ग्रामीण भागातील महिला अशिक्षित किंवा अडाणी नसतात. त्या व्यवहारकुशल व हुशार असतात. स्वावलंबी असतात. त्यांना घरात व बाहेरही सन्मानाने वागवायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या मनस्विनी प्रभुणे यांनी केले.
गोव्यातील ताळगाव येथील साहित्यलेणी प्रतिष्ठानतर्फे पणजीतील साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त साहित्यलेणी प्रतिष्ठान, बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली या संस्थातर्फे गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सहकार्याने सहा महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन लेखिका मनस्विनी प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या विभागीय सचिव चित्रा क्षीरसागर, साहित्यसेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर व साहित्यलेणी प्रतिष्ठानचे प्रकाश रामचंद्र क्षीरसागर उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आपण सामाजिक कार्यात व लेखनात नवोदित होतो त्यावेळी कुणीतरी आपला सन्मान करावा, पाठीवर कौतुकाची थाप द्यावी असे सतत मनातून वाटायचे. स्त्रियांनी स्त्रियांचा सन्मान करावा, या उद्देशाने दहा वर्षांपूर्वी साहित्यलेणी प्रतिष्ठानने कर्तृत्ववान महिलांचा प्रवास हा उपक्रम सुरू केला. दरवर्षी पाच ते सहा महिलांचा सन्मान केल्याचे चित्रा क्षीरसागर म्हणाल्या.
यावर्षी कविता प्रणित आमोणकर (पत्रकारिता), रजनी अरुण रायकर (राजकारण), नंदा बिभिषण सातपुते, नजराना दरवेश (समाजकार्य), शुभदा च्यारी (साहित्य), सुरेखा शेखर खांडेपारकर (गृहिणी) यांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
शर्मिला प्रभू यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांनी आभार केले.
वंसकर यांनी उपक्रमाची प्रशंसा केली. चित्रा क्षीरसागर या धडाडीने काम करतात. कोणतीही जबाबदारी त्यांच्यावर दिली तर ती त्या यशस्वीपणे पूर्णच करतात, असे वंसकर म्हणाले.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800