90 च्या दशकातील गाणं 1942 ए लव स्टोरी चे ..
इक लड़की को देखना तो ऐसा लगा…….
हे गाणं माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक. मनीषा कोईराला त्या काळात खूप सुंदर दिसायची. ह्या गाण्यात तिचं सौंदर्य खूप खुलून दिसलं आहे. अनिल कपूर प्रेमात वेड लागल्यावर तरुण जसा वागेल तसाच वागताना दिसतो. मनीषा कोईराला अल्लडपणे वागताना दिसते.
ज्या काळात “टेलिफोन धुन में हंसनेवाली” सारखी काहीशी निरर्थक गाणी बोकाळली होती त्या काळात हे गाणं लिहिलं गेलं आणि प्रत्येकाचं मन मोहवून गेलं. हे क्लासिक गाण्यांपैकी एक गाणं आहे.
जावेद अख्तर ह्यांनी हे लिहलंय. ह्या गाण्यात मुलीला दिलेल्या उपमा अतिशय सुंदर, सौम्य, रम्य आणि तरल आहेत. सगळ्या उपमा उच्च दर्ज्याच्या आहेत.
जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख्वाब.
कळी उमलताना किती सुंदर असावी ? शायर म्हणजेच मनमोहक जगाचा निर्माता. त्यात त्यांचे स्वप्न ?
किती रोमांचक उपमा….
जैसे उजली किरन, जैसे बन में हिरन
चकचकीत आरुषी आणि बागडणारे हरिण…
बस. ही कल्पना ज्या मुलीसाठी असेल तिचं रूप किती लोभसवाणे असेल विचार केला की मजाच वाटते.
जैसे चांदनी रात जैसे नरमी की बात…
चंदेरी रात आणि त्यात नरम मुलायम गप्पा वाह वाह काय कल्पना केली आहे कवीने अफलातून…..
जैसे मंदिर में हो कोई जलता दिया…
तरुण मुलगी मंदिरात तेवणाऱ्या दिव्या सारखी भासावी हे सात्विक प्रेमाचं प्रतीक…
जैसे सुबह का रूप जैसे सर्दी की धूप.
सकाळचं अनाघ्रात सौंदर्य अगदी कोमल आणि ऊन तरी कसं ? जसं थंडीत गोड उबदार …अशी ही उपमा मनाची पकड घेते…..
जैसे बीना की तान जैसे रंगो की जान.
वीणेतून हळुवार प्रस्रवित होणारी कोमल तान, तन मन वेडावून जाते तशी ही नायिका. रंगाचा जणू ही प्राणच. काय उपमा दिली आहे. रंगाचा प्राण वाह वाह वाह…
जैसे बलखाए बेल जैसे लहरों का खेल.
वल्लरीची वाऱ्यासवे लडिवाळ हालचाल आणि वाऱ्यामुळे होणारी तरंगांची खेळी समोर पटकन् नाजुकपणे धावणारी चंचल नायिका उभी राहते….
जैसे खुशबू लिये आए ठंडी हवा.
(आता इथे पवन शब्द न घेता हवा हाच शब्द घेतला कारण मला वाटतं हवा हा शब्द नशा आणणारा असावा. आणि खुशबू आणि हवा हे दोन्ही एकाच भाषेतील शब्द)
वाह! मस्त डोळे मिटून गंधाळलेला वारा हुंगावा तसाच सुवास दरवळतो तिच्या येण्याने किंवा अस्तित्वाने. भारीच आवडलं हे…….
जैसे नाचता मोर ,जैसे रेशम की डोर.
मोराची उपमा ही तर नायिकेच्या चालण्याला नेहमीच दिली जाते पण रेशम की डोर ही उपमा आवडते. नाजुक मऊ मखमली रेशमा सारखी नायिका? किती ती नाजुक असणार ?…..
जैसे परियों का राग, जैसे संदल की आग.
सुंदर पऱ्यांनी राग आळवला तर ? एक तर परी ही स्वतः सुंदर त्यात ती रागदारी करणारी मग काय विचारता ? सोने पे सुहागा. ही कल्पकता वेगळीच आणि गंमतशीर पण आवडणारी आहे. चंदना ची आग? रागात ही सौंदर्य आणि सुगंध? क्या अनोखी बात है .वाह !…..
जैसे सोला सिंगार जैसे रस की फुहार.
रमणीने श्रृंगार केला तर केला पण सोला श्रृंगार ? काय रुपडं असेल ? म्हणजे सौंदर्याची पराकाष्ठा. मग आणखी गहजब म्हणजे रस की फुहार. सौंदर्य रसाचं कारंजंच की….
आहिस्ता आहिस्ता बढ़ता नशा.
नशा ही कशी जी हळुवारपणे हृदयावर काबीज होतं आहे नकळत पण हवी हवीशी वाटणारी….
एकंदरीतच हे गाणं नायिकेच्या अनेक रूपांचं वर्णन करणारं.
पण किती सात्विक. त्यात नायक असून ही, अलिप्त असल्या सारखा म्हणजे माझं प्रेम आहे, तू माझी आहेस, आपण जन्मोजन्मी बरोबर राहू वगैरे कुठेच आलेलं नाही.
बस नायिकेला बघितलं आणि काव्य पाझरत गेलं असा भास ह्या गाण्यात मला जाणवतो.
सुंदर मनीषा कोईराला आणि वेडावलेला कवी हृदय मिळवलेला रसिक नायक. कुमार सानू ने ह्या गाण्याला न्याय दिला आहे. त्याची सर्वच गाणी मला आवडतात असं नाही पण हे गाणं मात्र आवडलं. त्याने पूर्ण इमानदारीने हे गाणं म्हटलं आहे.
जावेद अख्तर सारखे गीतकार आणि पंचम दा सारखे संगीतकार मग गाणं तर क्लासिक होणारच.
गमतीचा भाग म्हणजे हे गाणं करायचं ठरलं तेव्हा पंचम दा ह्या क्षेत्रात थोडे मागे पडले होते .त्यांचा ओरा कमी होत चालला होता. पण विधू विनोद चोपडा ह्यांच्या हट्टापायी त्यांनी हे गाणं केलं (ह्या चित्रपटातील सर्वच गाणी) आणि ते हिट काय सुपर हिट झालं. इतका उपमा अलंकाराचा प्रयोग क्वचितच गाण्यात झाला असेल.आणि हेच ह्याचे वैशिष्ट्य.
मराठीत असंच एक गाणं आहे..
कधी तू… रिमझिम झरणारी बरसात. ते गाणं ही मला अतिशय आवडतं.

— लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800