चला चला मुलांनो
जत्रेला चला
उंच उंच झोका घेण्या
वाट बघतोय झुला
खाऊ, खेळणी कितीतरी
मजा करा झटापटा
काय हवे, काय नको
सांगा पटापटा
आम्ही मित्रमैत्रिणी
जमल्या आमच्या जोड्या
एकमेकांच्या मग
काढू लागलो खोड्या
इतक्यात दिसल्या आम्हां
तरंगत्या होड्या
मजा करण्यासाठी मग
मारल्या त्यात उड्या
चक्राकार झुल्यामध्ये
ऊंच ऊंच गेलो
भीती वाटताच हळूच
डोळे मिटून बसलो
रंगीत फुगे घेऊन
फुगवले खूप
एकमेकांसंगे लढत
फोडलेही खूप
खेळ खेळून दमलो
आता खाऊ कांहीतरी
आईस्क्रीम,स्पेशल सुतारफेणी
वडापाव,मिसळ नि भेळपुरी
खेळण्यांची मजा
आता जरा घेऊ या
टेडी, पांडा, कांगारू
बोलावताहेत या, या
कांगीs, ओsकांगी रे
नेसतोस लुंगी छान
बाळाला कवेत घेऊन
उड्या मारतोस छान
अगबाई, ही बघ मनी
दिसते किती गोड
म्यांव,म्यांव करण्याची
आहे तिची खोड
पांडा रे पांडा
झोपतोस काय ?
तुला घेण्या आलो आम्ही
उठशील काय ?
कासवा ए कासवा
दिसतोस किती छान
हळुहळू चालतांना
वळवतोस मान
टेडीसाठी झाले वेडी
हट्ट खूप केला
आईनेच हळूच टेडी
माझ्याहाती दिला
अशी केली खूप मज्जा
जत्रेमध्ये आम्ही
दिवस कधी संपला
ते कळलेसुध्दां नाही.

— रचना : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800