Saturday, July 27, 2024
Homeपर्यटनचलो बाली : भाग ६

चलो बाली : भाग ६

फायर डान्स —अग्नि नृत्य म्हणजे बाली बेटावरचे एक प्रमुख आकर्षण.
समुद्रकिनाऱ्यावर उतरत्या संध्याकाळी या नृत्याचे भव्य सादरीकरण असतं. बीचवर जाण्याच्या सुरुवात स्थानापर्यंत आम्हाला हॉटेलच्या शट्ल सर्विस ने सोडले. उंच टेकडीवरून आम्हाला समुद्राचे भव्य दर्शन होत होते. ज्या किनाऱ्यावर हे अग्नी नृत्य होणार होते तिथपर्यंत पोहोचाण्याचा रस्ता बराच लांबचा, डोंगरावरून चढउताराचा, पायऱ्या पायऱ्यांचा होता. सुरुवातीला कल्पना आली नाही पण जसजसे पुढे जात राहिलो तसतसे जाणवले की हे फारच अवघड काम आहे. त्यापेक्षा आपण खालून किनाऱ्यावरून चालत का नाही गेलो ? तो रस्ता जवळचा असतानाही— असा प्रश्न पडला. अर्थात त्याचे उत्तर यथावकाश आम्हाला मिळालेच. ती कहाणी मी तुम्हाला नंतर सांगेनच. तूर्तास आम्ही धापा टाकत जिथे नृत्य होणार होते तिथे पोहोचलो.

बरोबर संध्याकाळी सहा वाजता हे अग्नी नृत्य सुरू झाले. चित्र विचित्र, रंगी बेरंगी, चमचमणारी वस्त्रं ल्यायलेले, अर्धे अधिक उघडेच असलेले नर्तक आणि नर्तिकांनी हातात पेटते पलीते असलेली चक्रे फिरवून नृत्याला सुरुवात केली. समोर सादर होत असलेल्या त्या नृत्य क्रीडा, पदन्यास आणि ज्वालांशी लीलया चाललेले खेळ खरोखरच सुंदर तितकेच चित्तथरारक होते. आपल्याकडच्या गोंधळ, जागर यासारखाच लोकनृत्याचा तो एक प्रकार होता. संगीताला ठेका होता. अनेक आदिवासी नृत्यंपैकी हे एक नृत्य. साहस आणि कला यांचं अद्भुत मिश्रण होतं.

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या….
या जुन्या गाण्याचीही आठवण झाली.

काळोखात चाललेलं आभाळ, लाटांची गाज, मऊ शुभ्र वाळू यांच्या सानिध्यात चाललेलं ते अग्नी प्रकाशाचे नृत्य फारच प्रेक्षणीय होतं. उगाच काहीसं भीषण आणि गूढही वाटत होतं.एक तास कसा उलटला ते कळलंही नाही.

परतताना मात्र आम्ही आल्यावाटेने गड चढत जाण्यापेक्षा सरळ वाळूतून चालत जायचे ठरवले. तिथल्या स्थानिक माणसाने आम्हाला एवढेच सांगितले, ”अर्ध्या तासात समुद्राला भरती येईल. मात्र दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही शटल पॉईंट ला पोहोचालच. जा पण सांभाळून..”
मग असे आम्ही सहा वृद्ध वाळूतून चालत निघालो. वाळूतून चालणारे फक्त आम्हीच असू. बाकी सारे मात्र ज्या वाटेने आले त्याच वाटेने जाऊ लागले.
हळूहळू लक्षात आले वाळूच्या अनंत थरातून चालणे सोपे नव्हते. पाय वाळूत रुतत होते. रुतणारे पाय काढून पुढची पावले टाकण्यात भरपूर शक्ती खर्च होत होती. अंधार वाढत होता. समुद्र पुढे पुढे सरकत होता. आमच्या सहा पैकी सारेच मागे पुढे झाले होते. समुद्राच्या भरतीची वेळ येऊन ठेपत होती.
विलासला फूट ड्रॉप असल्यामुळे तो अजिबात चालूच शकत नव्हता. आम्ही दोघं खूपच मागे राहिलो. मी विलासला हिम्मत देत होते. थोड्या वरच्या भागात येण्याचा प्रयत्न करत होतो पण विलास एकही पाऊल उचलूच शकत नव्हता आणि तो वाळूत चक्क कोसळला. त्या विस्तीर्ण समुद्राच्या वाळूत, दाटलेल्या अंधारात आम्ही फक्त दोघेजण ! आसपास कुणीही नाही. दोघांनाही आता जलसमाधी घ्यावी लागणार हेच भविष्य दिसत होतं. मी हाका मारत होते…” साधना, सतीश प्रमोद हेल्प हेल्प”

मी वाळूत उभी आणि विलास त्या थंडगार वाळूत त्राण हरवल्यासारखा निपचीत पडून. एक भावना चाटून गेली.
We have failed” आपण उंट नव्हतो ना…
कुठून तरी साधना धडपडत कशीबशी आमच्याजवळ आली मात्र. सतीश ने माझी हाक ऐकली होती. समोरच बीच हाऊस मधून त्यांनी काही माणसांना आमच्यापर्यंत जाण्यास विनंती केली.. दहा-बारा माणसं धावत आमच्या जवळ आली. सतीशच्या प्रसंगावधानाचे कौतुक वाटले. कारण त्याने त्याच क्षणी जाणले होते की हे एक दोघांचं काम नव्हे. मदत लागणार.मग त्या माणसांनी कसेबसे विलासला उभे केले आणि ओढत उंचावरच्या पायऱ्या पर्यंत आणले. तिथून एका स्विमिंग बेड असलेल्या खुर्चीवर विलासला झोपवून पालखीत घालून आणल्यासारखे शटल पॉईंट पर्यंत नेले. हुश्श !! आता मात्र आम्ही सुरक्षित होतो. चढत जाणाऱ्या समुद्राला वंदन केले. त्याने त्याचा प्रवाह धरुन ठेवला होता का ? त्या क्षणी ईश्वर नावाची शक्ती अस्तित्वात आहे याची जाणीव झाली. आमच्या मदतीसाठी आलेली माणसं मला देवदूता सारखीच भासली. जगाच्या या अनोळखी टोकावर झालेल्या मानवता दर्शनाने आम्ही सारेच हरखून गेलो. श्रद्धा, भक्ती आणि प्रेम या संमिश्र भावनांच्या प्रवाहात मात्र वाहून गेलो. या प्रसंगाची जेव्हा आठवण येते तेव्हा एकच जाणवते, देअर इज नो शॉर्टकट इन लाईफ !

बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको..हेच खरे.

शरीराने आणि मनाने खूप थकलो होतो गादीत पडताक्षणीच झोप लागली.

दुसऱ्या दिवशीची सकाळ छान प्रसन्न होती. विलास जरा नाराज होता कारण कालच्या थरारक एपीसोडमध्ये त्याचा मोबाईल मात्र हरवला.पण आदल्या दिवशी ज्या दुर्धर प्रसंगातून आम्ही दैव कृपेने सही सलामत सुटलो होतो, त्या आठवणीतच राहून निराश, भयभीत न होता दुसऱ्या दिवशी आमची टीम पुन्हा ताजीतवानी झाली. सारेच पुढच्या कार्यक्रमाचे बेत आखू लागले.

आज सकाळी कर्मा कंदारा— विला नंबर ६७ च्या खाजगी तरण तलावावर जलतरण करण्याचा आनंद मनसोक्त लुटायचा हेच ठरवले.
अवतीभवती हिरव्या गच्चपर्णभाराचे वृक्ष आणि मधून मधून डोकावणारी पिवळ्या चाफ्याची गोजीरवाणी झाडे यांच्या समवेत तरण तलावात पोहतानाचा आनंद अपरंपारच होता.
अनेक वर्षांनी इथे, बालीच्या या नयनरम्य पार्श्वभूमीवर, सुरुवातीला काहीशा खोल पाण्यात झेप घेताना भयही वाटलं. पण नंतर वयातली ३०/४० वर्षं जणू काही आपोआपच वजा झाली आणि पोहण्याचा मनमुराद आनंद लुटू शकलो. झाडं, पाणी आणि सोबतीला आठवणीतल्या कविता.

थोडं हसतो थोडं रुसतो
प्रत्येक आठवण
पुन्हा जागून बघतो ।।

अशीच मनोवस्था झाली होती.

सिंधुसम हृदयात ज्यांच्या रस सगळे आवळले हो
आपत्काली अन् दीनांवर
घन होउनी जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो..

बा.भ. बोरकरांच्या या कवितेतले ‘जीवन कळणारे’ ते म्हणजे जणू काही आम्हीच होतो हीच भावना उराशी घेऊन आम्ही तरण तलावातून बाहेर आलो. असे हे बालीच्या सहलीत वेचलेले संध्यापर्वातले खूप आनंदाचे क्षण !!

तसा आजचा दिवस कष्टमय, भटकण्याचा नव्हता. जरा मुक्त,सैल होता. इथल्या स्थानिक लोकांशी गप्पा करण्यातली एक आगळी वेगळी मौज अनुभवली.
ही गव्हाळ वर्णीय, नकट्या नाकाची, गोबर्‍या गालांची, मध्यम उंचीची, गुटगुटीत ईंडोनेशीयन माणसं खूप सौजन्यशील, उबदार हसतमुख आणि आतिथ्यशीलही आहेत.
भाषेचा प्रमुख अडसर होता. कुठलीही भारतीय भाषा त्यांना अवगत असण्याचा प्रश्नच नव्हता. पण इंग्रजीही त्यांना फारसं कळत नव्हतं. ते त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. पण गंमत सांगते, भाषेपेक्षाही मुद्राभिनयाने, हातवारे, ओठांच्या हालचालीवरूनही प्रभावी संवाद घडू शकतो याचा एक गमतीदार अनुभवच आम्ही घेतला.
सहज आठवलं, पु.ल. जेव्हा फ्रान्सला गेले होते तेव्हा दुधाच्या मागणीसाठी त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून कागदावर चक्क एका गाईचे चित्रच काढून दाखवलं होतं. तसाच काहीसा प्रकार आम्ही येथे अनुभवला.
बाली भाषेतले काही शब्द शिकण्याचा खूप प्रयत्न केला पण लक्षात राहिला तो एकच शब्द सुसु.
बाली भाषेत दुधाला सुसू म्हणतात.
पण त्यांनीही आपले, ’नमस्कार, शुभ प्रभात, कसके पकडो वगैरे आत्मसात केलेले शब्द, वाक्यं, त्यांच्या पद्धतीच्या उच्चारात बोलून दाखवले. माणसाने माणसाशी जोडण्याचा खरोखरच तो एक भावनिक क्षण होता !
या भाषांच्या देवघेवीत आमचा वेळ अत्यंत मजेत मात्र गेला आणि त्यांच्या प्रयत्नपूर्वक मोडक्या तोडक्या इंग्लिश भाषेद्वारे बाली विषयी काही अधिक माहितीही मिळाली.
राजा केसरीवर्माने या बेटाचे नाव बाली असे ठेवले.

बाली या शब्दाचा अर्थ त्याग. बाली या शब्दाचे मूळ, संस्कृत भाषेत आहे आणि या शब्दाचा सामर्थ्य, शक्ती हाही एक अर्थ आहे.आणि तो अधिक बरोबर वाटतो.
आणखी एक गमतीदार अर्थ त्यांनी असा सांगितला की बाली म्हणजे बाळ. बालकाच्या सहवासात जसा स्वर्गीय आनंद मिळतो तसेच स्वर्गसुख या बाली बेटावर लाभते.
बाली बेटावरच्या स्वर्ग सुखाची कल्पना मात्र अजिबात अवास्तव नव्हती हे मात्र खरं !!

संध्याकाळी कर्मा ग्रुप तर्फे झिंबरान बीच रिसॉर्टवर आम्हाला कॉम्प्लिमेंटरी डिनर होते. जाण्या येण्यासाठी त्यांच्या गाड्या होत्या.
संगीत ,जलपान आणि गरमागरम पदार्थांची रेलचेल होती. वातावरणात प्रचंड मुक्तता होती. खाणे पिणे आणि संगीत, सोबत तालबद्ध संगीतावर जमेल तसे केवळ नाचणे. थोडक्यात वातावरणात फक्त आनंद आणि आनंदच होता आणि या आनंदाचे डोही आम्हीही अगदी आनंदे डुंबत होतो.LIVE AND LET LIVE.

बाॅबी मॅक फेरीनच्या गाण्यातली ओळ ओठी आली..
DONT WORRY BE HAPPY
OOH OH OH
क्रमश:

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments