लग्नापूर्वी अनेक वेळा कोकणाबद्धल वाचलं आणि ऐकलं होत. लग्न झालं आणि प्रत्यक्ष कोकणात गेले आणि कोकणाचा अनुभव आला.
आमचे गाव देवरुख. सर्व बाजूनी डोंगरांनी वेढलेलं, निसर्ग सौदर्यानी नटलेलं. आमचं घर खालच्या आळीत होतं.आजूबाजूला आंब्याची आणि फणसाची मोठाली झाडे होती. मी आधी कधीच फणसाचं झाड पाहिलं नव्हतं. मला अप्रूप वाटायचे. अशा या शांत परिसरात आमचे कौलारू घर आहे. शेजारी गोठा, मागील दारी थंडगार पाण्याची खोल विहीर. रहाटाने पाणी काढता येत नव्हते पण हळू हळू शिकले.
आंबे, फणस, काजू, जांभळं, करवंद रोज सकाळी दारावर विकायला येणाऱ्या कुळवाडी बायकांकडून घासाघीस करून आबा (सासरे) भरपूर आंबे, फणस घेत असत.
घरासमोर अंगणात पारिजातकाचे झाड होते. त्याचा मंद गंध सर्व परिसर सुवासिक करत असे. सकाळी सुंदर सडा पडलेला असायचा. गुलाब, आबोली, सदाफुली, जाई , जुई यांनी अंगण नटलेले असायचे.रोज सकाळी सडा सारवण केल्यावर मन अगदी प्रसन्न व्हायचे. सकाळी सकाळी आईंनी (सासूबाई) भरपूर दुध, साखर, आलं घालून केलेला चहा प्यायला की कामाला जोश यायचा.
आमच्या आई खूप प्रेमळ होत्या. लग्न होऊन घरी आल्यावर घरच्या सर्व चाली रिती प्रेमाने सांगायच्या. आमच्याकडे जातं होतं, त्यावर भाजणीच्या वड्याचं पीठ, मेतकूट, डांगर वगैरे दळायच्या. दुपारची डुलकी झाली की त्यांचा हा कार्यक्रम असायचा. मी ही त्याना हातभार लावायचे. आमच्या सर्वांसाठी त्या हे सर्व आवडीने करत असायच्या. सुकाम्बीचे लोणचे, मिरचीचे लोणचे, पापड, आंबा पोळी, फणस पोळी हे सर्व त्या करून ठेवायच्या. आम्ही परत निघालो की आम्हाला भरभरून द्यायच्या.
सासूबाई खूप सुंदर, गोऱ्यापान, उंच छान दिसायच्या. कपाळावर लालचुटुक कुंकू आणि डोक्यात नेहमी फुल माळलेल्या, सदा हसतमुख आल्यागेल्यांचे आनंदाने आणि आपुलकीने करायच्या. त्या नऊवारी साडी नेसायच्या. आम्ही मुंबईहून त्यांना साडी घेऊन जायचो. त्या साडीची घडी मला मोडायला सांगायच्या. मला पण ती नऊवारी साडी पाच वारी सारखी नेसायला आवडायचं. नवीन नवीन लग्न झालं म्हणून संध्याकाळी आम्हाला फिरायला पाठवायचे. आई आम्हाला माजघरातील खिडकीतून कौतुकाने पहात असायच्या. बाहेरच्या पडवीत आबा बसलेले असायचे, त्या कधीच बाहेर येत नसायच्या. त्यांच्या खांद्यावरचा पदर कधीच ढळलेला नसायचा.
आमचे आबा तसे थोडे कडक स्वभावाचे, सर्वजण घरातील नाही तर बाहेरचे ही त्यांना जरा वचकून असायचे. पण त्यांना माझं कौतुक असायचे. मी B.A.B.Ed. आहे M.A. करते म्हणून अभिमानाने मित्रांना आणि नातेवाईकांना सांगायचे. ते तलाठी होते. गावातील आणि आजूबाजूच्या गावातील बरेच लोक त्यांना ओळखायचे. ते खूप शिस्तीचे, त्यांना सर्व गोष्टी वेळच्या वेळी लागायच्या. सकाळी अकरा वाजता जेवणाची पाने घ्यावीच लागायची. अकरा पाच झाले की बाहेरच्या आरामखुर्चीतून ऑर्डर यायची. शैला, अकरा पाच झाले ! अजून पान वाढली नाही. त्याचा फायदा पुढे सर्व गोष्टी वेळेवर करण्यात झाला.
आम्ही मे महिन्यात जवळ जवळ महिनाभर देवरुखला सर्व एकत्र बेबी ताई, बाळी ताई त्यांचे यजमान आणि मुलं, दादा वहिनी असे मिळून वीस जण असायचो. आबा आम्ही सर्व येणार म्हणून घरात सर्व सामान भरभरून ठेवायचे. मग रोज भाजणी चे वडे, काकडीचे वडे, थालीपीठ, आळूची भाजी, पाऱ्याची भाजी, उकड गरे, कडव्याची उसळ, नाना प्रकारच्या पदार्थांची रेलचेल असायची. भरपूर दुध, दही तुप खाण्याची मज्जाच मज्जा. जोडीला रोज आंबे आणि फणस असायचे.
मला काही सुरवातीला चुलीवर स्वयंपाक जमत नव्हता. मग प्रेमावहिनी (जाऊबाई) सर्व करायच्या. मी फक्त पोळ्या लाटून द्यायची. वहिनी चुलीवर भाकरी खूप छान आणि मोठ्या करायच्या. अजूनही तो चुलीवरच्या भाकरीचा वास आणि खरपूस चव जिभेवर रेंगाळतेय.
उन्हाळ्यात देवरुखात पाण्याचा त्रास असायचा. आम्ही सर्वजणी मिळून पाणी भरायचो. घरातली काम हसत खेळत करायचो.
वैद्य भाऊजी आणि कोकीळ भाऊजी यांनाही आमच्याकडे खूप आवडायचं. भाचे कंपनी आजोळी आल्यामुळं खूपच मजा मस्ती करायचे. दुपारी आम्ही दोघे भाचे कंपनी बरोबर पत्ते खेळायचो आणि त्यांच्या बरोबर दंगा मस्ती करायचो. दुपारी कुल्फी वाला यायचा. गर्मीतुन थंडगार कुल्फी खायला मस्त वाटायचं. एक दिवस कोळवणला आणि एक दिवस किर्रदाडीला जायचो, वाटेत आंबे, काजू, करवंद पडून खायचो.
रात्री खूप वेळ अंगणात चांदण्याखाली गप्पा मारत एकमेकांची चेष्टा- मस्करी चिडवा -चिडव करत मस्त दिवस जायचे. आमच्या भावंडात भांडण तंट्याना, हेवे दावे यांना वावच नाही. ह्यांना आणि दादांना (मोठे दीर) तर गावातले लोक राम लक्ष्मण म्हणतात. असं आमचे आदर्श कुटुंब आहे.
असे मस्त मजेत दिवस जात असताना सुट्टी कधी संपायची ते समजायचं नाही. मग एक एक जण जायला निघालो की आई आबांच्या डोळ्यातील गंगा यमुना थांबत नसायच्या. आमचे पण पाय जड व्हायचे. परत लवकर येऊ असे सांगून भरल्या अंत:करणाने निरोप घेत असू. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
— लेखन : सौ. शमा मांगले. नवी मुंबई
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
दिदि .. खूपच छान लिहिलंयस . घराचे आणि कुटुंबातील सर्वांचे वर्णन हुबेहुब.सासुबाई खरेच सुंदर आणि टापटीप रहायच्या . ही माझ्या देवरुख भेटीची छान आठवण तरळुन गेली. आंबे फणस खाण्याची मजा औरच .( स्वानुभव) अशीच लिहीती रहा दिदि.
वाह शमाताई मांगले मॅम
कोकण, तेथील घर, माणस सगळ डोळ्यापुढे उभे केलत की! धन्यवाद अलका मॅम छान लिहित करता तुम्ही नवनव्या व्यक्तींना. आता आपल्या बद्दल पण लिहा की
👌👍