महाराष्ट्रातील मराठमोळ्या वारकऱ्यांची पाऊले वाळवंटी ठायी खेळ मांडण्यासाठी आणि सावळ्या पांडुरंगाच दर्शन घेण्यासाठी मनोमन व्याकुळ होत पंढरीत केव्हाच पोहोचली. दिंडीतल्या पालखी सोहळ्यांनी भाविकांची मने निवून गेली. माऊलींची पालखी वाखरीला येऊनही ठेपली. तिथल्या रिंगणान देहभानहि हरपून गेलं.
गावागावांतून शेकडो किलोमीटर चालत आलेल्या नि वर्णअभिमान विसरलेल्या अठरापगड जाती एकमेकांच्या पायांना स्पर्श करीत जय हरी करताहेत.. ‘डोईवरली तुळस सुकू देऊ नगंस रे बाप्पा’ म्हणत टाळ, वीणा, मृदंग या वाद्यांनी सज्ज झालेल्या वारकर्यांच्या दिंड्या विठ्ठलनामाचा टाहो फोडत आणि संतांच्या नामांचा घोष करीत, लोक खेळ खेळत खेळत लाडक्या चंद्रभागेकाठी केव्हांच पोहोचल्या. तिथं फड विलक्षण रंगलेले…
पांडुरंग कांती, पांडुरंग शांती, अशी भावना ठेवून वैष्णवांचा मेळा विठ्ठल मंदिराचा कळस दिसताच ‘धावा’ घेत बेभान होऊन दर्शनाची ओढ अनावर झाल्याने काल धावत सुटले. शेकडो किलोमीटर दिंडीत चालून सुजलेली त्यांची पावलं थकायच नाव घेत नाहीत. नवी टवटवीत ऊर्जा त्यांच्या अंगी संचारते आहे. सावळ्याच सुंदर ते ध्यान डोळे भरुन पाहण्याकरिता आतुरलेल त्यांचं मन केव्हाच विठुमाऊलीच्या गाभार्यात पोहोचलेलं आहे. मैलो न् मैल चालून पायांना टचटचून आलेल्या फोडांची पर्वा न करता चंद्रभागेच्या पात्रात विठ्ठलमूर्ती डोळ्यांपुढं आणत नतमस्तक होऊन स्नान करायचं नि बाप रखुमा देवीवरुच्या आशिर्वादासाठी देवळासमोर लागलेल्या रांगेत तेवढ्याच तल्लीनतेन उभं राहायचं. हरिनामाचा गजर, दिंडीपताकांची सळसळ आणि मृदंगाचा ठेका सवे घेऊन नाचणाऱ्या पावलांना मग आपोआप वेदनांचा विसर पडतो.
पंढरीच्या मठामठांत हरिनामाचे संकीर्तन सोहळे रंगलेले आहेत. संतसाहित्याची ही शिदोरी महाराष्ट्रातल्या बहुजनांनी पिढ्या न् पिढ्या प्राणापलिकड जपून ठेवलीय्.
संतांनी आपल्या संस्कृतीला बहाल केलेलं एक लेण म्हणजे हे विठ्ठलाचं महाद्वार !
वाळवंटात उभारलेल्या पुंडलिकाच्या समाधीजवळ तुळशीमाळा, कुंकू, अबीरगुलाल, लाह्या- चुरमुरे, अष्टगंध , बांगड्या-खण असला मर्हाटमोळा ‘ऐवज’ सांभाळत अभंग म्हणण्यात तल्लीन झालेली बाया- बाप्यांची मांदियाळी दाटली, की माणसामाणसांतली तटबंदी आपोआप गळून पडते !
विशाल जनसागरामुळं सावळ्या विठुरायाचं दर्शन झालं नाही, तरी कळसाला मनोभावे हात जोडत हे मराठमोळे वारकरी एकच मागणं मागतात…
लेकराबाळांना सुखी ठेव बाप्पा…मायंदाळ पाऊसपाणी होऊ दे विठ्ठोबामाऊली… डोईवरली तुळस सुकू देऊ नगंस रे बापा, लई न्हाई मागणं !
वारी विषयी वारकरी आचारसंहिता परिषदेचे मुख्य प्रवर्तक ह.भ.प.निलेश महाराज झरेगांवकर म्हणतात….
“होय होय वारकरी ।
पाहे पाहे रे पंढरी ॥”
शेकडो मैल चालून लाखों वैष्णव आज भुवैकुंठ पंढरपुरात दाखल झाले, घरावर तुळशीपत्र ठेवुन महिनाभर ऊन, वारा, पाऊस कशाचीच परवा न करता पंढरीपर्यंत आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला पाडुरंगाचे दर्शन होत नाही. तरी देखिल माघारी परततांना आयुष्य सार्थकी लागल्याचे “चैतन्यसमाधान” तो बरोबर घेऊन जातो.
संतशिरोमणी नामदेवराय म्हणतात…
झळझळीत सोनसळा ।
कळस दिसतो सोज्वळा ।
बरवे बरवे पंढरपूर ।
विठोबारायाचे नगर ॥
जे वारकरी पाडूरंगाच्या मंदिराचा फक्त कळस बघुनच माघारी फिरतात, कळसाचे दर्शन करून त्यावरच समाधान मानतात, त्या वारकर्यां बद्दल मला आवर्जून कुतूहल वाटतं, कारण यावरून भक्ताचे आणि देवाचे नाते हे विशेषरूपाने अधोरेखित होते. “रामकृष्णहरिविठ्ठलकेशव”
— लेखन : जयप्रकाश दगडे. ज्येष्ठ पत्रकार, लातूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800