निखिल भारत बंग साहित्य संमेलन, जमशेदपूर शाखा ह्यांच्यातर्फे जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने नुकतेच विविध भाषिक कविता संमेलन आयोजित करण्यात आले होते.
ह्यामध्ये बांगला भाषिक कवी-कवयित्रींप्रमाणेच हिंदी, इंग्लिश, संस्कृत ह्या सर्वांना परिचित असलेल्या भाषांच्या बरोबरच मराठी, उडिया, संथाली, भोजपुरी, उर्दू भाषिक कवी आणि कवयित्रींना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते. भारतातील विविध भाषांमधील ख्यातनाम कवींच्या काव्य रचना जमशेदपूर मधील साहित्यिकांना ऐकायला मिळाव्यात आणि त्या त्या भाषेतील रचना वैशिष्ट्ये समजून घेता यावीत ह्या उद्देशाने ह्या वर्षातील कविता संमेलनामध्ये प्रत्येक भाषेतील विख्यात कवींच्या काव्य-रचना सादर करण्याची विनंती करण्यात आली होती.
संमेलनाचा प्रारंभ गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या बंगाली रविंद्रगीत गायनाने करण्यात आला. संस्थेचे सचिव श्री.आशिष गुप्ता ह्यांनी चटकदार सूत्रसंचालन करून प्रत्येक भाषेतील साहित्यिकांना आपल्या कविता सादर करण्यासाठी आमंत्रित केले.
संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती झरना कार ह्यांनी प्रास्ताविक करून कविता-संमेलनाला प्रारंभ करून दिला.
मराठी भाषेच्या प्रतिनिधी म्हणून सौ. मृदुला राजे ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मृदुला राजे ह्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ह्यांची “कणा” ही कविता सादर करण्यापूर्वी कविवर्य कुसुमाग्रज ह्यांची थोडक्यात माहिती, त्यांचे मराठी भाषेतील गौरवास्पद स्थान, त्यांच्या साहित्याचा अत्त्युच्च दर्जा, विविध क्षेत्रातील लेखन प्रकारांमध्ये त्यांनी केलेली कामगिरी, कवितेच्या प्रांतातील ऊंच भरारी ह्या सर्व गोष्टींवर प्रकाश झोत टाकत, कुसुमाग्रजांची छोटीशीच पण अतिशय लोकप्रिय अशी “कणा” ही कविता, त्या कवितेचा सारांश हिंदी भाषेत संक्षिप्त रूपात सांगून, नंतर अमराठी श्रोत्यांपर्यंत पोहोचेल अशा प्रभावी पद्धतीने सादर केली. टाळ्यांच्या कडकडाटासह श्रोत्यांनी पसंतीची पावती दिली, तेव्हा “ही मानवंदना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ह्यांच्या कवितेला आहे”, असे नमूद करून मृदुला राजे ह्यांनी मराठी भाषिक जनतेच्या वतीने श्रोत्यांना व आयोजकांना धन्यवाद दिले.
मराठी भाषिक कवितेप्रमाणेच उडिया, संस्कृत, भोजपुरी भाषांमधील कवितांनाही श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि अशा पद्धतीची भाषिक देवाणघेवाण करणारी कविता संमेलने वारंवार आयोजीत करण्याची मागणी संस्थेच्या सदस्यांकडून करण्यात आली.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800