बोरिस बेकर
विम्बल्डन टेनिस स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून जर्मनीचा बोरीस बेकर हे नाव सर्वांना माहितीचे आहे. सोळा वर्षांच्या त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीत अत्यंत लोकप्रियता मिळालेले हे जर्मनीचे माजी टेनिसपटू. त्यांनी १९८५ मध्ये अवघ्या १७ व्या वर्षी यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धा जिंकली होती.
बोरिस फ्रान्झ बेकर यांचा जन्म दक्षिण जर्मनीमधील हायडेलबर्ग जवळील लायमन या गावी एल्विरा आणि कार्ल हाईन्झ यांच्या पोटी २२ नोव्हेंबर १९६७ रोजी झाला. लायमन मध्ये त्यांच्या वडिलांनी ब्लाऊ वाईस (Blau Weiß Tennisklub) टेनिस सेंटर ची स्थापना केली. लहान वयातच बोरीस बेकर यांचे शिक्षण तिथे सुरू झाले. १९७७ मध्ये ते राज्यस्तरीय टेनिस गटाचे सदस्य बनले आणि दक्षिण जर्मनीमध्ये होणाऱ्या स्पर्धेत विजेते ठरले. त्यांचे टेनिस खेळातील कौशल्य पाहून “जर्मन टेनिस फेडरेशन” ने त्यांची निवड केली व संस्थेच्या खर्चातून त्यांचे प्रशिक्षण होऊ लागले. १९८४ पासून ते व्यावसायिक म्हणून खेळू लागले व त्यांना अनेक पारितोषिके मिळू लागली. टेनिस वर्ल्ड यंग मास्टर हे पारितोषिक त्यांना १९८५ मध्ये बर्मिंगहॅम येथे प्रदान केले गेले. त्यानंतर जर्मनीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवलेला त्यांचा विजय म्हणजे विम्बल्डनमध्ये मिळालेले सुवर्णपदक. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांना ‘सिनसिनाटी ओपन’ नावाच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळाले. हे मिळवणारे देखील ते पहिले सर्वात तरुण खेळाडू होते.
बोरिस बेकर तेव्हा म्हणाले होते, “माझ्या पालकांच्या नियोजनाप्रमाणे त्यांना मी शालेय शिक्षण पूर्ण करून, महाविद्यालयात शिकून एक सन्माननीय पदवी प्राप्त करणे अपेक्षित होते. मी टेनिसपटू बनावे हे त्यांच्या ध्यानीमनी देखील नव्हते.”
१९८६ मध्ये चेझ्क-अमेरिकन इव्हान लेंडला हरवून त्यांनी आपले विम्बल्डनचे चषक वाचवले. परंतु पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या पीटर दोहांन कडून हरल्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर आले. १९८८ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच डेव्हिस चषक जिंकून जर्मनीला पुन्हा एकदा अभिमान वाटावा अशी कामगिरी केली. १९८९ ह्या एकाच वर्षी त्यांना दोन मानाची ग्रँड स्लॅम एकेरी खेळाची चषके मिळाली; एक विम्बल्डन तर दुसरे यूएस ओपन.
बोरिस बेकर ह्यांच्या खेळण्याच्या शैलीबद्दल अनेक जाणकार व्यक्तींनी टिप्पणी केलेली आहे. त्यांचा खेळ हा जलद गतीचा असल्याने त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना “बूम बूम” किंवा “बूमर” अशी टोपण नावे मिळाली होती. त्यांच्या लांब उडी मारून शॉट मारण्याच्या पद्धतीला किंवा आपल्या कक्षेच्या अधिक पुढे जाऊन शॉट मारण्यासाठी केलेल्या पद्धतीला “Becker Dive”, “Becker Roll” असे म्हटले जाऊ लागले. त्याच्या कौशल्यावरून संपूर्ण टेनिस जगतात त्याचे नाव त्याच्या ह्या खास शैलीसाठी दिले गेले, ही खूपच मोठी गोष्ट होती. त्यांची ही कौतुकास्पद शैली तुम्ही खालील छोट्याशा व्हिडिओ मध्ये पाहू शकता.
१९९३ मध्ये मात्र बोरिस बेकर ह्यांच्या बारबारा फेल्टस बरोबर च्या वैवाहिक नात्यात अडचणी आल्याने तसेच जर्मनी मधील कर संबंधी कायद्यामुळे त्यांच्या उच्च शिखरावर पोहोचलेल्या व्यावसायिक कारकिर्दीला तसेच उत्पन्नाला उतरती कळा लागली. त्याच काळात त्यांना स्पर्धांमध्ये यश मिळेनासे झाले व त्यांनी १९९९ मध्ये निवृत्ती जाहीर केली.

अनेक वर्ष आर्थिक अडचणी आणि घोटाळ्यात अडकून आचके खाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले. सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच ह्या अत्युत्तम खेळाडूला बोरिस बेकर ह्यांनी २०१३ ते २०१६ पर्यंत प्रशिक्षण दिले ज्यामुळे त्याला जवळ जवळ २५ खेळांमध्ये यश मिळाले. तसेच डॅनिश खेळाडू होल्गर रुनला २०२३ ते २०२४ पर्यंत त्यांनी प्रशिक्षण दिले.

बोरिस बेकर यांना एकूण 49 एकेरी खेळातील पदके तसेच 15 दुहेरी खेळातील पदके मिळाली आहेत. त्याचबरोबर सहा मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना विजेतेपद मिळाले आहे; त्यातील तीन विम्बल्डन दोन ऑस्ट्रेलियन ओपन आणि एक यु एस ओपन आहे. याशिवाय त्यांना 13 मास्टर स्टार्टर्स तीन इयर अँड चॅम्पियनशिप आणि एकदा दुहेरी खेळातील ऑलिंपिक सुवर्णपदक मिळाले आहे. जर्मनीला क्रीडा क्षेत्रात इतके घवघवीत यश, प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून देणारा हा पहिलाच खेळाडू. म्हणूनच कदाचित ते म्हणाले की जर्मनी माझी वाट पाहत होती. पैसे, प्रसिद्धी किंवा जिंकायचे म्हणून नाही तर केवळ खेळावर प्रेम म्हणून खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये ह्यांचे नाव वरच्या क्रमांकावर येते.
बोरिस बेकर बद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहू शकता.

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800