आज, १५ मार्च. जागतिक ग्राहक दिना निमित्ताने विशेष लेख..
– संपादक
लोकशाही व्यवस्थेमध्ये शासन कल्याणकारी लोकहिताचे अनेक निर्णय घेत असते. सरकार व प्रशासन यांच्या समन्वयातून सौजन्यांची अंमलबजावणी होत असते. सरकार निर्णय घेण्याचे काम करते व प्रशासन प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असते. यामध्ये जनता, नागरीक, केंद्रबिंदू असतात.
ग्राहक हा राजा आहे. त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. पंरतू प्रशासनाशी सुसंवाद व समन्वयातून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्यास ते सहज सुटले जातात व ग्राहक संघटनांचे काम वाढण्यास मदत होते. अधिका-यांनी प्रश्न सोडवल्यानंतर आपण त्यांची प्रशंसा केल्यास सकारात्मक विचारसरणीचा उपयोग करून आपण आपल्या संघटनेचा जनसंपर्क चांगल्याप्रकारे विकसित करू शकतो. वाढवू शकतो.
जनतेला सामान्य नागरीकांना योग्य सेवा मिळावी यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते प्रबोधन ग्राहक जागृतीचे काम करत असतात. ग्राहक संघटनेचे काम सेवाभावी वृत्तीचे असून विना मोबदला मान अपमान पचवून करावयाचे असते. ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी असते. आपण या संघटनेचे एक भाग आहोत या भुमिकेतून स्वयंपुर्तीने काम केले पाहिजे. अफाट चिकाटी व अखंड प्रवासाने हे सहज शक्य आहे.
ग्राहक चळवळीचे तत्वज्ञान केवळ सांगून ग्राहक पंचायत थांबलेली नाही तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ती चार पद्धतीने काम करीत असते.
- ग्राहक संघटना करून एरवी असंघटित असणा-या ग्राहकांची संघटित शक्ती उभी करणे.
- ग्राहक प्रबोधनाद्वारे त्यांच्या ग्राहकत्वाची, अधिकारी आणि कर्तव्यांची जाणीव त्यांना करून देणे.
- ग्राहक चेतना जागृत होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची रचनात्मक कामे हाती घेणे.
- अन्याय फसवणूक यांचा मुकाबला करण्यासाठी शांततापूर्ण संघर्षात्मक कार्यक्रम हाती घेणे.
ही कामे करीत असतांना “ग्राहक एव राजा” या बरोबरच “राष्ट्र देवो भव” ही कल्पना देखील ग्राहक पंचयतीने उराशी बाळगली आहे. या देशात समतेचा अमृतकुंभ आणण्यासाठी दुष्ट शक्तीच्या सर्वांना पायाखाली रगडून देशाचे जयगान जगात गर्जत ठेवण्यासाठी पक्षिराज गरूडाप्रमाणे आकाशात झेप घेण्याचे स्वप्न ग्राहक पंचायत पाहते आहे.
सुरूवाती पासूनच ग्राहक पंचायतीने काही महत्वाची पथ्ये फार काटेकोरपणे पाळलेली आहेत. कोणत्याही प्रकारच्या पक्षीय राजकारणापासून ग्राहक पंचायत दूर राहीली आहे. ग्राहक पंचायतीच्या कोणाही पदाधिका-याला राजकारणातल्या कोणत्याही निवडणुकीला उभे राहता येणार नाही. असा नियमच ग्राहक पंचायतीने पाळलेला आहे. ग्राहक चळवळीचे काम जनतेची मते मिळविण्यासाठी करण्याचे काम नाही. सेवावृत्तीने एक साधना म्हणून या कामाकडे पाहिले पाहिजे असा दंडक घालून देण्यात आला. ग्राहक पंचायतीच्या हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या वागण्यातून आजवर हे पथ्य विलक्षण कसोशीने पाळलेले आहे.
राजकारणाप्रमाणेच कोणत्याही प्रकारच्या शासकीय निधी किंवा अनुदानापासून ग्राहक पंचायत दूर राहिलेली आहे. अशा अनुदानामुळे एक प्रकारची अनुदान संस्कृती निर्माण होते, त्यातून आपोआप मिंधेपणा किंवा ओशाळवाणेपणा निर्माण होतो. असा अनुभव समाजातल्या अनेक संस्थांमध्ये पहायला मिळतो. कष्टाचा असला तरी हा मार्ग ग्राहक पंचायतीने आजवर स्वतःच स्वीकारला आहे. त्यामुळे ग्राहक पंचायतीचा कार्यकर्ता साधेपणानेव निर्भिडपणे समाजात आपले काम करतांना दिसतो.
सामाजिक प्रश्नांची जाणीव, राष्ट्राच्या हितांना सर्वोपरी मानणे, विधायक मार्गांचा वापर आणि राजकारणापासून दूर राहणे या तत्वांचा ग्राहक पंचायतीच्या आजवरच्या कार्यात महत्त्वाचा वाटा आहे.
ग्राहक पंचायतीचे काम अत्यंत निस्पृह पद्धतीने ग्राहक हित लक्षात ठेवून समाज हित व राष्ट्र हिताला प्राधान्य देऊन आपण करत आहोत. या देशातील शासन व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, न्याय व्यवस्था हि सामान्य नागरीकाचे हित जोपासण्यासाठी आहे. हे विसरता कामा नये. हि सर्व व्यवस्था सामान्य नागरीकांसाठी केली आहे. याचे भान सर्वांनी ठेवणे आवश्कय आहे. या देशाचा नागरीक कोणत्याही शासकीय कार्यालयात गेल्यावर त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळणे हा त्याचा हक्क आहे आणि संबंधीत शासकीय कार्यालयाने ते कर्तव्य प्रामाणिकपणे बजावलेच पाहिजे अन्यथा एखाद्या सामान्य नागरीकाला या देशातील कोणत्याही शासकीय कार्यालयात अपमानास्पद वागणूक मिळाल्यास संबंधीत अधिकारी व कार्यालय प्रमुख यांच्या विरोधात राष्ट्रीय मानवाधिकारी आयोग व राज्य सेवेतील कर्मचारी यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्याकडे तक्रार करून दाद मागता येते. परिणामी शिक्षा होऊन नुकसान भरपाई मिळते.
अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मनाची तयारी केली पाहिजे ग्राहकांच्या समस्या निम्प्रण होण्याचे प्रमुख कारण हे अज्ञान आहे. त्याला आपल्या हक्क व कर्तव्याबाबत जागे केल्यास होणारी फसवणूक थांबली जाऊ शकते. आज सर्वात जास्त कोणाला लुटले जात असेल तर तो म्हणजे “ग्राहक” तुम्ही उठून उभे रहा प्रश्न खाली बसतील हे काम एक दक्ष ग्राहकांची संघ शक्ती करू शकते. लेखनीला धार आली की, भल्या भल्यांना घामाच्या धारा सुटतात. आपल्या समस्या सुटायचे असतील तर आपल्यासाठीच केलेल्या कायद्यांचा आधार घेऊन व्यवस्था सुधारण्यासाठी लिहिते झाले पाहिजे. तरच अर्थव्यवस्थेतील लुटारूंना लगाम घालता येईल. शेवटी एकच सांगावस वाटतं शिवाजी महाराज जन्माला याव्यात तेही आपल्याचं घरात. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन. एफ. केनडी यांनी म्हटले आहे की, “देशाने तुम्हाला काय दिले यापेक्षा तुम्ही देशासाठी काय केले ते महत्त्वाचे आहे.” हा समाज माझा आहे या समाजातील समस्या, प्रश्न सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. समाजासाठी निस्वाःर्थपणे काम करीत राहण्याची एक अलौकीक उर्जा ग्राहक पंचायतीचे काम करीत असतांना मिळते.
लोक म्हणतात यांच्यावर विश्वास ठेवा त्यांच्यावर विश्वास ठेवा पण मी म्हणतो आधी स्वतःवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास असू द्या. सारी शक्ती तुमच्यामध्येच आहे. हे जाणून घ्या आणि ती प्रकट करा. विष नाही, विष नाही असे खंबीरपणे म्हटण्यास सापाचे विष देखील बाधत नाही. तु अनंत आहेस, तुला जन्म नाही, मृत्यू नाही तू अनंत आहे म्हणून तुला गुलाम बनने शोभत नाही. उठ जागा हो ! उभा राहा आणि लढ ! हेच विचार स्वामी विवेकानंदांनी सांगितले आहे. संवादातून समृद्धीकडे हे समीकरण कामात प्रत्यक्ष आणून ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे.
प्रशासनाकडे कुठलाही प्रश्न मांडण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी त्या प्रश्नांचा पूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे. तो योग्य ठिकाणी मांडला जावा. प्रश्न कोणत्या विभागाचा आहे व आपण कुठे मांडत आहोत, याचे आकलन होने आवश्यक आहे. प्रश्न मांडतांना तो मानवतेच्या भावनेने भाषाशैली ह्वयापर्यंत भिडनारी कोमल मृदू असावी. आपण कोणीतरी फार मोठी व्यक्ती आहोत व सर्व प्रश्नांची फक्त आणि फक्त आपणांसच जान आहे. असा अविर्भाव नसावा. कारण समोरच्या व्यक्तीकडे अधिका-याकडे आपनासारखे अनेक जन प्रश्न घेवून येत असतात ते प्रश्न सोडवने त्यांचाही प्रयत्न असतो. कारण ते त्यांचे कर्तव्यच असते. ते त्यासाठी मेहनताना पगार घेत असतात. प्रश्न मांडल्यानंतर तो लगेचच सुटेल असे नाही. तो लगेच सुटावा ही आपली भुमिका चुकीची असू शकते. कारण ते काही किरणा दुकान नाही की आपणांस हवी ती वस्तु लगेच मिळेल. कारण अधिका-यांना देखील वस्तुस्थिती जाणून घ्यावी लागते. यासाठी कार्यकत्यांनी वेळ देवून संयम ठेवने आवश्यक आहे.
प्रश्न मांडल्यावर त्यामध्ये काय प्रगती झाली यासाठी सातत्य व संवाद असावा म्हणजे आपणांस अपेक्षित यश मिळते. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या सुभाषिताप्रमाणे ग्राहक संघटना व प्रशासन यांना एकमेकांच्या समन्वयाने काम केले तर समस्याचा निपटारा नक्कीच होईल. आपण जे काही सेवाभावी वृत्ती घेतली आहे. त्याचाही आत्मीक आनंद मिळेल. ग्राहक संघटना व शासन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण शासनाचा व ग्राहक संघटनेचा हेतू एकच आहे. तो म्हणजे जनतेसाठी जनकल्याण सेवा पुरवीने.
आपण सर्वजण साधन सुचीता माननारे आहोत. आपण जर अरे म्हटलो तर सहाजिकच समोरची व्यक्ती कारे म्हणते हा प्रत्येकाचा स्थायी भाव असतो. त्यामुळे कार्यकर्त्यानी प्रश्न सोडविताना त्या पदाचा व व्यक्तीचा मान सन्मान ठेवून वार्तालाप केल्यास प्रश्न लवकरच मार्गी लागतात व त्याचा उपयोग संघटना वाढीसाठी होवू शकतो.
प्रशासना कडूनही कार्याकर्त्यांनी मांडलेली प्रश्न सुटले नाहीत अशा वेळेस लेखनीचा आधार घेवून आपण माहिती अधिकार, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, दक्षता समिती, वरीष्ठांशी पत्र व्यवहार करून आपण सोडवून शकतो यांची मला खात्री वाटते.
— लेखन : विलास जगदाळे.
मध्य महाराष्ट्र प्रांत सहसचिव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत. अहिल्यानगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800