भाषा ही माणसांना, देशाला जोडणारा दुवा आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला संवाद साधण्यासाठी भाषेची आवश्यकता असते. प्रत्येक देशाची, राज्याची, गावाची भाषा वेगवेगळी असते. भाषा ही त्या देशाची संस्कृती, परंपरा टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. मोठे करत असते, समृद्ध करते. सध्याचे जग ग्लोबलायझेशनमुळे जवळ आले आहे. आपल्याला एखादी परदेशी भाषा येणं गरजेचं झाले आहे.
सध्या सर्वात जास्त बोलली जाणारी परदेशी भाषा म्हणजे जर्मन भाषा होय. जर्मन भाषेविषयी जाणून घेण्याआधी जर्मन देशाविषयी जाणून घेऊयात. जर्मन हा मध्य युरोपमधील एक स्वतंत्र देश आहे. क्षेत्राफळाच्या दृष्टीने हा देश जगात 63 व्या क्रमांकावर येतो. या देशाची राजधानी बर्लीन आहे. येथे प्रजासत्ताक लोकशाही असून युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. या देशाचे ब्रीदवाक्य म्हणजे ‘एकता, न्याय आणि स्वातंत्र्य’ होय. ‘दास लीड देर दोईचेन’ हे राष्ट्रगीत आहे. चलन युरो आहे. फुटबॉल हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे.
जर्मनी देशाची जर्मन ही मुख्य भाषा आहे. ही भाषा युरोपियन युनियनच्या 24 अधिकृत आणि कार्यरत भाषांपैकी एक भाषा आहे.जर्मन भाषेत बरेच संशोधनीय लेख व भरपूर साहित्य उपलब्ध आहे. ही भाषा शिकणे अवघड नाही कारण हीची मुळाक्षरे इंग्रजी भाषेशी समान आहेत. या भाषेतील व्याकरण संस्कृत भाषेशी मिळतेजुळते आहे.
जर्मन साहित्याची सुरुवात सुमारे 800 व्या कालखंडात झाली. आरंभीची ग्रंथरचना ख्रिस्ती मठवासीयांनी केली.
मध्ययुगीन कालखंडात प्रेमकविता ( मिन्नीसॉंग ) बहरास आली. महाकाव्य आले. मीनस्येगर आणि वोल्टर फोन डर फोगेलवायड हे प्रसिद्ध प्रेमकवी म्हणून ओळखले जात. फक्त प्रेमकविताच नाही तर देशभक्तीपर, सौंदर्यदृष्टी, निसर्गप्रेम, सूंदर गीते लिहिली हे त्यांचे वैशिष्ट्य होय. ‘निबलंडनलीड’ हे जर्मनांचे राष्ट्रीय महाकाव्य याच कालखंडात लिहिले गेले.
मध्ययुगात तिला राजमान्यता मिळाली. आणि मार्टिन लुथरने तिचा प्रचारभाषा म्हणून स्वीकार केला. समृद्ध साहित्य निर्माण केले.
तेराव्या शतकापासून जर्मन भाषेत धार्मिक स्वरूपाची नाटके लिहिली जाऊ लागली. सोळाव्या शतकात भावगीतं, नाटक व कादंबरी हे साहित्य प्रकार उदयास आले. सतराव्या शतकात ओपिट्स फोन बोबरफेल्ट हा कवी होऊन गेला. या काळात कविता समाजासाठी लिहिल्या गेल्या. डनिएल कास्पर फोन लोहेनश्ताइन हा प्रसिद्ध नाटककार आणि ‘सिप्लिसीसिमूस’ ही जर्मन साहित्यातील श्रेष्ठ कादंबरी होय. तीस वर्षाच्या युद्धच्या काळातील जर्मनीचे वास्तववादी परिणामकारक चित्र या कादंबरीमध्ये शब्दरूपात रेखाटले आहे.
अठराव्या शतकात फिड्रीख रुडोल्फ फोन कनिटझ, बेजमिन नॉयकीर्श हे दोन कवी होऊन गेले.
एकोणीसव्या शतकात स्वछंदवाद सुरुवात झाली. हैंइन्रीख हाईन हा तरुण जर्मनी तील सर्वश्रेष्ठ साहित्यिक.
समृद्ध साहित्यिक आणि तात्विक परंपरामुळे जर्मनीला ‘कवी आणि विचारवंताची भूमी’ म्हणल्या जाते. जर्मनीचे सर्वात प्रसिद्ध लेखक थॉमस मान. डेथ इन व्हेनीस आणि मॅजिक माउंटन चे लेखक. ते सामाजिक समीक्षक पण होते. त्यांच्या कादंबऱ्यात विनोद आणि व्यंगचित्रं आहेत, त्यांना 1929 मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. गोयठे यांच्या साहित्याने जर्मनीला वेगळी ओळख दिली.
जर्मन भाषेच्या विकासाच्या दृष्टीने 1838 मध्ये सुरु झालेला महत्वाचा प्रकल्प म्हणजे ग्रिम बंधुचा जर्मन शब्दकोश. त्यात शब्दांचा इतिहास दिलेला आहे. त्याचा पहिला खंड 1854 मध्ये प्रसिद्ध झाला. आजही नवीन शब्दाच्या पुरवण्या जोडून तो अद्ययावत केला जातो.
इंग्रजीमध्ये लिहिलेल्या भारतीय कादंबऱ्या जर्मनी मध्ये तात्काळ भाषांतरीत होतात आणि सहज अनुवादीत ग्रंथ दुकानात उपलब्ध असतात.
— लेखन : रश्मी कुलकर्णी. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
महत्त्वपूर्ण माहितीबद्दल मनापासून मानवंदना…!!
.. प्रशान्त थोरात,
पुणे कार्यवाह गुरुकृपा संस्था.
+91 9921447007