लपवाव्या किती सांगा जखमा उरातल्या
साऱ्याच कर्मकहाण्या एकाच सुरातल्या…
दुर्योधन घराघरात धृतराष्ट्र अंगणी
होणार कशी न मलूल शुक्राची चांदणी..
कर्ण ही मांडलिक, पराक्रमी असून व्यर्थ
बांधून लोचनास गांधारी ती सशर्त..
दु:शासनास रान मोकळे सदाच येथे
ते आर्त आसवांचे, भरले घरात पोते..
कुंतीस नाही सौख्य राज्ञीपणात काटे
त्या राजलक्षुमित, झाले कसे ते वाटे ?…
ते षंढ वैभवात गर्जती पराक्रमास
लज्जेस रक्षणार्थ हाकारी माधवास…
माद्री असो वा अंबा फरपट जीवनात
त्या सत्यवतीचे घर बांधले उन्हात…
भीष्मास नाही सौख्य शापित जीवनात
सामोरी ये शिखंडी झालाच धनुष्य पात…
राजा असो वा रंक, सारेच संकटात
राज्ञीस ना कवच विकतात बाजारात…
जखमाच पाचविला सरणावरीही थेट
शापित मानवास श्रीहरीच देई भेट…
रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
संपादन:देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
महाभारतातील वास्तव जखमा काव्यात छानच मांडल्या आहेत. अर्थपुर्ण.
अर्थपूर्ण…!
प्रा.सौ. सुमती ताईंचे काव्य आशयगर्भ व अर्थपूर्ण आहे.