Saturday, July 27, 2024
Homeयशकथागझलकार विजय जोशी

गझलकार विजय जोशी

काही कारणाने एखाद्या व्यक्तीशी संपर्क येतो. वरवर पाहिले तर ती व्यक्ती खूप शिष्ठ वाटते. कडक स्वभावाची वाटते. निर्भीडपणे आपल्या चुका दाखवणारी असते. परंतु जसजसा या व्यक्तीशी आपल्याच कामामुळे सहवास वाढतो, तेंव्हा लक्ष्यात येते की आपण किती चूक करत होतो. आपल्याच भल्यासाठी ही व्यक्ती इतकी कडक वागत होती, ही व्यक्ती तर फणसासारखी गोड, रसाळ आहे.

हे सगळे लिहिण्याचे कारण असे की मला ही नुकताच असा अनुभव आला आहे. झाले असे की, एका समूहात वृत्तबद्ध कवितेच्या कार्यशाळेविषयी वाचून मी त्यांत सामील झाले. आठवड्यातून दोनच दिवस वर्ग असणाऱ्या त्या शाळेचे गुरुजी होते “काव्यगुरु विजय जोशी उर्फ विजो”. वेळ रात्री साडेनऊची तोपर्यंत ग्रुप बंद असे. अगदी नियमितपणे गुरुजी ९:३० वाजता हजर होत. मात्रा ओळखणे इथून सुरवात होऊन शिकवणे सुरू झाले. गुरुजी अतिशय कडक ! चुकीला माफी नाही‌‌. चूक दाखविताना निर्विकारपणा स्पष्ट दिसे. परंतु हळूहळू लक्ष्यात आले की हे सगळे आपल्याच भल्यासाठी सुरू आहे. आदर भीतीयुक्त दरारा एखादाही शब्द इकडे तिकडे झाला की लगेच कडक शब्दात कान उघाडणी झालीच समजा !

परंतु हळूहळू वाटू लागले विनामूल्य कार्यशाळा घेणाऱ्या विजो सरांच्या स्वभावाची दुसरीही बाजू असेलच, माझा कयास खरा ठरला.

परिस्थितीच मनुष्याला बनवते. कुणी पार खचून जातो तर कुणी शून्यातून विश्व निर्माण करतो. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात, मालवण तालुक्यात मसूरे हे जन्मगाव असलेले विजो कोकणातल्या फणसासारखेच गोड, रसाळ आहेत. गावातच बीकॉम पर्यंत शिक्षण घेऊन ते मुंबईला आले. कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा कोर्स केला, नंतर एमबीए (मार्केटिंग मॅनेजमेंट) केले. नोकरीनिमित्त डोंबिवलीत त्यांचे वास्तव्य आहे. सध्या हायमीडिया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई येथे निर्यात व्यवस्थापक या पदावर ते कार्यरत आहेत. त्यांची पत्नी सौ. तृप्ती ताई ह्या डोंबिवलीतच सेंट जॉन हायस्कूल मध्ये नोकरी करतात. दोघेही आपला संसार नेटका होण्यासाठी प्रयत्नशील असल्याने दोन्ही मुलांनीही चांगले शिक्षण घेतले आहे.

विजोना शालेय जीवनापासूनच कविता करण्याची आवड होती. ती त्यांनी कायम जोपासली. त्यांना सर्व प्रकारच्या कविता लिहिण्याचा छंद आहे. आपली कविता अनेक वेळा लिहून पहावी, ती गेय होईल याकडे लक्ष द्यावे, असे ते नेहमी सांगतात. कवितेवर संस्कार झाले पाहिजेत हा त्यांचा विचार लिहिणाऱ्यांनी अंमलात आणायला हवा.

पूर्वी कविता चालीत म्हणता येत असत. आताही तसेच लेखन व्हावे यासाठी त्यांचा विशेष आग्रह असतो. त्यांच्या वृत्तबद्ध कविताही खूप आशयपूर्ण असतात. आजवर त्यांचे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले असून आणखी चार संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत ‘वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)’ हा प्रबंधात्मक ग्रंथ वृत्तबद्ध कविता आणि गझल शिकणाऱ्यासाठी अतिशय उपयुक्त मैलाचा दगड आहे.

विजो गझल लिहितांना गझल सम्राट श्री. सुरेश भट यांना आपला आदर्श मानतात. गझलकार श्री. ए के शेख, कल्याणचे गझलकार श्री.प्रशांत वैद्य यांच्या गझल रचनांवर ते विशेष प्रेम करतात.

विजोंना मिळालेल्या पुरस्कारांची यादी बरीच मोठी आहे. अनेक साहित्यिक संस्थांमध्ये त्यांचे बहुमोलाचे योगदान आहे. सगळ्या संस्थांत त्यांच्यावर असलेली जबाबदारी ते चोखपणे पार पाडतात. अनेक साहित्यिक संमेलनात त्यांना सन्मानित अतिथी म्हणून बोलावले जाते. विविध वर्तमानपत्रे, मासिके व दिवाळी अंकातही त्यांचे साहित्य नेहमीच प्रकाशित होत असते.
साहित्य क्षेत्रात त्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते.
‘आपणा सारखे करावे सकळ’ — हा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
वृत्तबद्ध कविता आणि गझल संबंधी त्यांनी आजवर ऑफलाईन आणि ऑनलाइन अशा ६० पेक्षा जास्त कार्यशाळा घेतल्या आहेत. कोणी आपल्याला चांगले म्हणावे अशी त्यांची कधीच अपेक्षा नसते.

आपले काम प्रामाणिकपणे करणाऱ्या या माझ्या शिस्तबद्ध गुरूंना विनम्र अभिवादन.

प्रतिभा पिटके

— लेखन : प्रतिभा पिटके. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments