Monday, February 17, 2025
Homeकलाचला, पतंग उडवू या….

चला, पतंग उडवू या….

पतंग हा एक पारंपरिक खेळ आहे. तो प्रामुख्याने मकर संक्रांतीपासून खेळायला सुरुवात होते. लहान, थोर, स्त्री पुरुष, गरीब, श्रीमंत असे सारेच या खेळाचा आनंद घेतात.

पतंग बनवणे ही एक कला आहे. पूर्वी पतंग घरीच बनवले जायचे. आता मात्र बाजारात आयते विकत मिळतात. पक्षी, माणसे, फुलपाखरे, जहाज, पाने अशा विविध आकारात पतंग असतात. पेटी पतंग (बॉक्स काईट) हा लोकप्रिय प्रकार आहे.

संक्रांतीच्या काही दिवस आधी रस्त्यावर किंवा दुकानात मांजा, पतंग, फिरकी सर्रास विक्रीसाठी ठेवलेले असतात. स्टॉलभोवती विकत घेणार्‍या सार्‍यांची झुंबडही खूप असते.

मैदानी खेळासोबत हा एक शारीरिक श्रमाचा खेळ आहे. दोन जणांच्या साथीने हा खेळ खेळल्या जातो. एक पतंग उडवणारा असतो तर दुसरा मांज्याची रीळ पकडायला व ढील द्यायला लागतो.

पतंगाची व्यवस्थित दोरी बांधणे यावर तो कसा उडतो हे अवलंबून असते. त्या प्रक्रियेला कन्नी बांधणे म्हणतात. पतंग उडवणे हे मोठ्या कौशल्याचे काम आहे. तो उडवताना खूप उंचीवर नेता यायला हवा. या खेळासाठी मोकळ्या मैदानाची आवश्यकता असते. हा खेळ रंगात आला की देहभान विसरायला होते. यासाठीचा मांजा हा विशिष्ट पद्धतीने बनवलेला असतो. त्याच्यामुळे हात किंवा कोणाच्या गळ्याभोवती फिरला तर गळा चिरून जीवावर बेतल्या जाण्याची शक्यता असते. याकाळात अश्या खूप अपघाताच्या घटना घडल्याचे ऐकायला येते; शिवाय भान हरपून खेळल्या जाणारा हा खेळ असल्याने शहरी वस्तीत जागेअभावी लोक गच्चीवर खेळत असताना तोल जावून पाडण्याच्या घटना कानावर येत असतात.

पतंग हा केवळ आकर्षक, मनोरंजक खेळ नसून त्याचा खूप मोठ्ठा उपयोग करून घेणारा असा इतिहास सांगतो. एका स्थानावरून दुसरीकडे सांकेतिक इशारे देण्यासाठी पतंगासोबत लाल दिवे बांधले जात. काईट फोटोग्राफी म्हणून उंचावरून चित्रण करण्यासाठी सुद्धा उपयोग केला जाई. नायगरा धबधब्याच्या टांगत्या पुलाची पहिली तार टाकण्यासाठी पतंगाचा उपयोग केला होता. गुजरातमध्ये हा खेळ जास्त लोकप्रिय आहे.

सूर्याला समर्पित असणाऱ्या या सणाचे पतंग उडवणे हे एक अविभाज्य अंग आहे. थंडीचे दिवस सुरू असतानाच येणारा हा सण सूर्याशी थेट सामना व्हावा हा उद्देश असावा.
हिवाळा ऋतू सुरू असतो, ज्यामध्ये अनेकांना सर्दी-खोकला यासारख्या अनेक आजारां चा धोका जास्त असतो. रोगप्रतिकार शक्तीच्या आभावामुळे लोक आजारी पडतात, जंतू आणि जीवाणू नष्ट करण्यासाठी प्रखर सूर्यप्रकाशासारखे दुसरे शस्त्र नाही. सूर्यकिरणे औषधी असतात. ती मिळावीत म्हणून पतंग उडवण्याच्या खेळानिमित्ताने सर्वजण बाहेर पडतात. त्वचारोग निर्मूलनास मदत होते, सूर्यकिरणांद्वारे ड जीवनसत्त्व मिळते. आपल्या संस्कृतीने अश्याप्रकारे आनंदाची आरोग्याशी सांगड घातली आहे.तर काय,तुम्ही पण उडवणार ना पतंग ?

— लेखन : कल्पना मापूसकर. मीरा रोड
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. कल्पना ताई, खूप छान माहितीपूर्ण लेख लिहिला आहेत. तुमचे हार्दिक अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments