श्री. सिद्धनाथाच्या पावन कुशीत वसलेले खरसुंडी हे छोटंसं गाव माझ्या मनात लहानपणापासून घर करून आहे. दर पौर्णिमा आणि रविवारी देवाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी व्हायची. मंदिरात अन् सासन काठीवर श्रध्देने गुलाल खोबरे उधळण्यासाठी चैत्र-पौष जत्रेत भक्तांची झुंबड उडत असे.
हे गाव तसं लहान व कोरडवाहू पण दोन्ही यात्रेत खिलार खोंड, गाई-बैल विक्रीसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होतं. गाव अन गावकरी कोरडवाहू परिस्थितीतही सुखासमाधानाने राहात असत. गावात शाळा, हायस्कूल, सरकारी दवाखाना होता. दक्षिणेला ओढा तर प्यायच्या पाण्यासाठी दुष्काळातही न आठलेली देवाची विहीर होती.
इथेच ‘जंबू घडशी’ हा देवळालगत गल्लीत राहायचा. गडी तसा अंगाने मजबूत अन् धडधाकट, अंगमोडून काम करायचा. पोराचं लग्न करुन दिलं होतं. आता त्याच्यावर कोणतीच जबाबदारी उरली नव्हती. त्यामुळेच जंबू गावात जास्त थांबायचा नाही.
देवळासमोरुन थेट पेठेत डाव्या बाजूस हिरु कळवात, उत्तम पुजारी यांचे किराणा दुकान त्याच्या पुढे पुणेकरांचं कापड दुकान तर उजव्या बाजूस दादा उडप्याचे हॉटेल. तेथील कांदा भजी तो आवडीने खायचा. पेठेच्या उत्तर टोकाला एस्टी थांबा होता. डाव्या बाजूने पुढे गेल्यावर प्राथमिक शाळा अन सरकारी दवाखान्यासमोर बाजारतळ होता.
दवाखान्यालगत पोस्टासमोरुन पुढे गेल्यावर डावीकडे जनावराचा दवाखाना होता. थेट पुढे हायस्कूल ओलांडून पश्चिमेला बलवडी घाटानं चालत तो डोंगरातल्या शेतात पोहोचायचा.
डोंगरातल्या वस्तीवर त्याची दोन जनावरं चार शेळ्या होत्या. तर विहिरीच्या पाण्यावरच थोडं शेत होतं. येथेच त्याचा जीव गमायचा. दिवसरात्र तिथे तो चांगला रमायचा. दिवस उजाडल्या पासून जंबू सतत कामात गुंतलेला असायचा. शेतात राहात असल्यानं त्याला कोणतं ना कोणतं काम त्याला दिसायचे.
अलीकडे गावाकडं त्याच्या फेऱ्या कमी झाल्या होत्या. कधी मधी रविवारी अन् फ़क्त सिद्धनाथाच्या यात्रेत दर्शनाला यायचा. गडी तसा धडधाकट पण खरा कासावीस व्हायचा ते पावसाळ्यातल्या दम्यानं. दम्यासाठी त्याला फक्त देशपांडे डॉक्टरांनी दिलेल्या औषधानच गुण यायचा. त्याचं पोरगं बऱ्याचदा तालुक्याच्या डॉक्टरकडे घेऊन जातो म्हंटलं तरी तो बिलकुल तयार व्हायचा नाही. देशपांडे डॉक्टरलाही जंबू त्याच्याकडं वर्षानूवर्षे येत असल्यानं जंबूची नाडी चांगली माहिती होती. जंबू अधीमधी डोंगरातुन जाता-येताना डोंगरातला रानमेवा, मध तर कधी देशी गाईचं तूप डॉक्टरला नेऊन द्यायचा. चालूवर्षी पाऊसपाणी चांगला होईल असे वातावरण होतं. मात्र एकदा पाऊस सुरु झाल्यावर जंबू पावसाळा संपेपर्यंत डोंगर उतरत नव्हता.
आज चांगलंच वारं वाहत होते. ढग जमू लागले होते. जंबूला सलग पाऊस सुरु होईल याची खात्री वाटू लागली. शनिवारचा दिवस होता. दिवस डोक्यावर येऊन देखील ढगांमूळ वेळ समजून येत नव्हती.
जंबूला खरा धसका दम्याचा होता. वारं अन ढग आलं की गडी दम्याच्या ढासनं अगदी तो अर्धमेला व्हायचा. तसं दम्याच दुखणं दमेकरीच जाणं. त्यामळे तो एकदम काळजीने उठला अन देशपांडे डॉक्टरचं औषध आणावं याचा विचार करु लागला. जर सलग पाऊस सुरु झाला तर गावात यायला जमलं नसतं. शिवाय दम्यानं जीव मेटाकुटीस येईल याची त्याला धडकी भरली होती. शनिवारी दवाखाना दुपार पर्यन्त असल्याने जंबू लगोलग रस्त्याला लागला. झपझप पावलं टाकीत गावाकडे निघाला.
दवाखाना दुपारी बंद होण्याआधी डॉक्टरना गाठायचं होतं. त्याला धाकधूक होती ती वेळेत पोहोचायची. पण व्हायचं तेचं झालं. दुपार टळत आल्यानं व डॉक्टरना तालुक्याला जायचं असल्यानं त्यांनी दवाखाना जरा लवकरच बंद करीत होते. इतक्यात जम्बू धापा टाकत तिथे तो पोहोचला.
डॉक्टर म्हणाले “काय रे जम्बू, बरा आहेस ना ? अन् किती उशीर केलास”?
तसा जम्बू वरमला. डॉक्टरचा त्याला आदरयुक्त धाक असायचा.
मग घाबरत बोलला,
“होयजी, डॉक्टर मला उशीरच झाला. पावसाळा तोंडावर आला तसं दम्यानं मी बेजार हुतुया म्हणून लगबगीनं आलुया”.
डॉक्टरला त्याच्या दुखण्याची माहिती होतीच. पण आज जरा गडबड अन त्यात दवाखाना बंद केल्यानं पुन्हा दवाखाना उघडायचा त्यांनी जरा आळस केला. मग खिश्यात हात घालून एका कागदाच्या कपट्यावर पेनने काहीतरी लिहून कागद जंबूच्या हातात ठेवत डॉक्टर म्हणाले, “जंबू हे औषध तीन टाईम खा. अन सोमवारी परत येऊन मला दाखव. तेंव्हाच मी पैसे घेईन. आज मी जरा गडबडीत आहे”. असे म्हणत कागदाची चिट्टी त्याच्या हातात कोंबत ते निघूनही गेले. जंबू डॉक्टरच्या शब्दाबाहेर नसल्याने मुकाट्यानं कागद हातात घेतला.
कागद २-३ वेळा मागं पुढं बघत त्याने बंडीत कोंबला. जंबू मात्र आज एकदम नाराज झाला. डॉक्टरनं नेहमीप्रमाणे त्याला तपासलं नव्हतं. त्यांच्याकडचे गोळ्या, पातळ औषध काहीच दिलेलं नव्हतं. पण या सर्वाला मीच जबाबदार. कारण मीच लवकर निघायला पाहजे होतं असं त्याला वाटून गेलं. स्वतःलाच दूषणं देत तो मागं फिरला.
वास्तविक डॉक्टरांनी मेडिकल मधून लिहून दिलेलं औषध विकत घेण्यासाठी ती चिट्टी त्याला दिली होती. पण हे अडाणी जंबूच्या ध्यानात आलं नव्हतं. गावात येऊनही घरांकडे न जाता तसाच तो डोंगराला मागं फिरला.
घरात आल्यावर थोडा वेळ विश्रांती घेतली. सांजच्याला लवकरच त्यानं भाजी भाकरी खाऊन घेतली. डॉक्टरनं दिलेला कागद बंडीतुन काढून निरखून बघू लागला. डॉक्टरांनी सांगितल्या नुसार त्या कागदाचे नीट तीन तुकडे केले. त्यातल्या एक तुकडयाची गोळी करुन तोंडात टाकुन पाण्याबरोबर गिळली.
देशपांडे डॉक्टरवर त्याचा देवासारखा भरवसा होता. पाणी पिऊन लागलीच झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याची बऱ्यापैकी दम्याची ढास कमी झाली होती. डॉक्टरांनं गडबडीत दिलेल्या कागदात किती दम आहे या विचारानं तो मनोमन सुखावला होता. दिवसभरात राहिलेले कागदाचे तुकडे गोळी करुन दोन वेळेस पाण्याबरोबर त्यानं घेतले. मात्र सोमवारी येरवाळीच दवाखान्यात पोहोचला. दिवसाचा पहिलाच पेशंट म्हणून डॉक्टरनी जंबुला तपासत म्हणाले,”जंबू, औषध खाल्लंस काय ? कसं वाटतंय ?”
त्यावर जंबू लागलीच म्हणाला,”अगदी आराम वाटतोय”.
डॉक्टर म्हणाले,”कुठाय ती चिट्टी ? आन बघु इकडे.”
तसा जंबू चपापत पेचात पडला. मग धीर करत म्हणाला,”डॉक्टर तुमीच तर त्यो कागुद तीन वकुत खायला सांगितला हुता नव्ह”?
डॉक्टरना जंबूचं अडाणीपण व भोळेपण ध्यानात आलं होतं. पण त्याच बरोबर ते स्वतःही मनोमन खजील झाले. त्यांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन जंबूने केवळ आपल्यावरील जबरदस्त श्रद्धेपोटीं औषध म्हणून खाऊन त्याला बरं वाटलंय याची त्यांना जाणीव झाली. मग डॉक्टरांनी त्यांची अपराधी भावनेने जंबूची आपुलकीने कसुन तपासणी केली. नेहमीप्रमाणे गोळया-औषधे दिलीत पण एकही पैसा त्यांनी घेतला नाही.
“जंबू, तुला आत्ता काहीही त्रास होणार नाही. बिनधास्त जा.”असे सांगत म्हणत त्याची रवानगी केली.
एकाद्यावर अपरंपार ‘श्रद्धा’ किती उपयोगी पडू शकते याची यत्किंचितही जाणीव बिचाऱ्या जंबूला मात्र नव्हती.
— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800