Saturday, July 27, 2024
Homeपर्यटन"चलो बाली"- १

“चलो बाली”- १

बाली, इंडोनेशियातील एक बेट. जावा बेटाच्या पूर्वेकडचे हे बेट. वास्तविक जावा, सुमात्रा, या हिंदी महासागरातल्या बेटांबद्दल शालेय जीवनात भूगोलातून अभ्यास केला होताच. बाली हेही याच बेटांपैकी असलेलं एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ. कला, संगीत, नृत्य, समुद्र किनारे आणि मंदिरे यासाठी प्रसिद्ध असलेलं एक नितांत सुंदर बेट आणि मित्र परिवारांच्या समवेत या बेटास प्रत्यक्ष भेट देण्याचे माझे एक बकेट लिस्ट मधले स्वप्न पूर्ण होण्याची संधी मला मिळाली. जीवनातल्या अनेक भाग्य क्षणांच्या संग्रहात याही अनमोल क्षणाची भर पडली.

२७/११/२३

दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी आम्ही सिंगापूर एअरलाइन्सच्या एस क्यू 423 या फ्लाईटने मुंबई ते सिंगापूर (चांगी विमानतळ) ते डेन पसार (न्गुराह राय विमानतळ) असा प्रवास करून बाली या बेटावर पोहोचलो.

आम्ही बुक केलेले रिसाॉर्ट कर्मा चांडीसार हे विमानतळापासून जवळजवळ दोन तासाच्या अंतरावर होते. पण ड्राईव्ह अतिशय रमणीय होता. सुंदर रस्ते, सभोवती अथांग सागर, झाडी, डोंगर आणि चौकाचौकातले उंच, कलात्मक, रामायणातली कॅरेक्टर्स शिल्पे ! भव्य बांधकाम असलेली प्रवेशद्वारे. कोणती कोणती छायाचित्रे टिपावीत हेच कळेनासं झालं होतं. मग ठरवलं आजचा तर पहिलाच दिवस आहे. छायाचित्रे टिपायला आपल्याजवळ अजून पुढचे सहा दिवस आहेतच की.

पण डेनपसार शहरात प्रवेश करता क्षणीच जाणवले होते ते इथली हिंदू धर्मीय जीवन पद्धती. रामायण या पवित्र ग्रंथांशी त्यांचं असलेलं जन्मजात खोल नातं. कसं असतं ना माणसाचं ? धर्म, संस्कृती, कला यांचं एकात्म्य हे क्षणात आपल्याला आपुलकीच्या नाते बंधनात जोडतं. मग वातावरणातल्या बदलाशी आपण नकळत तुलनात्मक रित्या बांधले जातो.
मी पटकन म्हणाले, ”मला तर इथे आल्यापासून गोव्यात आल्यासारखंच वाटतंय ! इथल्या बोगन वेली, जास्वंदी, चाफा, कर्दळ, शिवाय नारळ, केळी, बांबू हे तर सारं कोकण —केरळ यांचीच आठवण करून देत होतं. भारत आणि इंडोनेशियाचं हे मनातल्या मनात केलेलं एकत्रीकरण अर्थातच खूप गंमतीदार होतं.

आमचा सहा जणांचा ग्रुप. मी, विलास, सतीश, साधना, सुमन आणि प्रमोद. सतीश चे कर्मा ग्रुपचे सदस्यत्व असल्यामुळे आम्हाला कर्मा चांडीसार या प्राॅपर्टी मध्ये एक सुंदर ऐसपैस बंगला मिळाला होता. तोही अगदी समुद्रकिनाऱ्याला लागूनच. हिंदी महासागराचं जवळून झालेलं ते नयनरम्य दर्शन केवळ अप्रतिम! आमचा सहा जणांचा ग्रुप एकदम आनंदला.

आम्ही सारे पंच्याहत्तरी पार केलेले, खूप वर्षांपासून मैत्रीच्या घट्ट बंधनात बांधलेले. क्षणात अक्षरशः केवढे तरी तरुण झालो आणि या सहलीत आपण काय काय साहसे करू शकतो याविषयीचे बेत आखू लागलो. चालू ,चढू, पोहू करू की सारं…!! अंतर्मन म्हणायचं,” वय विसरू नका.” पण निसर्गाच्या सानिध्यात माणूस वय विसरतो हे मात्र खरं.

२८/११/२३

बालीत प्रवेश केल्यावर हवाई अड्ड्यावरच आपण एकदम मिलियाॅनिअर झाल्याचा भास का असेना पण सुखद अनुभव आला.

पोहोचल्याबरोबरच आम्ही प्रथम व्हिसाची प्रक्रिया पूर्ण केली. इथे व्हिसा ऑन अरायव्हल असतो. व्हिसासाठी आम्हाला प्रत्येकी ३३ डॉलर भरावे लागले. नंतर मनी चेंजरकडून इंडोनेशियन रुपयाची (आयडीआर) करन्सी घेतली आणि काय सांगू अक्षरशः पैशांचा पाऊसच पडला. केवळ ५० हजाराचे जवळजवळ ८८ लाख इंडोनेशियन रुपये हातात आले. एकेक लाखाच्या, पन्नास हजारांच्या, वीस हजारांच्या च्या भरपूर नोटा. पर्समध्ये मावेनात. क्षणात खूप श्रीमंत झाल्याचा एक मजेशीर अनुभव मात्र घेतला.

पहिल्या दिवशी टॅक्सीने आम्ही आमच्या आरक्षित बंगल्यावर जेव्हा आलो तेव्हा टॅक्सीचे बिल साडेनऊ लाख इंडोनेशीयन रुपये झाले होते, त्याचीही गंमत वाटली.

तसे आम्ही दुपारीच पोहोचलो होतो. विमानात खाणे झालेच होते. तरीही थोडे ताजेतवाने होत बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचा आम्ही समाचार घेतला. सोबत सॉफ्ट ड्रिंक्स, रेड वाइन वगैरे होतंच.

आमचा बंगला अगदी वेल फर्निश्ड आणि सर्व सुविधायुक्त होता. सुरेख सजवलेले अद्ययावत किचनही होते.

पहिल्या दिवशी थोडा आरामच करायचे ठरवले. बंगल्याजवळच स्विमिंग पूल होता व तेथे असणार्‍या रेस्टॉरंट पलीकडे अथांग पसरलेला शांत. गूढ, हिंदी महासागर. या सागरात ठिकठिकाणी मोठ मोठी जहाजे दिसत होती. काही व्यापारीही असतील कारण बाली हे सुप्रसिद्ध व्यापारी बेट आहे. काही पर्यटन बोटीही असतील. तर काही मच्छीमारांच्या बोटी होत्या.

मच्छीमारी हा इथला महत्त्वाचा व्यवसाय आहे.बालीचं हे प्राथमिक दर्शन मनभावन होतं.
हळूहळू सूर्य क्षितिजा पलीकडे गेला. सोनेरी किरणांनी आकाश रंगले आणि मग त्यातूनच अंधाराची वाट पसरत गेली. मात्र मानवनिर्मित रोषणाईने संपूर्ण सागर किनारा चमकू लागला. परिसरातील संमीश्र शांतता, गुढता अनुभवत आम्ही परतलो. सतीश ने दुसऱ्या दिवशीचा साईट सीईंगचा कार्यक्रम आखलेला होताच.
क्रमश:

राधिका भांडारकर

— लेखन: राधिका भांडारकर. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. चलो बाली भाग १
    सौ.राधिका भांडारकर यांचे हे प्रवासवर्णन वाचताना मलाही थेट बाली बेटावर पोहोचल्यासारखे वाटले.
    भाग २ची प्रतीक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८