगदी विरोधात. त्या खिडकीतूनच मावळतीचे बदलते रंग, पावसाळयातील गच्च काळ्या ढगांनी भरलेले आकाश आणि ऋतूप्रमाणे बदलणाऱ्या हिरव्या रंगांच्या छटा हे सगळे कितीदा पाहिले. सह्याद्रीच्या किल्ल्यांवर आणि पुरातन देवळातून झरोके व गवाक्ष असे खिडकीचे वेगळे प्रकार सापडले आणि त्यातून कसे बघायचे हा नवीन दृष्टिकोन शिकले. नंतर परदेशात राहताना उंच इमारतींवरील काचेच्या खिडकीतून खालचा भूभाग पाहण्याचा आनंद खूप वेळा घेतला. मला आठवतंय की सेंट लुईसमधल्या आर्चच्या अरुंद मध्यभागावर उभे राहिले तेव्हा तिथल्या मोठया खिडक्यांमुळे आपण अधांतरी तरंगत असल्याचा रोमांचकारी अनुभव आला होता.
माणसाची जमात आधी मुक्तपणे उघड्यावर जगत होती. कधी गुहांतून तर कधी झाडाखाली पंचमहाभूतांपासून स्वतःचे संरक्षण करताना आदिमानवाने साधासा आडोसा उभारला असेल. त्याच निवाऱ्याची उत्क्रांती होत हळूहळू झोपडी, बंगला, मोठ्या इमारती अशी प्रगती झाली. घराच्या भिंती उंच आणि भक्कम बनल्या आणि त्यांनी निसर्ग बाहेर थोपवून धरला. मग प्रकाश वारा आत आणण्यासाठी खिडक्यांची योजना केली. पूर्वी जेव्हा ऊन, वादळ घरात सहज येत होते, तेव्हा खिडक्या लहान होत्या. गमतीची गोष्ट अशी आता आपण हवेला सुद्धा आत शिरण्यास मज्जाव केला आहे आणि खिडक्यांचा आकार मात्र मोठा झाला आहे. आजच्या आधुनिक वास्तूत आपण खिडकीतून निसर्ग फक्त बघतो पण अनुभवत नाही.
सृष्टीची असंख्य रूपे आपण या खिडकीतूनच पाहतो आणि तेही स्वतःला जराही तोशीस न होता. रणरणते ऊन, कडाडणाऱ्या विजा, भुरभुरणारा बर्फ सर्व काही दिसते पण आपण न घामाने कासावीस होतो, न चिंब पावसात भिजतो की थंडीत गारठून जातो. या खिडक्यांमुळेच आपल्याला प्रकृतीचे मनोहर दर्शन होत राहते आणि ऋतुचक्राचे भान राहते. वातावरणाशी आपल्या मनाचे इतके घट्ट नाते आहे की काही दिवस उजेड दिसला नाही तर आपण उदास होतो. भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशात दारे खिडक्या कायम उघडी असतात त्यामुळे हे फारसे जाणवत नाही. अमेरिका देश उत्तर गोलार्धात. इथे थंडीत दिवसाचे तास कमी आणि सूर्य प्रकाशही प्रखर नाही. दक्षिणायनात सूर्य क्षितिजावरून खाली जातो हे नुसते पुस्तकी ज्ञान होते. पण त्याचा उपयोग करून मी नंतर घर घेताना दक्षिण आणि पश्चिम दिशेला मोठ्या खिडक्या आहेत याची खात्री केली होती. आता हिवाळ्यात बाहेर कितीही थंडी असली तरी जेव्हा आकाशात सूर्य असतो तेव्हा आमच्या हॉलमध्ये उबदार उन्हे असतात. आमच्या दोन्ही माउंनी याचा सगळ्यात जास्त आनंद उपभोगला.
घरांप्रमाणेच वाहनेही प्रगत होत गेली आणि त्यांच्या खिडक्यासुद्धा. अगदी पूर्वी घोडा, उंट अशी जनावरे प्रवासाचे साधन म्हणून वापरली जात. नंतर त्यांना बग्गी जोडली आणि आडोसा मिळाला. पण खरा बदल झाला तो आगगाडी, मोटारी आणि विमाने यांचा वापर सुरु झाला तेव्हा. या वाहनात आतल्या बाजूला बसून प्रवास करताना बाहेर काय चाललेय हे दिसायची खात्री नसते.
म्हणूनच वाहनातील खिडक्या माझ्या चौकस स्वभावाला सगळ्यात जास्त भुरळ घालतात. अनेक प्रकारची वाहने, त्यांच्या वेगवेगळ्या विशिष्ट खिडक्या आणि त्यातून उलगडत जाणारे असंख्य देखावे. त्यातही मोटार गाडी, बस आणि ट्रेन यांच्यातील अनुभवात बरेच साधर्म्य आहे. ही जमिनीला घट्ट धरून धावणारी वाहने आपल्याला आजूबाजूचा परिसर खूप जवळून दाखवतात.
गाडीत बसून एखादे गाव सोडून जाताना काही अंतरापर्यंत ओळखीच्या खुणा – घरे, चौक, देऊळ – अशी दिसतात आणि मग एका वळणावर सगळॆ मागे पडते. रस्ता पुढे धावतच असतो पण आता सोबतीला असतात अनोळखी झाडे, डोंगर आणि कधीतरी नवीन गाव सुद्धा. मग आधीचे गाव फक्त आठवणीतच उरते. मला वळणांचा किंवा उंचीचा त्रास होत नाही. बसच्या पुढच्या खिडकीतून खंडाळ्याच्या घाटाचे हिरवेकंच सौन्दर्य – ढग, धबधबे आणि पर्वतराजी – बघून मन त्या मोरासारखेच नाचू लागते. शेती, फळबागा तर कधी मोठी शहरे वाटेत लागतात. कधी विशाल जलाशय तर कधी प्रसिद्ध जागा पण मस्त खिडकीतूनच बघायला मिळतात. मला सर्वात आवडते ते बाजूला असणारी घरे आणि माणसे बघायला. खांद्यावर दप्तर घेऊन जाणारी मुले, गुरांना हाकणाऱ्या किंवा काहीतरी विकणाऱ्या बायका आणि शेतीचे व इतर काम करणारे पुरुष. ते नक्की काय करताहेत हे समजेपर्यंत आपण पुढे निघून जातो. क्वचित एखाद्या क्षणासाठी डोळाभेट होते आणि मी उगाच तर्क करत राहते की हे गाव, तिथले लोक, त्यांचे आयुष्य कसे असेल.
पण हा अनुभव नेहेमीच सुखद नसतो. भारतात आणि परदेशातही फिरताना असे काही दिसते की मन हेलावून जाते.
मैल न मैल पसरलेली उजाड जमीन, गवताचे हिरवे पाते सुद्धा नाही, आटलेल्या नद्या आणि शुष्क बोडके डोंगर. त्यातही काही साध्या घरांची वस्ती दिसते नि मन विचार करत राहते हे इथे कसे जगत असतील ? काय खात-पीत असतील? आपण सहसा फक्त पर्यटकांसाठी आकर्षक अशी स्थळे शोधतो पण प्रवासात खिडकी काहीतरी वेगळे खोलवर दाखवून जाते.
आम्ही एका ग्रीसमधल्या बेटावर बसने फिरत होतो. तिथले चर्च बघायला उतरायच्या आधी गाईडने सांगितले की पिस्ते पुढे घ्या, जास्त चांगले मिळतील. मी खिडकीतून एक माणूस आपल्याकडे चणे-दाणे विकायला असते तशी टोपली घेऊन उभा असलेला पाहिला होता. त्याने कागदाच्या पुडीतून मला २ युरोचे पिस्ते दिले. बाकी कोणी त्याच्याकडून काही घेतले नाही. बस निघाली तेव्हा त्याने हात हलवून निरोप देताना मी पाहिले आणि मला फार वाईट वाटले. पुढच्या स्टॊपवर मोठे दुकान आणि महाग वस्तू विकायला होत्या. गाईडला कदाचित त्यात फायदा मिळत असेल. पण त्या गरीब माणसाकडून ५-७ लोकांनी पिस्ते घेतले असते तर काय बिघडले असते ? त्याचे पिस्ते लहान पण चविष्ट होते. मला आजतोवर त्या गाईडचा राग येतो आणि पिस्तेवाल्याची काळजी वाटली.
माझे हे असे तर्क आणि कल्पना यांना जोरदार धक्का पण बसला आहे. एकदा सॅन फ्रॅन्सिस्को जवळ ट्रेनने जाताना खिडकीतून बाहेर पाहायचा माझा नेहेमीचा उद्योग चालू होता. एका स्टेशनवर कुरळे रुपेरी केस असलेली रुबाबदार व्यक्ती दिसली. माझा कयास की कोणी मोठा अधिकारी किंवा प्राध्यापक असावा. गाडी काही वेळाने सावकाश प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडत होती तेव्हा तोच माणूस मला तिथल्या कचऱ्याच्या डब्यात शोधाशोध करताना दिसला. तेव्हा मी अचंब्याने जो आ वासला तो मिटायला बराच वेळ लागला.
विमान आणि त्यातील खिडकी याची बातच काही और आहे. विहंगम शब्दाचा अर्थ विमानात बसेपर्यंत नीट कळला नव्हता. अमेरिकेच्या पहिल्या प्रवासात जेव्हा खिडकीतून ढगांच्या राशी दिसल्या तेव्हा अत्यानंदाने उडी मारून त्यावर लोळण घ्यावी असे वाटले. त्यानंतरच्या ३५ वर्षात अनगणित वेळा विमानात बसले पण ते मूळ कुतूहल आणि उत्साह काही कमी झालेला नाही. मी बहुतेकदा खिडकी मिळवतेच पण जेव्हा नसते तेव्हा मला सगळ्यात राग कशाचा येत असेल तर लोक खिडकी बंद करून खुशाल झोपून जातात.
विमानातून अद्भुत विस्मयचकित करणारी दृश्ये दिसली. नागमोडी वळणाच्या नद्या, सरोवराचे किनारे आणि अथांग सागर. विमानाच्या पंखावर बसून सोबत करणारी चंद्राची कोर आणि पहिल्या सूर्यकिरणांनी उजळून निघणारी गावे. एकदा विमान ३३ हजार फुटावर असताना खालती वादळ सुरु होते. काळे ढग आणि मधूनच विजेचा प्रहार. अचानक ढगांची फळी दुभंगली आणि चक्क इंद्रधनुष्य दिसले. पावसाच्या पाण्याने फुगलेल्या नद्या अरबी समुद्राला मिळताना पाहिल्या आणि न संपणारे वाळवंट बघताना थक्क झाले. आल्प्स पर्वतांची बर्फाच्छादित शिखरे आणि रॉकीच्या डोंगरांचे धुक्यातून बाहेर डोकावणारे सुळके – डोळ्यात किती साठवू असे होते. पण हे फक्त नेत्रसुख. जमिनीवरच्या खिडक्यांतून भासणारी जवळीक, येणारे गंध यांचा इथे अभाव असतो.
पाण्यावरच्या बोटीच्या प्रवासात खिडकी फारशी महत्त्वाची नसते कारण आपण बहुतेक वेळ बंदिस्त खोलीत नाही तर उघड्यावर वावरतो.
मायक्रोसॉफ्टने आपल्या सगळ्यांना कॉम्पुटरवर एक वेगळीच खिडकी उघडून दिली. या Windows मधून आता जगातल्या कुठल्याही क्षेत्रात डोकावून हवी ती माहिती, जागा आणि माणसे शोधता येतात.
भोवतालचे जग समजून घेण्याची क्षमता मानव वंशाला आवश्यक होती कारण त्याशिवाय हिंस्त्र श्वापदे आणि भयप्रद निसर्ग यावर मात करून जगणे अशक्य होते. आज सुखरूप राहण्यासाठी बाहेर काय चाललेय हे न्याहाळण्याची गरज नसली तरी ती वृत्ती आधुनिक मनुष्याच्या गुणसूत्रांचा भाग आहे. म्हणूनच उत्कंठा आणि जिज्ञासा हे आपले महत्त्वाचे अंगभूत गुण आहेत. खिडकीला नाक लावून बाहेर पाहत राहिले तर ज्ञान तर मिळतेच आणि खरे सांगायचे तर पुष्कळ मजाही येते.
असे म्हणतात की डोळे ही मनाची खिडकी असते. या खिडकीचा मी मनसोक्त वापर केला आणि तृप्त झाले. शक्यता आहे की काळाच्या ओघात कधीतरी नेत्र कवाडे मिटू लागतील, प्रवासातील चलतचित्रे पुसट होतील आणि तपशील विस्मरणात जातील. पण खिडकीतून पाहण्यामुळे मिळालेला आनंद आणि समाधान माझ्या अंतःकरणात कायम भरून राहील.
— लेखन : डॅा सुलोचना गवांदे.
(पूर्व प्रसिध्दी: न्यू जर्सी दिवाळी अंक). अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर लेख….
मस्त..मजा आली वाचतांना…खिडकीची एक एक आठवण आठवत पुढे पुढे जाणारा लेख आठवणीत राहील .