गुरुकृपा संस्थेला यंदाच्या गुढीपाडव्याला तीस वर्षे पूर्ण झाली. १९९४ पासून सातत्याने ही संस्था सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहे. मुलांच्या तोंडातल्या शिव्या कमी व्हाव्यात म्हणून सुभाषा अभियान, मुलांचा मोबाईलचा अतिरेक कमी व्हावा म्हणून मोबाईलकडून मैदानाकडे, मुलांमध्ये सैनिकांची शिस्त यावी आणि सैनिक व नागरिक यांच्यात जिव्हाळा वाढावा म्हणून सैनिक नागरिक दोस्ती अभियान चालवले जाते.
सैनिकांसोबत अनेक कार्यक्रम घेतले जातात. पोलिस आणि नागरिक यांच्यात जवळीक वाढविण्यासाठी पोलीस नागरिक दोस्ती अभियान राबविले जाते. माणसाच्या मनात आशा आणि हिम्मत जागृत व्हावी यासाठी ‘हिम्मत का तराना’ हा जुनी गाणी आणि शेरोशायरीचा कार्यक्रम अनेक वृद्धाश्रमांमधून, गृहरचना संस्थांमधून, तसेच सैनिकांसमोर सादर केला जातो . असे अनेक उपक्रम गुरुकृपा संस्था चालवते. वैदिक ज्ञानावर संशोधन केले जाते. आयुर्वेद, वनौषधी यांचा अभ्यास केला जातो. शाकाहाराचा प्रसार केला जातो. तंबाखूविरोधी अभियान, रक्तदान , नेत्रदान, वृक्षारोपण असे अनेक उपक्रम चालवले जातात.
आजवर सामाजिक व धार्मिक विषयांवर अनेक लोकोपयोगी पुस्तके जनहितार्थ प्रकाशित झालेली आहेत. गुरुकृपा संस्थेच्या या तिसाव्या वर्धापनदिनानिमित्त ‘हिम्मत का तराना’ हा कार्यक्रम सिंहगड रस्त्यावरील ‘वीर बाजी पासलकर स्मारक’ येथे झाला. संजय मरळ, रुचिरा गुरव, श्रद्धा कंगले, रूख्सार अन्सारी, विजय मोडक यांनी प्रेरक व देशभक्तीपर गीते मनापासून गायली.
गुरुकृपा संस्थेचे पुणे कार्यवाह प्रशान्त थोरात यांनी काही सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या कविता म्हटल्या. डॉ. गायत्री सावंत यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.
सरसेनापती बहिर्जी म्हाळोजी घोरपडे यांच्या वारस व ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. अश्विनी घोरपडे गजेंद्रगडकर या आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या.
सरदार माणिकराव नाईक बावने, उद्योजक मुकुंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल नलावडे, कवी चंद्रकांत भालेराव इत्यादींनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
सुजाता चौहान, अनिता देवकर, संतोष शिंदे, वृषाली हळबे, संतोष निरगुडे आदींनी कार्यक्रम नीट व्हावा म्हणून अपार परिश्रम घेतले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800