Saturday, July 27, 2024
Homeलेखछत्रपती शिवराय : अखंड दरवळणारा स्मृतिगंध

छत्रपती शिवराय : अखंड दरवळणारा स्मृतिगंध

नुकताच ३ एप्रिलला छत्रपती शिवाजीमहाराजांचा ३४३ वा स्मृतिदिन झाला. मागील दोन महिन्यांत शासकीय आणि तिथीप्रमाणे होणारे दोन जयंती महोत्सवही झाले.

महापुरुषांची जयंतीच साजरी करावी, पुण्यतिथीचा काय महोत्सव करणार ? कारण महापुरुषांना मरण नसतं ! ते येतात हेच खरं ! ते जात मात्र नाहीत. “यावत चंद्र दिवाकरौ” ते अजरामरच असतात. कोट्यवधी पामर ज्याच्या खिजगणतीतही नसतात त्या काळ्याकभिन्न काळाचा कराल जबडाही त्यांना गिळंकृत करण्याचं धाडस करत नाही. म्हणूनच महाराज चंद्रसूर्य असेपर्यंत !

थोडीथोडकी नाहीत ३४३ वर्षे झालीत महाराजांना इहलोकीचा निरोप घेऊन! पण आठवतच राहतात महाराज ! कुणाला श्रध्दास्थान म्हणून तर कुणाला प्रेरणास्थान म्हणून. अडचणीत, संकटात, अराजक माजल्यावर तर नक्कीच आठवतात. तर कुणाला राजकीय फायद्यासाठीही आठवतात. पण आठवतातच हे मात्र नक्की ! मृत्यूनंतर तब्बल ३४३ वर्षे एखाद्या माणसाचं नाव उगीच का जगात टिकतं ? कुठला तो कपोलकल्पित मृत्युंजय यज्ञ न करता, आयुष्यात अनेकदा निधड्या छातीनं मृत्यूला सामोरं जाऊनही महाराज मृत्युंजय ठरले.

साहित्यिक श्री.म.माटे म्हणत, माणसाचं आयुष्य दोन प्रकारे मोजलं जातं – एक जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण जगतो ते ! आणि दुसरं मृत्यूनंतर आपलं नाव जगात टिकतं ते ! खरी श्रीमंती तिलाच म्हणतात; की पैसे संपल्यानंतरही जिचा सुगंध दरवळत राहतो आणि खरं जगणंही त्यालाच म्हणतात की मृत्यूनंतरही ज्याचा कार्यसुगंध दरवळत राहतो. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी १६४५ ला रायरेश्वराच्या शिवालयात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. १६५९ ला अफजलखानाचं संकट निवारलं. १६६० ला पन्हाळ्याचा वेढा फोडला. १६६३ ला शायिस्तेखानाची फजिती केली. १६६५ ला पुरंदरच्या तहात होतं नव्हतं ते सारं गमावलं. १६६६ ला बादशाहाच्या हातावर तुरी देऊन आग्-याहून सुटका करून घेतली. एकही किल्ला हाती नसतांना ३६१ किल्ल्यांचं स्वराज्य उभं करत ६ जून १६७४ रोजीच्या राज्याभिषेकाने त्रिखंडात स्वराज्याची द्वाही फिरवली. मी राजा झालो याचा गर्व न मिरवता आम्ही नि आमच्या रयतेनं स्वराज्य निर्माण केलं याची ग्वाही दिली. ३५ वर्षांची अहोरात्र धडपड ३ एप्रिल १६८० ला विसावली. अवघ्या ३५ वर्षांत ७५० वर्षांचं पारतंत्र्य हटवलं महाराजांनी !

शिवराय देहानं गेले पण विचारानं प्रत्येकाच्या काळजात जिवंतहेत! शेकडो गडकोट किल्ले उभारले तरी कुठंही स्वतःच्या नावाची कोनशिला लावली नाही. तरीही इथल्या मातीच्या कणाकणात आणि इथल्या माणसांच्या मनामनात महाराज अजरामर आहेत. सागरसंपत्ती, वनसंपत्ती, खनिजसंपत्ती इतकीच महापुरुषांच्या विचारांची संपत्तीही बहुमोलच असते.

”शिवाजीमहाराजांचे पराक्रमच इतके अद्भुत वाटतात, की त्यामुळे त्यांच्या ठिकाणी राज्यकर्ता म्हणून असणाऱ्या असामान्य गुणांचा विसर पडतो” अशी खंत न्यायमूर्ती रानडे यांनी व्यक्त केली आहे. शिवरायांचा गौरव करतांना रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई म्हणतात, “ज्या पुरुषांस कधी कोणतेही दुर्व्यसन शिवले नाही, ज्याने परस्त्रिस मातेसमान मानिले, ज्याने स्वधर्माप्रमाणेच परधर्मास आदर दाखवला, ज्याने युद्धांत पाडाव केलेल्या शत्रूंचे लोकांस त्यांच्या जखमा बऱ्या करून स्वगृही पोचवले, ज्याने फौज, किल्ले, आरमार इत्यादी योजनांनी स्वदेशसंरक्षणाची योग्य तजवीज करून ठेवली, ज्याने सर्वांचे आधी स्वतः संकटात उडी घालून आपल्या लोकांस स्वदेशाची सेवा करण्यास शिकवले, ज्याने अनेक जिवावरच्या प्रसंगी केवळ बुद्धिसामर्थ्याने स्वतःचा बचाव केला, ज्याने औरंगजेबासारख्या प्रतापी बादशाहाचे भगीरथ प्रयत्न सतत तीस वर्षे पावेतो यत्किंचित चालू दिले नाहीत, इतकेच नव्हे, तर तीन राज्यांचा पाडाव करून अखिल भरतखंडात अपूर्व असे स्वराष्ट्रांचे स्वतंत्र राज्य स्थापन करून, त्याची कीर्ती पृथ्वीवर अजरामर करून ठेवली ; त्या प्रतापी व पुण्यशील पुरुषाची योग्यता पूर्णपणे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे !

पुण्यास प्रत्यक्ष राहत्या वाड्यात पाच वर्षे पावेतो औरंगजेबाचे सुभेदार तळ देऊन बसले, तेव्हा त्याची ती मगरमिठी सुरतेचे नाक दाबून मोठया युक्तीने शिवाजीने सोडवली, या त्याच्या युद्धकौशल्याची इतिहास सदैव तारीफच करत राहील. कोणास कधी जागिरी अगर जमिनी तोडून न देणारा, न्यायाचे कामांत कोणाची भीडमुर्वत न धरणारा, दुष्टांचा काळ पण गरिबांचा कनवाळू, एकंदर रयतेस पोटच्या मुलांप्रमाणे वागवणारा, सदैव सावध व उद्योगी , नेहमी मातेच्या अर्ध्या वचनात राहून अहर्निश राष्ट्राची चिंता वाहणारा,स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म या विविध संपत्तीचे संगोपन करणारा, पापभीरू परंतु रणशूर, असा हा आधुनिक काळाचा अद्वितीय राज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी, प्राचीन पुण्यश्लोकांचे पंक्तीत बसण्यास सर्वथैव पात्र आहे.”

म्हणूनच शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥ राजे आपल्या पुण्यपावन स्मृतींस मानाचा मुजरा !

— लेखन : डॉ संजय गोर्डे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८