दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. हा समतोल राखण्यासाठी जागोजागी वृक्षारोपण होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन नवी मुंबईतील श्री सुधीर थोरवे आणि त्यांची मित्रमंडळी गेली ९ वर्षे सातत्याने वृक्षारोपण करीत आहेत, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. त्याच बरोबर निसर्ग सहलीचा ही आनंद घेत आहेत. असे वृक्षारोपण आपणही मोठ्या संख्येने केले पाहिजे. आपल्या अशा उपक्रमांना न्युज स्टोरी टुडे या आपल्या वेबपोर्टल वर नक्कीच प्रसिद्धी दिली येईल.
— संपादक
श्री सुधीर थोरवे, प्रा सौ वैशाली थोरवे आणि त्यांच्या मित्रमंडळीने या वर्षी नुकतीच रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळील शिरवली येथे दीडशे झाडे लावली.
यावर्षीच्या वृक्षारोपण कार्यक्रमात कर्जतचे वृक्षप्रेमी शरद पवार तसेच वनविभागाचे सर्वश्री खेडेकर, चव्हाण व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले.
मुंबईत पावसाचा जोर कायम असताना सगळ्यांच्या मनात निघायचे की नाही याची धाकधूक होती. परंतु वैशाली थोरवे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सगळ्यांनी कर्जत येथे मार्गक्रमण केले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथून ५० जणांच्या चमूने आपापल्या गाडीने सकाळी साडेनऊच्या दरम्यान शेळके सभागृहातील आवारात आपल्या न्याहारीच्या शिदोरीचा आस्वाद घेतला.
विलास आचरेकर, शैला, अनिता, शोभा आणि स्नेहल यांनी न्याहारी वाटपाची व्यवस्था चोख बजावली. तद्नंतर सर्व जण नियोजित ठिकाणी पोहोचले.
वनविभागाने आखून दिलेल्या जागेत तीन ते पाच जणांचे विविध ग्रुप पाडून सर्वांनी वृक्षारोपणाला सुरुवात केली. सर्वप्रथम वृक्षारोपण कसे करायचे याविषयी नवोदितांना माहिती सांगण्यात आली.
मुंबईत जरी मुसळधार पाऊस पडत असला तरी सुदैवाने कर्जत येथे निसर्गाची साथ मिळाली. सभोवतालची हिरवळ, मध्येच येणारी पावसाची सर, हवेतील थंडावा या सर्व निसर्गरम्य वातावरणात या चमुने एका आगळ्यावेगळ्या उत्साहात वृक्षारोपण सुरु केले.
कुदळ, फावडी घेऊन खड्डे पाडणे हे काही जणांना नवीनच होते. त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. उत्साही वातावरणात या चमूने जवळजवळ १५० झाडे लावली.
सर्वेश, हर्ष, श्यान्या, श्रेयांश, निखिल, श्रेया ह्या यंग ब्रिगेडची वृक्ष लागवडीसाठीची ऊर्जा वाखाणण्याजोगी होती.
यावेळी सहकुटुंब आलेले सर्वश्री शेखर पडते, प्रदीप काशीद, महामुनी, आठल्ये, बेनकर, आतिश शर्मा, अजय बल्ला, वाणी, भास्कर, लक्ष्मीकांत, दिलीप, अनिल, रवी, विशाल, व प्रशांत यांनी पर्यावरण बचावासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न त्यांना खूप मोठा आनंद देऊन गेला.
श्रम परिहारानंतर सर्वांनी कर्जतच्या प्रसिद्ध वडापावचा आस्वाद घेतला. काही जणांनी शेजारीच वाहत असलेल्या नदीत डुंबण्याचा मनमुराद आनंद घेत आपला थकवा घालवला. तद्नंतर सर्वांनी वनभोजनाचा आनंद घेतला. सर्वांच्या भोजनाची व्यवस्था वैशाली, ज्योती, रूपाली, हेमांगी आणि यांनी चोख बजावली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800