Saturday, April 13, 2024
Homeलेखगीता माहात्म्य

गीता माहात्म्य

आज, मार्गशीर्ष शु. एकादशी. म्हणजेच गीता जयंती. आजच्या दिवशी, सुमारे ५००० वर्षांपूर्वी भगवंतांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. त्या गीता या ग्रंथाची आज जयंती. वैदिक प्रस्थान त्रयीमध्ये ब्रह्मसूत्र, उपनिषदे बरोबर गीतेचा समावेश होतो. भगवंताने स्वतः उपदेश केल्यामुळे या स्मृती-ग्रंथाचे महत्व अनन्य साधारण आहे. आत्मज्ञानाचा उपदेश करणारा हा ग्रंथ मोक्ष देणारा असल्याने, ही एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते.

महाभारत युद्धामध्ये सुरुवात होण्याआधी आपल्याला कोणाबरोबर लढायचे आहे याचे निरीक्षण करताना अर्जुन जेंव्हा आपले गुरू द्रोणाचार्य, आजोबा भीष्माचार्य पाहतो, तेंव्हा तो हतबल होतो आणि युद्धासाठी नकार देतो. ज्या युद्धाची तयारी अर्जुन १३ वर्षे करत होता, जो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, असा तो प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी आपले मनोधैर्य कसा घालवून बसला ? आणि भगवंताने गीतेचा उपदेश केल्यानंतर त्याच्यात काय बदल झाला ? भगवान श्रीकृष्णाने त्याला नक्की काय सांगितले ?

आज 5000 वर्षानंतर आम्हांला गीतेचा काय उपयोग ? आम्हांला युद्ध करायचे नाही? इतक्या वर्षात जगामध्ये, माणसामध्ये प्रचंड बदल झाले ? आज आमची झेप Artificial Intelligence च्या दिशेने सुरू आहे. विज्ञानाची प्रगती थक्क करणारी आहे. पण थोडा विचार केला तर लक्षात येते की आज आमचे आयुष्य वेगवान आहे, पण Tensions/ Stress चे आहे. आज आमच्याकडे सर्वं सुख-सोयी आहेत, पण आमच्या जीवनात शांती नाही. आमच्या मनाचे सामर्थ्य कमी झाले आहे म्हणूनच आज समाजात आत्महत्या, घटस्फोट, मानसिक आणि शारीरिक आजार यांचे प्रमाण वाढते आहे. आयुष्याच्या या युद्धात आम्हांला सुद्धा आज आधार हवा आहे, मार्ग हवा आहे. आम्हांलाही आमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. थोडक्यात, आम्हांला आनंदाचा मार्ग हवा आहे.

म्हणूनच आजसुध्दा, 5000 वर्षानंतर गीता तितकीच उपयोगी आहे, नव्हे तर आज ती जास्त महत्वाची आहे. याचे कारण तेंव्हा माणसाला मन होते आणि आजही आम्हांला मन आहे. आमचे मनच आम्हांला सुखी किंवा दुःखी बनवते. मनच आम्हांला धैर्य देते किंवा आम्हांला भीती, चिंता काळजी देते.

तेंव्हा आम्हांला आमचे आयुष्य आनंदी, सुखी, समाधानी आणि शांततेचे हवे असेल तर गीतेशिवाय पर्याय नाही. गीता ही सर्वं मानवजातीसाठी आहे, लहान-थोर, स्त्री-पुरुष या सर्वांसाठी आहे. सर्वं प्रश्नांची उत्तरे देणारी आहे.

म्हणूनच, गीतेचा मार्ग हा आनंदाचा मार्ग आहे… गीतेचा मार्ग हा आचरणाचा मार्ग आहे… गीतेचा मार्ग म्हणजे आयुष्य अतिशय समर्थपणे, आत्मविश्वासाने जगण्याचा मार्ग आहे.. गीतेचा मार्ग म्हणजे उत्साहाचा मार्ग आहे… गीतेचा मार्ग म्हणजे प्रकाशाचा मार्ग आहे.

तो आनंदाचा मार्ग नक्की काय आहे ? त्या मार्गावर आम्हीं चालू शकतो का ? हे कळण्यासाठी प्रथम संपूर्ण गीता समजून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही प्रथम अर्जुन झाले पाहिजे. म्हणजे आमचे जीवन भौतिक सुखाबरोबरच मानसिक सुखाचे होऊ शकेल.

त्यामुळे आज आपण आपल्या जीवनरुपी रथाचे सारथ्य योगेश्वर कृष्णाकडे देऊया आणि जीवनामध्ये विजयी होऊया.

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: |
तत्र श्रीर्विजयो भूतिध्रुवा नीतिर्मतिर्मम ||
🕉️ तत् सत ।

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. मस्त आहे. भगवद्गीतेतील महत्व आताच्या काळात सांगणे व ऑनलाईन आचारणात आणणे फार महत्वाचे आहे. खुप चागल्या पद्धतीने लिहिले आहे.धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments