उद्या गुढी पाडवा आहे. या निमित्ताने हा विशेष लेख.
आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा हा सण असतो. वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी असणारा हा सण नवीन खरेदी, व्यवसाय प्रारंभ आणि इतर चांगल्या उपक्रमांचा आरंभ या साठी शुभ मानला जातो. दारी उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असत्यावर सत्याचा विजय मिळविल्याचे प्रतिक असणाऱ्या गुढी पाडव्याच्या दिवशी सर्वांना सुख समृद्धी मिळावी म्हणून कामना केली जाते.
महाराष्ट्रातील लोक गुढी पाडव्याच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. यासाठी उंच बांबूच्या काठीला कडूनिंबाची डहाळी, रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. आम्रवृक्षाला मोहर फुललेला असतो म्हणून आंब्याच्या पानांची डहाळीदेखील अडकवली जाते. फुलांचा हार, साखरेच्या गाठी बांधून त्यावर तांब्या उपडा बसवला जातो. ही गुढी उंच गच्चीवर किंवा दारात उंचावर ठेवली जाते. गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात. सुवासिनी निरांजन आणि अगरबत्तीने गुढीला ओवाळतात. गुढीला नारळ फोडून गूळ, खोबरे आणि कडुनिंबाची पाने प्रसाद म्हणून वाटले जाते.
हा वर्षाचा पहिला दिवस असल्याने नवीन केलेल्या शेवयांची खीर नैवेद्य म्हणून दाखवली जाते. दुपारी गोडाचा शिरा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून गुढीला हळदीकुंकू, फुले वाहिली जातात. संध्याकाळी गुढी खाली उतरवली जाते. नववर्षाचा पहिला दिन म्हणून गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या जातात.
“एकीच्या तत्वांनी करू
साजरे सण नि सोहळे
आनंदाची करत उधळण
पिकवूया सुखाचे मळे’
जग भरातील हिंदू बांधव हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. जागोजागी मिरवणुका, रथयात्रा, शोभायात्रा काढल्या जातात. पथनाट्य वगैरे केली जातात. एकीचे महत्व सर्वांना पटवून सर्व समाज एकत्र येऊन हा सण मोठ्या उल्हासाने साजरा केला जातो. माणुसकीचे दर्शन घडवले जाते.मनुष्यजीवन घाटातील रस्त्याप्रमाणे कधी खडतर तर कधी हिरवळ फुलल्याप्रमाणे ,कधी मुलायम, सुखकारक असते. एकमेकाला साह्याचा हात देऊन माणुसकीचे नाते जपणे महत्त्वाचे असते. आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी खंबीर असावे आणि सर्वांनी संकटात सापडलेल्या माणसाच्या पाठीवर हात ठेवणे, माणुसकी जपणे यामुळे दुःख हलके होण्यास मदत होत असते.
चला वर्षाच्या या सणादिवशी आपण सर्वांनी मिळून माणुसकी जपण्याचा, एकमेकाला साहाय्य करण्याचा संकल्प करू आणि तो तडीस नेण्याकरिता प्रयत्न करू. आपल्या जीवनाचे सार यातच आहे. चौर्याऐंशी लक्ष योनीतुन मनुष्याला हा जन्म प्राप्त झाला आहे. तो जन्म दिल्याबद्दल आपण देवाजीचे आभार मानू. आपण भारत देशाचे सुजाण नागरिक आहोत. पुर्वापार आपली भारतीय संस्कृती आदर्श संस्कृती म्हणून गणली जाते. त्याच आदर्श संस्कृतीचा कित्ता गिरवत आनंदाने राहू
आणि जीवनातील सुंदर क्षणांचा उपभोग घेऊ. माणुसकीच्या विचारांची देवाण-घेवाण करू.
“देश आमचा संस्कारांचा
जपू नीतीमत्ता मिळून सारे
गर्जत राहू गान स्वातंत्र्याचे
देऊया एकजुटीचे हो नारे”
— लेखन : सौ.भारती सावंत. खारघर, नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800