Saturday, July 27, 2024
Homeकलाचित्र सफर : 29

चित्र सफर : 29

ज्युनियर मेहमूद

ज्युनियर मेहमूद यांचे नुकतेच, (८ डिसेंबर २०२३ रोजी) निधन झाले. त्यांच्या फिल्मी कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा.
ज्युनियर मेहमूद यांना भावपूर्ण श्रद्धांजली
– संपादक

ज्युनियर मेहमूद यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला होता. त्यांचे खरे नाव नईम सय्यद होते. ते नऊ वर्षांचे असताना त्यांचा मोठा भाऊ हिंदी चित्रपटसृष्टीत स्टील फोटोग्राफी करीत होता. तो शुटींग करुन आल्यावर त्याच्याकडून रसभरीत, फिल्मी किस्से ऐकून नईम यांना चित्रपटाविषयी आकर्षण वाटू लागले. नईमच्या हट्टाखातर, मोठा भाऊ त्याला एकदा शुटींगच्या ठिकाणी घेऊन गेला. त्याला शांतपणे बसायला सांगून तो आपल्या कामात मग्न झाला. शुटींग पहात असताना नईमला असे दिसले की, त्याच्याच वयाचा एक मुलगा, टेकच्या वेळी सारखे संवाद विसरत होता. तो सहज बोलून गेला, ‘एवढे साधे संवाद बोलू शकत नाही ?’ हे पाठमोऱ्या दिग्दर्शकाने ऐकले व नईमला विचारले, ‘तू बोलू शकशील का ?’ नईमने फक्त होकार दिला नाही तर प्रत्यक्षात, एकही रिटेक न घेता ते काम करुन दाखवले. त्या कामाचे त्याला, रोख पाच रुपये मिळाले. ही त्याच्या भविष्यातील यशस्वी कारकीर्दीची पहिली पायरी होती !

१९६६ चा ‘मोहब्बत जिंदगी है’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर ६७ साली ‘नौनीहाल’ मध्ये तो आला. १९६८ पासून त्याने मागे वळून पाहिलेच नाही. त्याचे सलग सहा चित्रपट तुफान गाजले. ‘वासना’, ‘संघर्ष’, ‘सुहागरात’, ‘परिवार’, ‘फरिश्ता’ व ‘ब्रम्हचारी’.
‘ब्रम्हचारी’ चित्रपटात त्याच्यासोबत ११ बाल कलाकार होते, त्यातूनही त्याने केलेली भूमिका अविस्मरणीय ठरली. या चित्रपटातील त्याचे काम पाहूनच मेहमूद यांनी त्याला आपला पट्टशिष्य मानून, ज्युनियर मेहमूद हे नाव दिले. १९६९ सालामध्ये त्याचे तब्बल नऊ चित्रपट पडद्यावर झळकले. ‘विश्वास’, ‘सिमला रोड’, ‘राजा साब’, ‘प्यार ही प्यार’, ‘नतीजा’, ‘चंदा और बिजली’, ‘बालक’, ‘अंजाना’, ‘दो रास्ते’. यातील ‘दो रास्ते’ चित्रपटाने रौप्य महोत्सव साजरा केला.

१९७० साली ज्युनियर मेहमूदने पाच चित्रपट केले. ‘यादगार’, ‘कटी पतंग’, ‘घर घर की कहानी ‘, ‘बचपन’, ‘आन मिलो सजना’. यातील सुपरस्टार राजेश खन्ना सोबतचे ‘कटी पतंग’ व ‘आन मिलो सजना’ यांनी विक्रमी यश संपादन केले. दोन्ही चित्रपटातील नायिका, आशा पारेखच होती. ‘आन मिलो सजना’ मधील ‘पलट मेरी जान…’ या गाण्याला, ज्युनियर मेहमूदने आपल्या मिष्कील अदाकारीने चार चाॅंद लावलेले आहेत..

१९७१ साली ज्युनियर मेहमूदचं वय पंधरा वर्षांचं झालं होतं. आता तो बाल कलाकार राहिलेला नव्हता, तरीदेखील त्याच्या बारीक अंगकाठीमुळे तो दहाबारा वर्षांचाच दिसत होता.. ‘उस्ताद पेट्रो’, ‘रामू उस्ताद’, ‘लडकी पसंद है’, ‘जोहर मेहमूद इन हाॅंगकाॅंग’, ‘कारवाॅं’, ‘हाथी मेरे साथी’, ‘छोटी बहू’, ‘चिंगारी’, ‘हंगामा’, ‘खोज’ व देव आनंदच्या ‘हरे राम हरे कृष्ण’ या चित्रपटांतून तो दिसला.

१९७२ साली त्याने ‘बाॅम्बे टू गोवा’ या चित्रपटात, सिनियर मेहमूद बरोबर काम केले. या सहा वर्षांत त्याने आपले बालपण विसरुन एखाद्या मोठ्या कलाकारा प्रमाणे रात्रंदिवस काम केले. त्याचे वडील, रेल्वेत नोकरीला होते. त्यांना महिना ३२० रुपये एवढाच पगार होता.. त्याच वेळी ज्युनियर मेहमूदचं मानधन ‘पर डे ३००० रुपये’ होतं ! त्या काळी मुंबईत ‘एम्पाला’ या परदेशी कार फक्त बारा होत्या. त्यातील एक ज्युनियर मेहमूदची होती. तो या कारने शुटींगसाठी जात असे. त्याने राज कपूर सोडून देव आनंद, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, धर्मेंद्र, मनोजकुमार, इत्यादी सर्व यशस्वी हिरोंसोबत काम केल़ेले आहे.

साठ व सत्तरच्या दशकातील कौटुंबिक चित्रपटात आवर्जून लहान मुलांच्या भूमिका असायच्या. त्यांच्या तोंडी गाणं, पॅरोडी असायचीच. १९७५ पासून ज्युनियर मेहमूदचे आलेले चित्रपट फारसे कुणाच्या लक्षात नसतीलही.. ‘रोमिओ इन सिक्कीम’, ‘आपबिती’, ‘फर्ज और प्यार’, ‘लव्हर्स’, ‘फुलवारी’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘सदा सुहागन’ या चित्रपटांतून, सचिन सोबतचे ‘गीत गाता चल’ व ‘अखियों के झरोखोंसे’ हे चित्रपट मात्र कायमस्वरूपी लक्षात राहिले !

ज्युनियर मेहमूदने आपल्या फिल्मी कारकिर्दीत २६५ चित्रपट केले आहेत. १९८५ नंतरचे चित्रपट स्वीकारताना त्याने ‘बी ग्रेड’चे चित्रपट नाकारायला हवे होते. तो ‘शिक्का’ एकदा पडला की, तुम्ही कमावलेले नाव खराब होते. अनेक नामवंत कलाकारांनी, आपल्या कारकीर्दीत अशा चुका केलेल्या आहेत.

ज्युनियर मेहमूदने सहा चित्रपटांची निर्मिती व त्यांतील काहींचे दिग्दर्शनही केले आहे. त्यातील दोन पंजाबी, एक आसामी व तीन मराठी आहेत. ‘प्यार का दर्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा’ ही कौटुंबिक व मुलांसाठीची ‘तेनालीराम’ या टीव्ही वरील मालिकेत त्याने मुल्ला नसीरुद्दीनची भूमिका साकारलेली आहे.

गेल्या चार वर्षांपर्यंत त्याने काम करणे चालू ठेवले होते. नंतर मात्र विश्रांती घेतली होती. अलीकडे वजन झपाट्याने कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपासण्या केल्या असता डाॅक्टरांनी कॅन्सर चा आजार बळावल्याचे सांगितले.
चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना या आजाराने ग्रासलेले आहे. त्यातील काहींनी वेळीच उपचार करुन त्यावर मातही केलेली आहे. याला कारणीभूत ठरते, या सिने कलाकारांची जीवनशैली ! अतिश्रम, रात्रंदिवस काम करणे, अवेळी जेवण, व्यसनं, मानसिक ताणतणाव यामुळे उतारवयात त्यांना शरीर साथ देत नाही…
ज्युनियर मेहमूद यांना मी प्रत्यक्ष पाहिलं ते १९९० साली, मुंबईतील कमलीस्तान स्टुडिओमध्ये. त्यावेळी मी ‘सूडचक्र’ चित्रपटासाठी स्टील फोटोग्राफी करीत होतो. लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया बेर्डे यांच्यावर एका गाण्याचे चित्रीकरण चालू होते. चित्रपटाचे नांव होते, ‘मस्करी’! त्याना घेऊन पुण्यातील मोहन कुमार भंडारी यांनी ‘ज्युनियर मेहमूद म्युझिकल नाईट’चे अनेक कार्यक्रम केले होते. ज्युनियर मेहमूद यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

— लेखन : सुरेश नावडकर
— संकलन : संजीव वेलणकर. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८