Welcome to NewsStoryToday   Click to listen highlighted text! Welcome to NewsStoryToday
Thursday, July 17, 2025
Homeसाहित्य“ग्रंथ समीक्षा"

“ग्रंथ समीक्षा”

|| दत्तोपासक संत सर्वज्ञ श्री दासोपंत ||

या सनातन देशात अनेक संत, महात्मे अन् थोर सत्पुरुष होऊन गेले. विशेषत: महाराष्ट्रातील मराठवाडा हा प्रदेश “संत भूमी” म्हणूनच आजही ओळखला जातो

.या संतांच्या मांदियाळीत
१) आद्यकवी मुकुंदराज, अंबाजोगाई, जि.बीड‌.
२) चक्रधर स्वामी, पैठण, जि‌. छत्रपती संभाजीनगर.
३) संत ज्ञानेश्वर महाराज, आपेगाव, जि.छत्रपती संभाजीनगर,
४) नामदेव महाराज, नरसी बामणी, जि.परभणी.
५) संत गोरा कुंभार, तेरढोकी, जि.धाराशिव.
६) संत विसोबा खेचर, औंढा नागनाथ, जि.हिंगोली.
७) संत भानुदास महाराज, पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.
८) संत एकनाथ महाराज, पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.
९) जनार्दन स्वामी, दौलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर
१०) रामदास स्वामी, जांब जि. जालना.
११) मन्मथ शिवलिंग स्वामी, नेकनूर, जि.बीड.
१२) लक्ष्मण महाराज, आष्टी, जि.जालना.
१३) संत शेख महंमद बाहेर, जि.जालना.
१४) दासोपंत, अंबाजोगाई, जि.बीड.
१५) आद्यकवी महदंबा, पूरी पांढरी, रामसगाव, जि.बीड.
१६) संत मुक्ताबाई, आपेगाव, जि.छत्रपती संभाजीनगर.
१७) संत जनाबाई, गंगाखेड जि. छत्रपती संभाजीनगर.
१८) संत बहिणाबाई, शिऊर, देवगाव, रंगारी,जि. छत्रपती संभाजीनगर.

आदी स्त्री-सत्पुरूष संतामध्ये दत्तोपासक “दत्तोपासक संत सर्वज्ञ श्री दासोपंत” यांचं नाव आवर्जून घ्यावे लागेल. अशा या संताच्या समग्र जीवनावर यथार्थ असा चरित्रात्मक मागोवा हैदराबाद येथील प्रख्यात विदुशी डॉ. सौ.नयना जोशी देशपांडे यांनी “दत्तोपासक संत सर्वज्ञ श्री दासोपंत” या ग्रंथात घेतला आहे.

या ग्रंथात एकूण चार भागात विभागणी केली असून त्यात पहिल्या भागातील “दत्तोपंतांची चरित्र गाथा” प्रकरणात ‘दत्तोपंत प्रस्तावना’ या लेखात लेखिकेने लिहिले आहे की, “नारायणपेठे”त (हे गाव पूर्वीच्या हैदराबाद राज्यातील मेहबूब जि.तेलंगणा प्रांत) जन्मले. प्रतिभाशाली संत उदार, त्यागी, विरक्त योगी कविवर्य दासोपंत” असं वर्णन केले आहे.

दासोपंत हे संत एकनाथ महाराज समकालीन (१५-१६व्या शतकात) संत होय. संत श्री एकनाथ, श्री जनीजनार्दन, श्री विठा रेणुकानंदन आणि संत दासोपंत या पंचायनापेकी फक्त सामान्यांना संत श्री एकनाथ महाराज यांच्या जीवनचरित्राची माहिती आहे; यातील अन्य संतांची म्हणावी तशी माहिती बहुधा नसावी.
यास्तव प्राचीन साहित्यात संत दासोपंत यांचे जीवन चरित्र त्रोटक स्वरूपात तुरळक उल्लेख आढळतात. ’भक्त विजय’या ग्रंथात दत्तोपंतांचा उल्लेख केला आहे तर “भक्तिलीला अमृतात” (१७७७) दत्त अनुग्रही म्हणून श्री एकनाथ व श्री दासोपंत यांची पैठणला भेट झाल्याचा उल्लेख केला आहे. जयरामसूत आणि गिरीधर या समर्थ संप्रदायातील दोन ग्रंथकारांनी अनुक्रमे आपल्या संतमालिकेत आणि ‘समर्थ प्रताप’या ग्रंथात दासोपंत आणि त्यांच्या गीतांचा उल्लेख केला आहे. केशव कवि यांनी आपल्या “श्री एकनाथ चरित्रात’श्री एकनाथ व दासोपंत यांच्या अंबेजोगाई येथे भेट झाल्याचा उल्लेख केला आहे.असो…

तात्कालीन हैदराबाद राज्यातील तेलंगण प्रांतात मेहबूब नगर मधील ‘नारायणपेठ’ वा’ नारायणखेड’ येथे ब्राह्मण दिगंबर व पार्वतीबाई देशपांडे या दाम्पत्याच्या पोटी भाद्रपद वद्य ८ शके १४७३,(इ.स.१५५१) सोमवार रोजी दासोपंताचा जन्म झाला.घरी गजांत लक्ष्मी. या बालकांचे ’दासोदिंगबर’ हे नाव ठेवले. घराण्याच्या रूढी-परंपरेप्रमाणे वयाच्या पाचव्या वर्षी उपनयन संस्कार झाले. मुळातच तल्लख बुद्धी, एकपाठी असलेल्या या बाळाने चारही वेद मखोग्दत केले. येथील स्थानिक असलेल्या आम जनते कडून कर (सारा) वसुलीचे काम दिगंबर पंत करीत असत.
दिगंबरपंत हे वतनाने वतनदार देशपांडे होते. ते नियमितपणे सरकारी खात्यात वेळेत कर भरीत असत. पण त्यावर्षी बेदर (हल्ली बिदर) येथे अकाली पडलेल्या दुष्काळामुळे दिगंबर पंताना कर वसुलीची रक्कम (सारा) ’अली बारिदशहा’ बादशहाच्या खजिन्यात वेळेवर जमा करता आली नाही यास्तव बादशहाने पंताना दरबारात हजर राहण्याचे फर्मान काढले. त्याप्रमाणे पंत आपल्या गोंडस, राजस, सुकुमार पुत्रासह दरबारात हजर झाले. आपण वेळेवर कर (सारा) का जमा करू शकलो नाही याची कारणं सांगितली ती म्हणजे दुष्काळ वगैरे…

पण बादशहा ऐकूनच घेण्याच्या ‘मनस्थितीत म्हणा’ तयार नव्हते, ’म्हणाले‌, ‘एका महिन्याच्या आत जर कराची रक्कम दोन लाख होन सरकारी खजिन्यात जमा जर नाही केली तर आपल्या या मुलास ओलीस ठेवून घेईन. असं म्हणत बादशहाने दरबार बरखास्त केला. या राजस कुमारास पाहताच बादशहाच्या मनात अनेक विचार आले खरे.. अर्थात तो सर्व सारा दासोपंत खजिन्यात जमा होईस्तोवर वाट पाहाणे आले. बादशहाला खात्री होतो की, ‘दासोपंत एवढी रक्कम काही जमा करू शकणार नाही.. मग आपण हा पुत्र आपला ताब्यात आल्यावर त्याची सुंता करून त्याला इस्लामची दीक्षा द्यायची. आपला वारस म्हणून या गादीवर बसवायचे..कारण बादशहा निपुत्रिक होता. अमंलबजावणी तात्काळ सुरू केली व त्याप्रमाणे या गोंडस राजस कुमारास बादशहाने आपल्याकडे ‘ओलीस’ म्हणून ठेवून घेतो म्हणाले आणि मनात विचार येताच योग्य वेळ येताच दरबार बरखास्त झाल्याचे जाहीर केले. शेवटी खिन्न मनाने दिगंबर पंत आपल्या घरी आले. दरबारात घडलेल्या या घटनांचा इति-वृत्तांत आपल्या पत्नीला सांगितला. त्या माऊलींच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा लागल्या. दोघेही मनोमन खूप हादरले. पण इलाज नव्हता.

बादशहाच्या फर्मानाप्रमाणे पंतांना सारा भरण्यासाठी आपल्या कडील साऱ्यांच्या रुपात साठविलेले धान्य त्या दुष्काळी भागातील आम जनतेला मानवतेच्या दृष्टिकोनातून वाटून टाकले, खरे.आपला लाडका पुत्र बादशहाच्या नजर कैदेत असे पर्यंत बादशहा त्यांना दैनिक खर्चासाठी भत्ता म्हणून बादशहाने दासोपंताना ₹१/- देण्याची व्यवस्था करून ठेवली होती. सरकारी सारा वेळेवर न भरल्या कारणाने त्यांना आपल्या पुत्रास बादशहाच्या हवाली ‘ओलीस’ म्हणून ठेवावे लागले.
धार्मिक वृत्तीचे दिसोपंत हे बेदर (बिदर) येथे असलेल्या प्राचीन नृसिंहाचे जागृत असे ‘झरणी नृसिंहाचे पवित्र स्थान’आहे.. दासोपंत दररोज या क्षेत्री जाऊन स्नान, उपास तसेच गोर गरिब, ब्राम्हणांना दान करीत असत. या क्षेत्रातील सर्वत्र विशेष करून बादशहा या राजस कुमारांच्या रुपवान, देखण्या कुमाराच्या निखळ सौंदर्याने मोहित झाले होते.

दासोपंत आपल्या लवाजम्यासह रोख रक्कम दोन लाख होन, सुपुत्रास दरबारात हजर होण्यास निघाले. वाटेत आक्रित घडले. या पुत्राला पाहून निपुत्रिक बादशहाने ठरविले आता आपल्या गादीचा वारस लाभला. दरबारात दासोपंत आल्याची वर्दी दिली. बादशहाने त्या कारकुनाला दरबारात हजर राहण्यास फर्मान काढले. त्या प्रमाणे हातात काठी, डोक्यावर मुंडासे अशा वेशात ‘दत्ताजी पाडेवार’ हे नाव धारण केलेल्यानी बादशहा सांगितले की दिगंबरपंतानी आपली सर्व रक्कम देऊन मला पाठविले आहे.
बेदरच्या बादशहाला दुसरा पर्याय नसल्याने त्यांनी बादशहाने दासोपंताना नवरत्नाचा हार, दागिने, कपडे आदी मानमरातब करून “दत्ताजी पाडेकर” यांची खास पालखीतून रवानगी केली. ही बातमी साऱ्या आमदनत पसरली. सर्वाना आनंद झाला. हे असं अवचित कसं घडलं.. ? त्याचं असं झालं..

सुपुत्र एका पालखीत व दत्तोपंत एका घोड्यावर असं मजल दरमजल करीत बरोबर निघाले. पुढे जात दत्तोपंतांचा घोडा खूप पुढे गेला व हा सुपुत्र मागेच राहिला. सुपुत्र कुमार काही वेळाने नारायनपेठ येथे आपल्या घरी पोहोचला. त्याची आई काळजीने शोकाकुल झाली. रडून रडून त्या माऊलीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. सर्व जण चिंतातुर झाले.. अशा वेळी अचानक बातमी आली की, तुमचा मुलगा तर पालखीतून येत आहे. त्याच्या भोवती खूप गर्दी झाली होती. जेव्हा दासोपंत त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि आई वडीलांना नतमस्तक होऊन वंदन केले. हा आनंद ओसरल्यावर दासोपंताना विचारले, ”वाघाच्या जबड्यातून अशी कशी सुटका झाली ?, तेव्हा कुमारानी घडलेला प्रसंग सांगितला.

दिगंबरपंताना तर आश्चर्याचा धक्का बसला. कारण दत्ताजी पाडेकर या नावाचा त्यांच्या कडे कोणी सेवक नव्ह्ता अन् एवढी मोठी रक्कमही नव्हती बादशहाला देण्यासाठी. नंतर दासोपंतांच्या लक्षात आले की, “साक्षात दत्तप्रभुनीच आपल्याला दर्शन दिले. पण आपण ओळखू शकलो नाही. आणि ज्याच्यासाठी दत्तात्रेयांनी हा अवतार घेतला होता तो म्हणजे या ग्रंथाचे नायक ‘दासोपंत’ पुढे हेच दासोपंत “संत सर्वज्ञ दासोपंत महाराज” म्हणून ख्यातकीर्त झाले. या प्रसंगानंतर दासो मात्र अस्वस्थ झाले. दासोपंतांच्या मनात विचारांचे काहूर माजले. आपल्या आईवडिलांनी आपल्याला हे शरीर दिले खरे पण आपले आईवडील अत्रीपुत्र दत्तात्रेयच आहेत; तोच माझा पालनकर्ता, त्यांच्या सेवे, त्यांच्या शोधातच माझा हा अनमोल जन्म आहे अन् हे मी तो उपयोगात आणला पाहिजे तोच माझा खरा स्वामी आहे. त्याचे दर्शन हीच माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे आणि या ध्येयाने पछाडलेल्या दासोनी कुटुंबाचे सर्व पाश तोडून दत्तात्रेयांचे दर्शन, त्या सच्चिदानंदाचा शोध घेत घेण्यासाठी घर सोडले. त्यांनी ऐकलेले अन् माहितीच्या आधारे दत्तात्रेयांचा निवास असलेल्या अत्रीपत्राच्या शोधात सह्याद्री पर्वतावरील ‘मातापूर’ला प्रयाण केले. वाटेत कोणी चौकशी केली की आपण कोण, कोठे जात आहात ? त्यावर दासो म्हणत, ’’अवधूत माझा मायबाप आहे” त्याच्याशिवाय मला कोणी नाही.

तत्पूर्वी ते हिलालपूरला आले. तेथून चिटगोच्या डागुळजी मुक्कामी कृष्णाजीपंत कुलकर्णी यांची घेतली. त्यांनी हा बालयोगी पादासोपंत या अजानबाहु जीवंत मूर्तीला पाहून कुलकर्णी यांनी श्रध्दापूर्वक भक्तीभावाने या बालयोग्याचे मनोभावे दर्शन घेतले अन् अनुग्रह घेण्याची इच्छा व्यक्त केली. ‘आपले हे मनोरथ पूर्ण होईल’ असा आशीर्वाद देऊन ते प्रेमपूरला आले. तेथील त्यांच्या कुलदैवताचे दर्शन घेऊन गोदातीरी नंदीग्रामला (नांदेड) आले. मजल दर मजल करीत माहूरगड (मातापूर) दत्तजननी अनसूयेची आराधना केली. सह्याद्री शिखरावरील श्री दत्तात्रेयाच्या सिध्दस्थानावर कठोर एक तप बारा (१२) वर्षे तपश्चर्या केली. या कठोर साधनेच्या नंतर श्री प्रभू दत्तात्रेयचा दृष्टांत झाला, की गंगातीरी राक्षसभवनला प्रसाद मिळेल तो स्वीकारून पुढील कार्यभाग करावा. श्री अवधूताचे दर्शन झाले. ध्यान करीत त्यांनी अनुष्ठान संपवून राक्षसभवनला पोहोचले. गोदावरीत स्नान झाले.त्या नदीच्या पात्रात असलेल्या वाळवंटात बसल्या ठिकाणी त्यांना वाळू बाजूला सारून ठेवताना त्यांच्या हातात ‘पादुकांचा’ स्पर्श झाला. त्यांना आनंद झाला. धन्य झाले. अवधूताचे साकार स्वरूपात दर्शन झाले. काही काळ साधना केली. त्यावेळी त्यांनी प्रभू श्री दत्तात्रेयाला आपले गुरू केले. श्री दत्तदर्शनाने अन् पादुका प्राप्तीने ‘डाकुळजी’ ला जाऊन कृष्णाजी पंताना अनुग्रह देऊन कृतार्थ केले. आजही ती मूर्ती “डाकुळजी’’ तसेच एक दत्त मंदिर सुद्धा आहे.नंतर वाणीसंगमी काही काळ व्यतीत केला. यांच्या जीवनात सोनियाचा दिवस उगवलामुळे त्यांच्या सर्व चिंता दूर झाल्या.

या एक तपाहून त्यांच्या समस्त कुटुंबातील आईवडील हे दिगंबरपंत आणि पार्वती तसेच पत्नी जानकीबाई यांच्या जीवाला घोर लागला होता. या कालावधीत ना ठाव ठिकाणा ना..‌ शेवटी त्यांच्या पत्नी जानकीबाई यांनी सौभाग्य चिन्हांचा करणे हे क्रमप्राप्त झाले. या धर्मकार्यासाठी त्यांनी आपल्या सरंजामासह वाणी संगमात प्रस्थान ठेवले..
गंगेच्या पलीकडे दिगंबरपंतांचा पडाव होता. व्याघ्रेश्वर देवळात त्यांचा मुक्काम होता. चमत्कार म्हणा वा योगायोग म्हणा, आपली पूजा अर्चा करीत असतांनाच त्या अनोळखी माणसांने दासोपंतांनी पाहिले, गत स्मृतींना उजाळा मिळाला. ही मंडळी येथे तिथे का, कशा करिता आले असावे याचा अंदाज करून सहजपणे त्यापैकी एकाला सांगितले, ”आपण यजमानांना सांगा, की ज्या कार्यासाठी आपण येथे आला आहात ते कार्याला स्थगिती द्या. ”त्या इसमासह अन्य जनांना जरा अचंबा वाटला. ही बातमी वाऱ्यासारखी यजमाना पर्यंत पोहोचली.यजमानांनी या बातमीची सत्यता अन् मूळ शोधून काढले. व्याघ्रेश्वराच्या मंदिरात दासोपंत आणि त्यांच्या आईवडिलांची भेट झाली. या दैवी शक्ती/लीलयाने सर्वांनाच आनंद झाला. दिगंबररावांनी दासोपंतांना घरी येण्याचा प्रेमळ विनंती केली पण दोसोपंतांना नकार दिला. आई वडीलांप्रमाणे देवांचेही ते लाडके पुत्र झाले होते. दिगंबरपंतांनी विनंती केली, ”आता या उतारवयात आम्ही तुला सोडून कसे राहू ?” असं म्हणत त्यांनी आपल्या मातापिता, पत्नी यांना आपल्या कडे ठेवून घेतले. आपल्या कारभाऱ्यास आपल्या संपूर्ण मालमत्ता, वतनदारी आदींचे ‘दानपत्र’ त्यांच्या नांवे लिहून त्याला परत पाठविले. यापुढे आपल्या वंशातील कोणीही नारायणपेठला जाता कामा नये असा निर्बंध घातला.

अंबेजोगाईचे देशपांडे हे सितोपंत हे धर्मपरायन सश्रद्ध होते. “नजरानजर होताच माझी समाधी जैन लावेल त्यालाच मी गुरु करणार” असा संकल्प केला होता. नेहमी प्रमाणे स्वारी आपल्या लवाजम्यासह देवदर्शनाला निघाली. श्री गणेशाचे मनोज्ञ दर्शन घेतले. हे पाहुणे पाहून चौकशी केली. दिसोपंतांची दर्शन होताच आक्रित घडले !

काही क्षणानंतर सजग होऊन त्यांनी दासोपंतांना केले..हेच ते दासोपंता़चे प्रथम व मुख्य शिष्य झाले.

दासोपंतांना एक चांगला, विश्वासू, शिष्य लाभल्याने त्यांची अन्य कामकाज, यामुळे होणारी धावपळ, दगदग यातून सुटका मिळाली. आपल्या शिष्याच्या प्रेमळ आग्रहामुळे त्यांनी आपले संपूर्ण जीवन ‘अंबेजोगाईत’ व्यतीत केले. माता शारदेचे महासत्र, भजन-पूजन, उपासनादी कार्य श्रद्धा भक्तीभावाने करीत असत. ‘ढब्बू’ पैशाच्या वजनाची शाई लिहून संपवायची हाच त्यांचा नित्यक्रम. मराठी सारस्वतांसाठी त्यांनी अनेक दालने खुली शिवाय समृध्दही करून दिली. गीतार्णव, गीतार्थचंद्रिका, उपनिषदावर भाष्य, पदार्णवादी अशी केक उत्तम, उत्कृष्ट अशा ग्रंथांची निर्मिती केली.

आपल्या अवघ्या ६४ वर्षाच्या आयुष्याची सांगता माघ वंद्य ६ शके १५३७ (इ.स.१६१५ त्यांनी अंबेजोगाई जि‌.बीड येथे जिवंत समाधी घेतली) या दिवशी श्री दत्तात्रेयाच्या पुण्यस्वरुपात विलीन झाले. नृसिंहतीर्थावर दिसोपंतांची प्रशस्त समाधी घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलांना अन् शिष्य संप्रदायाला केलेला हा काव्यात्मक उपदेश असा:

“आता एक करा अमार्ग
विसरा सन्मार्ग चित्ती धरा |
जो हा देह बरा नसे जववरा
तो तो भजा ईश्वरा |
सत्कर्मे आचरा,
विलंब न करा,
संसार वेगीतरा |
अत्रीच्या कुमरा स्मरा,
गुणपरा दत्तात्रया शंकरा ||

अशा या दत्तात्रेयावतार “दोसोपंत“ यांच्या चरित्रात्मक जीवनाचा सारांश :-

पाचव्या वर्षी मुंज.

१६व्या वर्षी गृहत्याग.

१२-१५ वर्षे तपश्चर्या.

वयाच्या ४० वर्षांत पर्यंत अंबेजोगाई आणि त्यानंतर अखंड. दोन वर्षे मराठी भाषेची अविरत सेवा.

समाजकल्याणासाठी असिधाराव्रत.

‘ संसार करावा नेटका ‘ या उक्तीप्रमाणे यशस्वीपणे पार पाडला.

या ग्रंथात चित्रकार, साहित्यिक, त्यांची शिष्य परंपरा, तेलगू शिष्य परंपरा, संत एकनाथ आणि दासोपंत, पासोडी,नामसस्यरणी (अष्टक आणि श्लोक), पासोडी आणि विवरण दृश्ये यांचा अभ्यासपूर्ण असा मागोवा ग्रंथकार डॉ नयना जोशी देशपांडे यांनी घेतला आहे.

ग्रंथाच्या दुसऱ्या भागात दत्त संप्रदायाचे स्वरूप, अवतार प्रयोजन, इतिहासातकालिन आणि पुराणातील दत्तात्रेय, दत्त जन्म कथा आणि आख्याने, नीवास आणि विहार, दत्तमूर्तीमधील प्रतिकूल, दत्ताचे गुरू, उपनिषदातील दत्तात्रेय, वेदिक, तांत्रिक, योगिक दत्तात्रेय, दत्त संप्रदाय, दत्ताचीआरती,श्री गुरूचरित्र, दत्तात्रेय आणि त्रिमूर्ती कल्पना, एकमुखी आणि त्रिमूर्ती दत्त आणि दत्तावताराचे स्वरूप: उपसंहार याचा अभ्यासपूर्ण असा लक्षवेधी आढावा या ग्रंथात लेखिकेने घेतला आहे.

शेवटच्या तिसऱ्या भागात पंचीकरणात प्रास्ताविक, अधिकार लक्षण, पंचीकरणाचा विषय, पंचमहाभूते, स्थुलदेह, सुक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह, पंच कोष, चार अवस्था. विश्वाची – ब्रम्हांडाची निर्मिती, आत्मा आणि ब्रह्माचे स्वरूप शेवटी संदर्भ सूची या द्वारे या ग्रंथाची इतिश्री केली आहे.

या ग्रंथात स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ श्री राजेंद्रप्रसाद यांच्यासह श्री.न.शे.पोहनेरकर, श्री हनुमंतराव, खासदार, हैदराबाद मराठी परिषदेचे अध्यक्ष श्री रा.ब.माढेकर ही दिग्गज मंडळी ही दुर्मिळ “पासोडी” बघत असतांनाचे छायाचित्र, श्रीदासोपंताचू पासोडींतील हस्ताक्षर, अश्र्वत्थवृक्ष, सर्प, माला, त्रिशूल, ढमरु, शंख, चक्र, कमंडलू, प़चकैव चक्र हृदयाकृती,
स्थूलादिदेहचक्र आणि श्री एकमुखी दत्तमूर्ती, समाधी पूर्वी शिष्यासाठी‌ दासोपंतांनी स्वहस्ते केलेली एकमुखी दत्ताची शाडूमुर्त्री, श्री दत्तोपंतांची समाधि (अंबेजोगाई) अशा दुर्मिळ छायाचित्रांच्या अंतर्भाव केल्यामुळे या ग्रंथास परिपर्णता प्राप्त झाली आहे.

या ग्रंथात श्री प्रमोद वाकनिस, सौ.प्रभावती देशपांडे (ठाणे), सौ.नीलिमा बडवे (हैदराबाद) यांचे अभिप्राय समाविष्ट केले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे श्री दत्त संप्रदायाचे अनुयायी असलेले हुमनाबाद येथील माणिकनगरचे प.पू.श्री माणिक प्रभु महाराज यांचे वंशज प. ‌पू.श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज यांची “श्रीगुरुअवधूत या शीर्षकाखाली आशीर्वादात्मक प्रस्तावना लाभलेली असल्यामुळे या ग्रंथाला एक आध्यात्मिक असे अधिष्ठान लाभले आहे. गुरु आशीर्वाद, श्री दासोपंत, दत्तात्रेयाचे १६ अवतार, अंबेजोगाईचू थोरले व धाकटे देवघर, माकेगांव येथील दत्तमूर्ती, थोरले देवघरातील मूर्ती आणि पादुका, अभिषेकाची मूर्ती, दासोपंत संशोधन मंडळ, अंबेजोगाई,आणि पादुका यांच्या दुर्लभ अन् दुर्मिळ छायाचित्रे लाभल्यामुळे यांच्या सौंदर्यात भर पडली आहे.

मराठीतील अप्रसिद्ध असलेल्या दत्त संप्रदायाच्या दत्तोपासक संत सर्वज्ञ श्री दासोपंत यांच्यावर ग्रंथ लिहून लेखिका डॉ सौ.नयना जोशी देशपांडे यांनी धार्मिक तसेच अध्यात्मिक ग्रंथात अत्यंत मोलाची अशी भर घातली आहे. विशेष म्हणजे बृहन्महाराष्ट्रातील हैदराबाद निवासी असलेल्या सौ.नयना जोशी व देशपांडे यांची ही साहित्यकृती खरोखरच कौतुकास्पद आहे यात शंका नाही.
समस्त दत्त संप्रदाय आणि भाविकांनी हा ग्रंथ अवश्य वाचावा नव्हे तर संग्रही ठेवावा असा आहे.

नंदकुमार रोपळेकर

— परीक्षण : नंदकुमार रोपळेकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Click to listen highlighted text!