Monday, December 9, 2024
Homeसाहित्यगूज मनीचे सांगते

गूज मनीचे सांगते

भेटल्या अचानक त्या दोघी
मनातलं बोलू लागल्या.
सुख दुःखाच्या कहाण्या
मोकळेपणी सांगू लागल्या …१

रुतला काटा आवलीच्या पायात
कळ उठली रखुमाईच्या हृदयात
स्त्रीच जाणते स्त्रीहृदयीचे दुःख
वेदना सारख्याच असतात स्त्रीमनात …२

मी आपली एकली गाभार्‍यात
नाथ भक्तांच्या गराड्यात
काय करु या नादिष्टपणाला
विचार नुसते मनातल्या मनात …३

सदा भक्तांच्या वारीत रमलेले
संसाराकडे जरा लक्ष नाही
माझा अन् विश्वाचा संसार
मलाच करावा लागतो बाई !…४

रखुमाई मी काय म्हणावे ?
माझी वेगळी व्यथा कथा
मी चालली संसारात बुडत
पाण्यावर तरंगत येते गाथा…५

कसा करावा बाई मी संसार ?
असार संसाराकडे लक्ष नाही
मुखी विठ्ठल विठ्ठल, हरी हरी
घराशी बुआंचा संबंध नाही…६

विठूरायाचे सदा लागले ध्यान
विठ्ठलाची भक्ती भजन पूजन
तुकाराम महाराज संत महान
अभंग गाथा भक्तीरंग किर्तन…७

सारे पंढरीनाथ म्हणून संबोधतात
रखुमाईनाथ कुणी म्हणत नाही
माझी ओळख काय ग आवली
मी आपली एकटीच उभी राही…८

“विठ्ठल विठ्ठल” वेड भक्तांना
भक्त विठ्ठल रगाड्यात रमले
भक्तांच्या भक्ती पायी नाथ
रखुमाईला किती सहज विसरले…९

ही आवली श्रीमंताची लेक-सून
भक्तीपायी घराचे वासे फिरले
या बुआच्या दान धर्मापायी
घरात सदा फाके पडू लागले…१०

रखुमाई तुम्ही किती दानधर्म करता
तरी तुमचे ऐश्वर्या सरत नाही
आमच्या बुवाच्या दानधर्मापायी
घरात सामान काही उरत नाही…११

संताची पत्नी लेकरांची माता
दोन्ही भूमिका कशा करु ?
महाराजांचा नजराणा वापस केला
मुलांना काय खायला देऊ ?…१२

पंढरीनाथ पंढरीचा राजा
तू रखुमाई पंढरीची राणी
दानशूर संत तुकारामाच्या
उजाड घरची मी गृहीणी…१३

काय सांगू बुआंचे आमच्या
विठ्ठल भक्तीत सारे हरवले
संसारकथा रखुमाईला सांगतांना
आवलीचे मन किती दुखले…१४

निस्सीम भक्त भक्तांची काळजी
पंढरीनाथ आपल्या भक्तात रमले
काय सांगू आवली मनाची व्यथा
पत्नीला आपल्या सहज विसरले…१५

एकनाथांकडे पाणी भरले
पेलाभर पाणी कधी दिले नाही
जनीला मदत केली प्रेमाने
पत्नीला कधी विचारले नाही..१६

पत्नीच्या भरोशावर संसार टाकून
आपल्यापुरते जगून महान होतात
आपण आणि आपले अख्खे कुटुंब
हाल अपेष्टा दुःख साहत राहतात…१७

भजन पूजन भक्तीत लीन
विठूरायात तल्लीन होऊ लागले
नाही कसली चिंता सदा भक्ती
विठ्ठल नामात रात्रंदिन रमू लागले…१८

भक्ती भजन किर्तन पूजन
बुआ भक्तांचे देव झाले
मी आवली कर्कशा म्हणून
जनाने ध्यानात ठेवले…१९

आवली पुंडलीकाने वीट
नाथासाठी एकच फेकली
युगे अठ्ठावीस ऊभे ठेवून
मला बाकी एकली ठेवली…२०

रखुमाई ऽ दानवीर निरासक्त
संताची पत्नी होण सोप नाही
आवली ऽ भक्ताच्या परमेश्वराची
पत्नी एकलेपणाचे दुःख साही …२१

भेटल्या अशा रुक्मिणीआवली
कैफियत पत्नी संसाराची सांगते
स्त्रीची मैत्री होते कुठेही कधीही
स्त्रीमनात भावना एकच असते…२२

शिदोरी घेऊन आलीस बुवांसाठी
आवली जपून जा पतीकडे पर्वतावर
नवर्‍यापायी हालअपेष्टा सोसून
आत्मिय प्रेम करते पत्नी पतीवर !…२३

किती होवो वाद, विवाद, विरोध
पत्नीच्या मनात काळजी प्रेम असते
दुःख अपमान कष्ट सारे पचवून
पतीकरिता पत्नी समर्पित असते…२४

— रचना : मीना खोंड. अध्यक्ष, अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्था, हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. नमस्कार…सुंदर रचना, स्त्रीची मैत्री स्त्रीशी, पती करिता पत्नी समर्पित असते ,….विविध पैलू पाहिले कवितेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments