“लोळविले दुश्मनाना त्यांनी संघटित सामर्थ्यावरती
राज्य हिंदवी स्वराज्य केले स्थापन
भगवा पावित्र्याचा उभारून”
19 फेब्रुवारी
आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे..
कारण आजचा हा दिवस सर्व रयतेच्या, शिवप्रेमींच्या आनंदाचा दिवस. ज्यांच्या नावातच शिव आहे. असे छत्रपती शिवाजी राजे शिव शंभूचा हर हर महादेव असा भक्तीमय, श्रद्धामय गजर करत हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती.
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.
19 फेब्रुवारी 1630 रोजी सोनियाचा दिनु आला.
स्वराज्य इतिहासाचं भूषण असलेल्या शिवनेरीवर नगारखान्यात सनई-चौघडे वाजू लागले.
जिजाऊच्या पोटी नवरत्न जन्मले. किल्ल्यावर सगळीकडे जणू आनंदाची हर्षोल्लासाची जत्राच भरली. मग काय थाटामाटात बाळाचं बारसं झालं. नाव काय ठेवायचं शिवनेरीच्या किल्ल्यावर शिवाई देवी. तिचा वरदहस्त कायम राहील असं नाव ठेवलं गेलं “शिवाजी”. अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान पुत्र घडविला समर्थ ऐसा जो राष्ट्राची शान देशप्रेमाचे धडे गिरविले तिच्यापाशी बसून
धन्य ती जिजाऊ नमन तिला लवून
असंच ज्यांच्याबद्दल म्हटलं जात त्या जिजाऊंच्या संस्कारातून तयार झालेलं शिवरायांच मन म्हणजे अवघ्या मराठी मनाची शान. खरं तर शिवरायांचे कर्तृत्व महाराष्ट्राच्या चौकटीत मावणार नाही. त्यात जिजाऊंनी दिलेली शिकवण, त्यांनी घेतलेली मेहनत यामुळेच “पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा”
हे सगळं करण्यासाठी लहानपणापासूनच कर्तुत्वाच बीज त्यांच्यात रोवलं गेलं. रोज संध्याकाळी देवापुढे सांजवात लावून छोट्या शिवबाला रामाच्या, कृष्णाच्या, भीमा, अर्जुनाच्या गोष्टी त्या सांगत.अभंग म्हणून दाखवत. यातून शिवरायांना संतांचे चरित्र समजले. खेळामुळे व्यक्तिमत्व घडते जणू हे त्यावेळी जिजाऊंना माहीत होतं, म्हणून उच्च-नीच भेदभाव न करता मावळ्यांच्या मुलांबरोबर ते खेळत. त्यांच्या चटणी भाकरीत त्यांच्या बरोबर ते जेवले. त्यावेळी मावळ्यांची मुलं म्हणजे जणू मोकळ्या रानातील रानपाखरं.
विविध पक्षांचा आवाज काढणारे मातीत किल्ले तयार करणे या बालसंस्कारातूनच या मावळ्यांच्या मदतीने त्यांनी नंतर किल्ले उभे केले. ते त्यांना स्वराज्य स्थापनेत मदतीला आले. आणि शिकार करणे, लुटूपुटूची लढाई करणे त्यातून उभे केलेले किल्ले मिळवणे आणि मग तिथे राज्य करणे.
“शिवाजी होई राजा शूर मावळे होई शिपाई
कोणी भालदार-कुणी चोपदार
असा खेळातला राज्यकारभार”
पुढे सत्यात उतरला.
लहान मूल म्हणजे खेळकर वृत्ती. मग बाल शिवाजी कसा मागे राहणार! एक दिवस खेळ थांबविण्यासाठी जिजाऊंनी त्यांना भिती, दाखवली. त्या म्हणाल्या, ‘शिवबा घरात चल, ‘ तो बघ बागुलबुवा आला.
परिणाम उलटाच…. दाखवा कुठे आहे तो बागुलबुवा…. तलवारीने कापून टाकतो त्याला…. काय हे धाडस! हेच शिवबा जेव्हा मोठे झाले आयत्या पिठावर रेघोट्या न मारता स्वबळावर, स्वकर्तृत्वावर त्यांनी राज्य निर्माण करण्याचा चंग बांधला. इतर राजे आणि राज्य यापासून शिवरायांचे राज्य वेगळे शिवाजींचे कार्य आणि शिवाजींचे राज्य तिथे राहणारा सर्व सामान्य माणूस शिवाजीराजांना आपला वाटत असे.
त्यामुळेच त्यांचं हे कार्य रयतेच्या प्रत्येकाला आपले स्वतःचे कार्य वाटतं.
बारा बलुतेदारांना दरबारी घेऊन राज्य चालवणार्या राज्यात म्हणूनच तर पन्हाळगड वरून स्वतःची सुटका करून घेता आली. नकली शिवाजी बनण्यासाठी पुढे आला तो गरीब मनुष्य शिवा न्हावी. त्याला माहीत नव्हते का की आपण पकडले जाणार ? पकडले गेलो की आपलं मरण अटळच ! तरीही ना कुणा जहागिरीच्या लोभाने आला तो. फक्त शिवाजीराजे जगले पाहिजे ही त्याची इच्छा. हे मरणावर उदार होण्याचे औदार्य हसत हसत त्याने स्वीकारलं.
मारला गेला अमर ही झाला….
“जन्म घेऊन न्हावी जातीत कूळ उद्धरले ज्यांनी”
“स्वराज्याच्या शिवबांना वाचविले त्या शिवानी”
एकटा शिवा न्हावीच का ? तर नाही… ज्या मेण्यातून त्यांना नेण्यात आले ते पेटारे पळवणारे, ऊर फुटे पर्यंत वेगाने पालखी विशाल गड गाठण्यास होती मने तयांची अधीर आपल्यासाठी हे सगळे कष्ट पाहून शिवरायांचा येत होता ऊर भरून.
“पाहून त्यांच्या ह्या बलिदानाला अश्रू ओघळले गालावरती
थोर तो शिवा अन थोर तयांचा राजा छत्रपती”.
त्यानंतर पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटून शिवाजीराजांना विशाळगडावर पोचण्यासाठी घोडखिंडीत अडवून स्वतःचा जीव कुर्बान करणारे बाजीप्रभू देशपांडे. ते आणि त्यांचे सवंगडी.
“नव्हती कसली पर्वा त्यांना आपल्या प्राणाची
चिंता होती शिवरायांची”
कारण या स्वराज्याच्या राज्यात कार्यासाठी त्यांनी जगायला हवयं हीच होती ना ती थोरभावना…
किती नावं घ्यावीत !!!! आग्र्याहून सुटका… शिवरायांचा सोंग घेवून झोपलेला, त्याचे पाय चेपत असल्याचे सोंग करणारे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद… भावना…
“आपण मारलो गेलो तरी चालेल फरक नाही पडणार काही
आनंदाने स्वराज्याचा वृक्ष फुलवा शिवराय तुम्ही”
इतकच नाही तर…
मी पाचवीच्या वर्गात असतानाची एक कविता आठवते.
“खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या”
या कवितेत कवीने केलेलं वर्णन, प्रसंग अगदी छोटा पण आमच्या इतिहासाच्या सरांना स्पष्टीकरणातून सांगितलं होतं… अजूनही आठवतात ते बोल…. धामधुमीचा काळ आहे सैनिक, शिपाई, मावळे तर सोडाच पण शेतात नांगर धरणारा साधा शेतकरीसुद्धा कोणाचे सैनिक कुठे जातात, इकडे लक्ष द्यायचे. स्वराज्य कार्यात कोणी दगाफटका करणारा आढळला तर त्याला हटकायचे असेच एका गावाच्या सीमेवरून जाणाऱ्या चार घोडेस्वारांना एक दहा-बारा वर्षाचा मुलगा खबरदार…. म्हणून अडवतो, त्यांना दम देतो…
शिवबांना पाहिलं नव्हतं त्याने. तोच मुलगा त्यांच्या कार्यात त्यांना मनसुबे रचत होता…
तानाजी मालुसरे.
आधी लगीन कोंढाण्याचे म्हणत मुलाच्या लग्नाआधी स्वराज्य कार्य करीत अमर झाले.
अशा सर्वसामान्य रयतेचा असामान्य राजा म्हणजे “शिवसुर्य हा चमकून गेला पावन महाराष्ट्रा वरती
सद्भावाने या रवी गुणांची करूया पंचारती”
हर हर महादेव
जय भवानी…. जय शिवाजी
शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
— लेखन : सौ अनिता व्यवहारे. श्रीरामपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800