मुंबई ग्राहक पंचायत चे प्रणेते, मुंबई महापालिकेचे १९६१ ते १९६६ पर्यंत नगरसेवक राहिलेले, दादर- माहीम विभाग जनसंघाचे कार्यकर्ते मधुकरराव मंत्री यांना त्यांच्या सुनबाई सौ विद्या मंत्री यांनी वाहिलेली ही शब्द सुमनांजली. मधुकरराव मंत्री यांना विनम्र अभिवादन.
— संपादक.
बापू – एक कल्पवृक्ष
आठवणींच्या हिंदोळ्यावरी,
झुलते आज मन।
आयुष्याच्या पटलावरीचे,
उलघडे स्वर्ण -पिंपळ पान।
वेंगुर्ल्याच्या देवभूमीत,
कोकणपुत्र जन्म घेई।
सुदत्तच्या उबदार शालीत,
गुंजे हास्य किलकारी।
वात्सल्याची मूर्ती पाहता,
झाली नजरानजर ।
विसरून भान वदली माय,
मधु उधळण्या इलो मधुकर ।
आकंठ अनुभवले,
बालपण हे ममतेचे ।
बंधु प्रेमाचे,
अन् बाळकडू संघसंस्काराचे।
पुण्याईची शिदोरी पाठीशी,
घेऊनी भविष्याचा वेध।
मनी कठोर बांध घालूनी,
ओलांडली वेस ।
क्षितिजातून गगनभरारी घेण्या गगनभेदी निघे ।
मार्गक्रमण हे जन्मभूमीकडून,
कर्मभूमी कडे ।
उभी स्वागता मुंबापुरी,
खडतर आव्हान घेवूनी।
कुशीत शिरलो अलगद,
सरस्वतीची आण देवूनी।
आदर्श पितृतुल्य काका मजला,
तया वरदहस्त शारदेचा ।
आशिर्वाद मज लाभला,
धरला मार्ग स्वावलंबनाचा ।
लाभली मज जन्मसावित्री,
स्वामिनी धीरोदात्त ।
समरूप झाली सावराया संसारवेल,
मीही निवांत।
देशप्रेमा वीर दौडले,
स्वातंत्र्याचे वारे घोंगावले ।
गुलामगिरीचे जोखड झुगारून,
तारुण्य सळसळले ।
आम्हीही सामिल झालो,
भोगला कारावास ।
अनामवीरही सहकार्य करी,
राहूनी अज्ञात।
कराचीतल्या बांधवांसाठी सज्ज,
जिवादिवशी निवास।
गावाकडले चाकरमानी ,
करी हक्काने निवास।
मजदूरांशी जुळले नाते,
तळागाळाशी बंध घट्ट झाले ।
लोककल्याणार्थ बाहू सरसावले,
जनसंघाशी नाते जुळले।
निस्वार्थ प्रेमाच्या लाटेवरी आरुढ होता,
नगरसेवक पद बहाल झाले ।
धंद्यासाठी धाडस करुनी,
केली स्वप्न पूर्ती ।
रोजगारास्तव घडून गेली,
त्यातून “दीपक” निर्मिती ।
जनसेवेचा आदेश घेवूनी,
केली राजकीय निवृत्ती।
नवपहाट वळणावरती,
अंतर्मन स्फूरती ।
सहवास मज बाबूंजींचा,
बिंदूमाधव जोशी दिग्गजांचा ।
त्यातून साकारला पाया,
ग्राहक चळवळीचा ।
ग्राहक हक्का ध्यास घेवूनी,
संघटीत ध्येयाप्रती ।
निस्वार्थ सेवाभावना करी ग्राहकजागृती ।
भारावून कार्यकर्ते,
करि ग्राहक हिताय सुखाय विचार ।
पाहता पाहता वृक्ष फोफावे,
घेई ग्राहक भवन आकार।
मुंबई ग्राहक पंचायत नामें,
झाले स्वप्न साकार।

भूतलावरील स्वर्ग पाहिला,
अनुभवला काश्मिरी गंध।
मॅारिशसच्या सागरी,
घट्ट झाले मैत्री बंध।
ओढ मातीची, निसर्ग प्रेमाची,
भारावले तन, मन।
मात्तृछाया सावलीत,
कर्जतस्थळी फुलले मधुबन।
आयुष्याच्या उतरंडीला,
पाहिले अनंत चढउतार।
नाही डगमगलो,
सोसले नशिबाचे प्रहार।
फिनिक्स पक्षासम झाला,
कल्पवृक्ष विस्तार।
उदंड झाली रोपे,
लेवून ज्ञानाची दिव्य किनार।
ह्रदयास स्पर्श करिशी,
ही आठवणींची उजळणी ।
निमित्त मात्र झालो मी,
ही तर ईश्वरी करणी ।
गहिवरलो मी,
ऋणी जन्मोजन्मी सकलजनांचा ।
स्विकारतो किताब मी,
आत्मसन्मान हा ग्राहक राजाचा।


— रचना : विद्या मंत्री. मुंबई
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800