गुढी पाडवा: काही कविता
सर्व कवी,लेखक आणि वाचक यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
१. गुढी पाडवा
(सहाक्षरी रचना)
मराठी महिना
नववर्ष आले
चैतन्याने सारे
जीवन सजले।।
भरजरी शालू
सृष्टी नटलेली
नववर्ष येता
स्वागता सजली।।
आंबा मोहरला
कोकिळेचे गाणे
गुढी उभारता
आनंदली मने।।
संकल्प नवीन
मनी धरायचा
क्षमा सेवा भक्ती
दृढ पाळायचा।।
पर्यावरणाचे
करावे रक्षण
प्रदूषण टाळू
निसर्ग महान।।
निरोगी जीवन
योग प्राणायाम
संकल्प सिध्दता
द्यायचा आयाम।।
चित्त मन शुध्द
गुढी विचारांची
उभारू मनात
नवचेतनेची…..!!
रचना : अरुणा दुद्दलवार
दिग्रस, यवतमाळ
२. आनंदाची गुढी उभी
चैत्रबनी दरवळे
बहरून मधुमास
आनंदाची गुढी उभी
दारोदारी करू खास….१
मांगल्याचा सण हाच
तोरणानी सजवूया
पाडव्याच्या सणालाच
संस्कारानी रूजवूया….२
आम्रवृक्ष डहाळीत
सजतील घरदारे
झेंडू अन् चाफ्यातून
धुंद सुटतील वारे……३
साखरेच्या टांगू माळा
नववस्त्र नववर्ष
कलशाच्या प्रतिकात
यावा घरातून हर्ष…….४
सृजनाचा काळ थोर
चैतन्याची दारी गुढी
पूर्वजांनी जपलेली
हीच परंपरा रूढी…….५
वसतांचा मास सुरू
नटलेली दिसे सृष्टी
वैशाखाच्या दिमाखात
एकवार होवो वृष्टी……६
पर्जन्याच्या चाहूलीचे
बेत सुरू चराचरी
अक्षयाचा घट पूजा
निसर्गाची रीत खरी…..७
रचना : सौ माधवी प्रसाद ढवळे.
राजापूर, जि: रत्नागिरी
३. गुढीपाडवा
नववर्षाची पहाट झाली,
क्षितिजी त्या मग लाली फुलली
नवोन्मेषे, उत्साहाने,
नवसंकल्पाची गुढी उभारू चला //
कष्टक-याला देऊ भाकरी
सुशिक्षिताला मिळो चाकरी
नीतीमत्तेच्या व्यवहाराची
गुढी उभारू चला //
सत्तालोलुप संधिसाधूंनी
सत्तास्थाने दूषित केली
मरणोन्मुख त्या लोकशाहीला,
नवसंजीवनी देऊ चला //
रामराज्य ते दूर राहिले
शिवशाहीचे बुरुज भंगले
दिशाहीन या युवाशक्तिला
नवप्रेरणा देऊ चला //
महागाईचा असूर मातला
भ्रष्टाचारी आदर्श झाला
जाळुनि, पुरुनि भ्रष्टाचारा,
सचोटीची ती गुढी उभारु चला //
सुविचारांची बाग फुलवू या
जातियतेला थारा नच द्या
भारतीय ही जात आमुची,
माणुसकीचा धर्म जागवूं चला //
नववर्षांच्या शुभेच्छांसह,
नवसंकल्पांची गुढी उभारु चला //
रचना : स्वाती दामले. बदलापूर
संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सर्व कविता सुंदर
नव वर्ष आरंभ निमित्य सर्व कविता छान .ऋतू बदल आणि बहरत जाणारा निसर्ग , रामराया चे आगमन स्मरण ,निश्चय ,संकल्प याची गुढी सर्व खूप छान शब्दात सर्वांनी व्यक्त केले .