Saturday, July 27, 2024
Homeलेखघाई…

घाई…

गेल्या सुमारे ८०-९० वर्षांपासून आपण (म्हणजे २०२४ साली ६० ते ८० वय असणारे) आणि आपल्या आधीच्या पिढीने हा अनुभव घेतला आहे की जीवन कसं गतिमान होत आहे. अजूनही त्याची गती वाढतेच आहे. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात गती वाढते आहे.

पूर्वी आपण कोणाकडे किंवा कोणी आपल्याकडे रहायला आलं की ४-५ दिवसांचा मुक्काम सहज असे. परतण्याची घाई कशी ती नसायची. आलेल्या पाहुण्यांनी लवकर परतावे अशी यजमानांचीही घाई नसायची. आता आपल्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाईकाकडे किंवा मित्राकडे फोन करूनच जावं लागतं. कधी त्यानं निव्वळ गप्पा मारणे, एकत्र जेवणे यासाठी बोलावलं असलं तरी त्याच्याकडे दोन तास थांबणं म्हणजे अगदी डोक्यावरून पाणी अशी स्थिती झालेली आहे. त्यातल्या त्यात बिनघाईचे क्षण म्हणजे घरातले सर्वजण किंवा दोन-तीन कुटुंबे एकत्र सहलीला गेली असतील, एखाद्या रिसॉर्टवर विसावली असतील तर तेवढेच ते क्षण !

पूर्वी दळणवळणाचा सर्वात फास्ट मार्ग म्हणजे तार ! आता तार म्हणजे काय हे सांगावं लागेल. तारही दोन तीन प्रमुख कारणांसाठीच असायची कारण तार करणे खूप महाग असायचे ना. त्यामुळे, परीक्षेचा रिझल्ट, मुलगा झाल्याची वार्ता, कोणाची गंभीर झालेली तब्येत, कोणाची मृत्यूवार्ता वगैरे पुरतीच असायची. आणि एवढं करून त्या गंभीर व्यक्तीला भेटायला जाणे म्हणजे किमान १ आणि कमाल ४ दिवस सहज लागायचे. आम्हाला मुलगा झाला तेव्हा पत्नी मेघना नागपूरला तिच्या आईवडिलांकडे प्रसूत झाली होती. आम्हाला पनवेलला तार मिळाली. तडक त्याच रात्री मला वडिलांनी स्कुटरवरून वाशी खाडी पुलामार्गे पनवेलहून व्हीटी स्टेशनला सोडलं (कारण त्या काळी पनवेलहून व्हीटीला पब्लिक ट्रान्सपोर्टला अडीच-तीन तास लागायचे. पनवेल तो मुंब्रा एस. टी. बस, मग, मुंब्रा ते व्हीटी लोकल ट्रेन !) आणि गीतांजली एक्सप्रेसने मी दुसऱ्या दिवशी सासुरवाडीला बाळाला आणि पत्नीला पहायला हजर ! त्या लोकांना त्या काळी ही गोष्ट अगदी सुपरफास्ट वाटली होती. काल तार केली काय नि आज जावई हजर झाला काय !

या नोकऱ्या निर्माण झाल्यापासून घाईचे अस्तित्व अधिक टोकदार झालं आहे. घाई हा पदार्थ जीवनाच्या ताटात जबरदस्तीने हजर राहू लागल्यापासून इतर सगळे पदार्थ कसे बकाबका खावे लागत आहेत. एकाची चव कळते न कळते तोच दुसरा पदार्थ खा असा नाईलाज निर्माण झाला आहे.

घाईची कारणे :
मी विचार करू लागलो की खरंच घाईचं मूळ कशात आहे? खरं म्हणजे घाईचं खापर नोकऱ्यांवर फोडून उपयोग नाही. घाई निर्माण होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मला लक्षात आलेली कारणे अशी आहेत –
१) वैद्यकीय आणीबाणी – अर्थातच जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राध्यान्य असल्याने अशा प्रसंगी खरंच घाई करावी लागते, कारण त्या व्यक्तीला उपचार मिळेपर्यंत जाणारा एक एक क्षण मोलाचा असतो. पण कधी कधी या घाईचेसुद्धा विश्लेषण केले तर अनेकदा असं दिसून येईल की एखाद्या व्यक्तीने स्वतःच स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केल्याने तिचा जीव धोक्यात आलेला असतो आणि घरातल्या इतरांना धावाधाव करावी लागते. उदा. मधुमेह आहे हे माहित असून आहारविषयक काळजी न घेणे, सिगारेट / तंबाखू सेवनाने कॅन्सर होऊ शकतो हे माहित असून सेवन करत राहणे, दारूच्या व्यसनाने शरीराची नासाडी होते हे माहित असून ते व्यसन करत रहाणे वगैरे. थोडक्यात काय, ‘मला काही होत नाही’ हा फाजील आत्मविश्वास किंवा ‘आत्ता तर मजा मिळते आहे ना ती करून घेऊ, नंतरचं नंतर पाहू’ अशी बेफिकीर वृत्ती. असं केल्याने एक ना एक दिवस आपण आपल्या आसपासच्या लोकांना त्यांची नित्यकर्मे बाजूला सारून धावाधाव करायला लावणार आहोत याचीही लाज अश्या लोकांना असत नाही.

२) जीव वाचविणे – कधी कधी माणूस नैसर्गिक आपत्तीमुळे जीवघेण्या संकटात सापडतो तेव्हाही त्याचा जीव वाचविण्यासाठी घाईच करावी लागते. कधी कधी तो आपणहून (म्हणजे परत एकदा फाजील आत्मविश्वासामुळे) स्वतःला संकटात लोटतो. उदाहरणार्थ, भरती-ओहोटीच्या वेळा माहित असूनही समुद्रातील किल्ल्यावर जास्त वेळ रमणे, सेल्फीसाठी कड्याच्या काठाला, धबधब्याच्या कडेला उभे रहाणे वगैरे. ही काय मनोवृत्ती आहे ? याची अधिक मीमांसा केली तर असं वाटतं की या मंडळींच्या ‘मर्दुमकी’ किंवा ‘पुरुषार्थ’ स्थापित करण्याच्या कल्पना खास पुरुषप्रधान संस्कृतीने जोपासलेल्या आहेत. शिवाय यात आयडेंटिटी क्रायसिस हा अजून एक वेगळा पैलू आहे. काहीतरी अचाट, जगावेगळे करून दाखविल्याशिवाय मी इतरांपेक्षा वेगळा आणि विशेष असा सिद्ध होणार नाही, माझी अशी एक वेगळी प्रतिमा तयार होणार नाही अशी यांची कल्पना असते. आता तुम्ही म्हणाल, “काय राव ? साध्या ‘घाई’ या विषयावरून तुम्ही थेट पुरुषप्रधान संस्कृतीपर्यंत पोचलात ! “पण जरा ‘घाईघाईने’ प्रतिक्रिया न देता थोडं निवांतपणे बसून विचार करून पहा. तुम्हालाही पटेल!

३) नित्य दिनक्रमात अडथळे – याची लहानमोठी कित्येक उदाहरणे आपण नित्य अनुभवत असतो. नेहेमीची लोकल ट्रेन रद्द होणे, बॉसने अचानक ‘अर्जंट’ काम देणे (आता ही तातडी कशी निर्माण झाली किंवा होऊ दिली गेली हे बॉसला विचारायची सोय नाही !) ग्राहक हे ‘देव’ असण्याच्या हल्लीच्या व्यवसायभानकाळात कधी कधी अशी अर्जंट कामे निर्माण होऊ शकतात हेही खरंय. शाळेची बस किंवा रिक्षा रद्द होऊन मुलांना नेणे /आणणे ही कामे अचानक उपटणे हाही अनुभव आपल्याला येत असतो.

४) अकार्यक्षमता – अचूक आणि झटपट काम करता येत नसणे म्हणजे ढोबळमानाने अकार्यक्षमता म्हणता येईल. अचूकतेने काम न केल्यामुळे, ते काम कायमचे बिघडते किंवा परत करावे लागते. त्यात परत वेळ जातो. त्यामुळे हातात असलेला वेळ कमी होतो आणि मग अर्थातच घाई करावी लागते. झटपट काम न केल्यास साहजिकच अधिक वेळ लागतो आणि हातात असलेला वेळ पुरेनासा होतो आणि मग घाई करावी लागते. मुळात ‘काळ’ हा अमर्यादित असला तरी ‘वेळ’ ही मर्यादित असते. गेलेली वेळ परत येत नाही हे तर सर्वांनाच माहित आहे. प्रत्येक उद्दिष्ट हे त्या उद्दिष्टाच्या प्रकारानुसार त्या त्या काळात आणि वेळेत साधावेच लागते. उदाहरणार्थ, नांगरणीची वेळ ही जशी पावसाळा तोंडावर आला असताना असते, पेरणीची वेळ ही जशी थोडा पाऊस पडून गेल्यावर असते तशीच अवकाशात चंद्राकडे उपग्रह सोडण्यासाठीसुद्धा खगोलशास्त्रीय गणितानुसार वेळेची एक विंडो काढलेली असते. त्या विंडोत उपग्रह सोडला तर तो सर्वाधिक स्वस्त, कमी वेळेत जाणार असतो. निवडणूक तोंडावर आली असताना पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवून चालत नाहीत उलट ते कमी करावे लागतात, डॉक्टरांनी प्रसूतीसाठी दसऱ्याच्या दोन चार दिवस आधी किंवा नंतरचा दिवस दिला असला तरी दसऱ्याची ‘शुभ’ वेळ साधण्यासाठी ‘सी’ सेक्शन शस्त्रक्रिया करून बाळ दसऱ्यालाच जन्माला ‘घालतात’. अकार्यक्षमता ही सरकारी यंत्रणेची मिरासदारी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सरकारी कर्मचारी ती जाणूनबुजून अंगी बाणवतात हे विशेष! खाजगी क्षेत्रात सुद्धा काही अकार्यक्षम गणंग असतात. पण तिकडे काम न केल्यास अकार्यक्षम व्यक्तीचे नुकसान होण्याची व्यवस्था तरी असते. अर्थात ती व्यवस्थाच कधी कधी अकार्यक्षम असते ही बाब वेगळी! पण खाजगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता ही निरनिराळ्या प्रकारच्या प्रशिक्षणातून वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. सरकारी कर्मचाऱ्यांना कामच करायचा कंटाळा असल्याने प्रशिक्षण देऊनसुद्धा कार्यक्षमता वाढेलच असं नाही.

५) पूर्वनियोजन नसणे – पूर्वनियोजन म्हणजे काय? एखादे काम किंवा प्रकल्प उभारून तडीस न्यायचा असेल तर त्यासाठी कोणत्या लहान आणि मोठ्या गोष्टी व कृती करायला हव्या याची यादी करणे, त्यातील कोणत्या गोष्टी व कृती एकमेकांवर कशा अवलंबून असतील याचे विश्लेषण करणे आणि त्यानुसार त्या गोष्टी / कृती करण्याचा क्रम ठरवणे, त्या प्रत्येक गोष्टी / कृतीसाठी लागणाऱ्या वेळेचा जास्तीत जास्त अचूक अंदाज करून तो वेळ त्या कृतीस लागेल असे धरून पूर्ण कामाला लागणारा वेळ ठरवणे, या सर्वात नियोजन करताना लक्षात न आलेल्या किंवा अंमलबजावणी करताना अचानक उपटलेल्या अडचणींसाठी अधिकचा वेळ (आणि अर्थातच पैसे, श्रम, कच्चा माल) समाविष्ट करणे. हे सर्व म्हणजे पूर्वनियोजन करणे होय. ते केल्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या गोष्टी / कृती कमी होतात आणि त्यामुळे निर्माण होणारी धांदल, धावपळ कमी होते. साधं बाजारात जाऊन भाजी आणि सामान आणायचं झालं तरी मी पूर्ण यादी करतो आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात जड सामान सर्वात शेवटी कसे घेता येईल, सामान घेण्यासाठी वारंवार पुढे जाऊन मागे कसे न यावे लागेल, कोणतं सामान कोणत्या दुकानात स्वस्त मिळतं, कोणतं दुकान कोणत्या वारी बंद असतं, दुकानं उघडी असण्याची वेळ काय या सर्वाचा विचार करून आणि खरेदीचा एक क्रम ठरवून मगच बाहेर पडतो. आणि त्या क्रमाने कामे करत करत येतो. याच कामात लॉन्ड्रीत कपडे द्यायचे किंवा आणायचे असतात, लायब्ररीत पुस्तक परत करून नवीन आणायचे असते. शिवाय उन्हाची, अंधाराची आणि गर्दीची वेळ टाळून ही सर्व कामे कशी करता येतील याचाही विचार करतो. रिक्षा मिळण्याचा जागा आणि वेळा साधारण कोणत्या याचाही विचार करतो. गाडी शक्यतो नेतच नाही कारण पार्किंग हा एक मोठ्ठा प्रॉब्लेम आहे. हां, बरोबर कोणी असेल तर गाडी घेऊन जातो. त्याला गाडीत ठेवून पार्किंग करून खरेदी करता येते.

६) संसाधने (Resources) वाचविण्याचा आटापिटा – संसाधने म्हणजे वेळ, पैसे आणि वस्तू. हे सर्व वाचविण्यासाठी माणूस जीवावरचा धोका पत्करतो. दुचाकीवर तिघे तिघे बसून जातात. यू टर्न मारावा लागू नये आणि जवळ पडतं म्हणून उलट दिशेने येतात. सिग्नलवर लाल दिवा हिरवा होण्याच्या दहा पंधरा सेकंद आधीच पुढे जाऊ लागतात. राईट टर्न मारताना उजवीकडून मारतात. का, तर वेळ वाचतो! बरं एवढा वेळ वाचवून करणार काय? एवढी घाई करून कबूल केलेल्या वेळेला कुणीच येत नाही! समजा दुसऱ्या कुणामुळे त्यांना उशीर होत असेल तर तेही फोन करून कळवायचे सौजन्य दाखवत नाहीत. माझ्या माहितीत किमान दोन माणसे अशी आहेत की ती सांगितल्या वेळेच्या पाऊण तास उशिरा येतात.
ऑफिसला घाईघाईने जाणाऱ्यांची घाई मला समजतच नाही. समजा ७.२४ ची लोकल पकडायची आहे. तुमच्या घरापासून स्टेशनला तुम्ही रोज दुचाकीने जाता आणि स्टेशनला पार्क करता. आता या सर्व क्रिया रोजच्या ठरलेल्या आहेत. आणि त्याला किती वेळ लागतो हेही अनुभवाने माहित झालेले आहे. समजा घरातून पाऊल बाहेर पडून ७.२४ ची लोकल ज्या प्लॅटफॉर्मवर येते त्या प्लॅटफॉर्मवर ठरलेल्या डब्यासमोर यायला एकूण अर्धा तास लागतो. तर माणसे ७.२४ – ३० = ६.५४ ला का घराबाहेर पडत नाहीत? त्यांना ७ का वाजतात? आणि मग उशीर झाला म्हणून दुचाकी वेगाने चालवणे, उलट दिशेने येणे, राईट टर्न अति उजव्या बाजूने घेणे असं का करतात? शिवाय उशीर होण्याच्या आणि ट्रेन चुकण्याच्या भीतीने डोक्यात ताण निर्माण करून ठेवतात तो वेगळाच. आणि हे रोजचं ठरलेलं. वर्षानुवर्षे दिवसाची सुरवातच ताणकारक केली तर तब्येतीवर जो परिणाम होईल तो तेव्हा कळणार नाही. मी तर म्हणतो १० मिनिटं मार्जिन ठेवूनच म्हणजे ६.४४ लाच निघालं पाहिजे आणि मस्त ताणविरहित, निवांतपणे स्टेशनवर पोचलं पाहिजे. की आपण काहीतरी जबरदस्त कामगिरी केल्याचा आभास आपल्याला हवा असतो म्हणून ओढूनताणून आपण ताण निर्माण करतो? काही काही पठ्ठे तर विमानप्रवासासाठीसुद्धा घरातून निघताना उशीर करतात.

घाईचे परिणाम :
घाईचे परिणाम अनेकांगी आहेत.
१) तुम्ही जर कार्यक्षम असाल तर ठरवलेले काम लवकर पार पाडून तुम्हाला थोडा निवांत वेळ मिळू शकतो. पण निवांतपणा मिळवण्यासाठी आमच्या कंपनीतील एका कामगाराने मशीनमधील सुरक्षेची तरतूद निष्प्रभ केली आणि त्यामुळे कॉम्पोनन्ट्स काढण्याचा वेळ कमी झाला. परिणामी त्याला त्या मशीनवर भराभर कॉम्पोनंट्स काढता येऊ लागले. व्यवस्थापनाबरोबर झालेल्या करारानुसार समजा ५०० कॉम्पोनंट्स आठ तासाच्या पाळीत पूर्ण करायचे असतील तर याचे सहा तासातच होऊ लागले पण सेफ्टी डावलून! हे धोक्याचे होते. मी विद्युत अभियंता म्हणून तिथे काम करत होतो. मी त्या मशीनचे सर्किट असं काही बदललं की त्यामुळे त्याला ती सेफ्टी डावलता येईना. म्हणजे संभाव्य शारीरिक इजा होण्याचा धोका पत्करून त्याला आराम करण्यासाठी वेळ हवा होता.

) शॉर्टकट्स – वरीलप्रमाणे हमखास शॉर्ट्कटसचा अवलंब करून वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. यात स्वतःच्या आणि / किंवा इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याकडे कानाडोळा केला जातो. रेल्वेचे रूळ ओलांडणे, धावती गाडी पकडणे हे शॉर्टकट्स किती धोकादायक असतात हे माहीत असूनही वापरले जातात! म्हणजे वेळ वाचवण्यापुढे जीव वाचवणे दुय्यम ! कमाल आहे ना ?

३) घाईघाईत केलेल्या कामात चुका होण्याची शक्यता बळावते. मग चूक झाल्यावर ती निस्तरायला (निस्तरता येण्यासारखी असल्यास !) परत नवा वेळ द्यावा लागतो. शिवाय बॉसची किंवा कुणाची तरी बोलणी खावी लागतात. म्हणजे तेलही गेलं नि तूपही गेलं अशी स्थिती होते.

४) घाईघाईत एखाद्या कागदावर सही करणं चांगलंच महागात पडू शकतं.

५) घाईघाईत एखादा निर्णय घेतला तर शक्यता आहे की आपण सर्व बाजूंनी विचार केलेला नसेल, एखादा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा राहून गेला असेल. आणि मग त्या निर्णयाचे काहीही परिणाम होऊ शकतात.

६) कित्येकदा आपण घरातून घाईघाईने निघतो आणि वाटेत किंवा कामाच्या ठिकाणी पोचल्यावर लक्षात येतं की काहीतरी महत्त्वाची वस्तू घ्यायची राहिली आहे आणि ती वस्तू असल्याशिवाय उरलेल्या दिवसात काही काम होणार नाही किंवा काम अचानक थांबू शकतं. मग चडफडत, स्वतःला दूषणं देत किंवा दुसऱ्यावर खापर फोडत आपण परत घरी जाऊन ती वस्तू आणतो किंवा ती आणण्याची व्यवस्था करतो. कशाला एवढा सगळा ताण उत्पन्न करायचा ? त्यापेक्षा घरातून निघताना लागणाऱ्या वस्तूंची आदल्या दिवशी एक चेकलिस्ट बनवून निघताना त्या लिस्टप्रमाणे सर्व काही घेतलं आहे याची खात्री करून निघालं तर ? पण नाही, आपला इगो आड येतो. आपल्याला वाटतं आपण सुपरह्युमन आहोत. लिस्ट करून त्याप्रमाणे वस्तू घेणं म्हणजे आपल्याला बावळटपणा वाटतो ! शिवाय असंही वाटत असतं की आपला ‘बहुमोल’ वेळ लिस्ट बनवण्यात आणि दुसऱ्या दिवशी ती चेक करण्यात कशाला घालवायचा ? ‘पेरूचा पापा’ तर सुप्रसिद्धच आहे. तो किती कामाचा आहे की नाही ? पेन, रुमाल, चावी, पास, पाकीट ! किती छान !

तेव्हा मंडळी, हा लेख तुम्ही घाईघाईत तर वाचला नाहीत ना ?

हेमंत साने

— लेखन : हेमंत साने. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. सगळेच मुद्दे पटले. आपण विनाकारण घाई करतो. प्रत्येकाने organized राहणे खूप आवश्यक आहे. हेमंत sarani अतिशय प्रभावी पणे ते मांडले आहे. खूप छान

  2. मला वाटते की पुढील गोष्टी पण महत्वाच्या आहेत. त्यामुळे घाई चे चॅन्सस कमी होतील.
    1) सध्य परिस्थिती तील Generation चे भान असणं.
    आर्ट ऑफ ओव्हरकमिंग गेनेरशन गॅप.
    2) टाइम मॅनेजमेंट चे महत्व व जाण.
    3) मानसिक संतुलन. मेडिटेशन चे महत्व.

  3. अगदी सावकाशपणे वाचला लेख…. अतिशय मुद्देसूद मांडणी.. विस्तृत तरीही वाचनीय…👌🏻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८