“अल्बर्ट श्वाइट्झर”
लुडविग फिलिप अल्बर्ट श्वाइट्झर असे त्यांचे पूर्ण नाव. ते अल्सेसचे जर्मन आणि फ्रेंच मधील विविध विषयांचे विद्वान होते. ते एक धर्मशास्त्रज्ञ, ऑर्गन वादक, संगीतशास्त्रज्ञ, लेखक, मानवतावादी, तत्त्वज्ञ तसेच चिकित्सक देखील होते.
१९५२ साली त्यांना त्यांच्या “जीवनाबद्दल अनासक्त प्रेम” (Reverence for Life) ह्या तत्त्वज्ञानासाठी शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांचे तत्त्वज्ञान मुख्यत्वे अल्बर्ट श्वाइट्झर इस्पितळ नावाने चालणाऱ्या कार्यातून तसेच त्यांचे संगीत क्षेत्रातील कामात अभिव्यक्त होते. तसेच त्यांनीं ख्रिश्चन धर्मातील अनेक बाबींवर अत्यंत चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला आहे.

पूर्वीच्या अखंड जर्मनीमधील अल्सेस भागात १४ जानेवारी १८७५ रोजी अल्बर्ट श्वाइट्झर यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मस्थळ पूर्वी जर्मनीचा भाग होते, जे पहिले महायुद्ध संपल्यानंतर म्हणजेच१९१९ पासून फ्रान्स देशाचा भाग बनले. ॲडेल आणि लुईस थिओफिल श्वाइट्झर हे त्यांचे माता पिता. अल्बर्ट श्वाइट्झर ह्यांचे बालपण अल्सेस मध्येच गेले. त्यांचे वडील तेथील चर्चमध्ये पास्टर होते. त्यांनीच अल्बर्टला संगीताचे पहिले धडे दिले. १८८५ ते १८९३ त्यांनी ऑर्गन वाद्याचे शिक्षण घेतले. योहान सेबास्टियन बाख ह्या प्रसिद्ध संगीतकाराचे संगीत, वादन अल्बर्टला गूढ आणि शाश्वतेकडे घेऊन जाणारे वाटे. त्यांच्या संगीतावर त्यांनी खूप संशोधन, सखोल अभ्यास केल्याचे दिसते.
अल्बर्ट चे संगीत विषयक ज्ञान, विचार आणि वादनाची तसेच शिकण्याची आवड पाहून फ्रेंच ऑर्गन वादक चार्ल्स मारी विडोर ह्या संगीतकाराने अल्बर्टला मोफत प्रशिक्षण दिले व अल्बर्टने देखील त्याचे चीझ केले. संगीत विषयक अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथांची रचना त्यांनी केली आणि संगीत साहित्यात मोलाची भर घातली. द आर्ट ऑफ ऑर्गन बिल्डिंग अँड ऑर्गन प्लेइंग इन जर्मनी अँड फ्रान्स (The Art of organ building and organ playing in Germany and France) ह्या त्यांच्या साहित्यकृतीमुळे तर अवयव चळवळच (Organ Movement) सुरू झाली. त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये ऑर्गन वादक म्हणून उत्तम कामगिरी केली. यथावकाश अनेक ऑपेरा पाहून, ऐकून आणि तिथून प्रेरणा घेऊन त्यांनी पॅरिसमध्येच इसिडोर फिलिपकडून पॅरिस कॉन्सर्व्हेटरी येथे पियानो वादनाचे प्रशिक्षण घेतले. संगीत हे त्यांच्या हृदयात आणि बोटात सुद्धा वयाच्या ८८ व्या वर्षापर्यंत जिवंत होते असे काही संदर्भात वाचायला मिळते.

१८९९ मध्ये स्ट्रासबोर्ग मधील सेंट निकोलस चर्चमध्ये अल्बर्ट श्वाइट्झर अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे धर्मशास्त्रातील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना चर्चचे धर्मगुरू म्हणून नियुक्त करण्यात आले. ज्या विद्यापीठात त्यांनी धर्मशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले होते, तिथेच त्यांना पुढच्याच वर्षी म्हणजे १९०३ मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. १९०६ मध्ये त्यांचा ‘जीसस च्या जीवनाचा इतिहास’ असा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. The Quest of the Historical Jesus ह्या नावाने १९१० साली हे त्यांचे पुस्तक इंग्रजीत प्रसिद्ध झाले आणि लोकप्रिय देखील झाले. त्यांचे दुसरे पुस्तक ‘पॉल अपोस्टेल चे गुढत्व’ (Mystik des Apostels Paulus) हे पुस्तक १९३१ साली प्रसिद्ध झाले. धर्मशास्त्राचे अभ्यासक आणि विद्वान म्हणून त्यांना आदर सन्मान तर मिळालाच प्रसिद्धी देखील मिळाली.
अल्बर्ट श्वाइट्झर ह्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील काम देखील वाखाणण्याजोगे आहे. ३० वर्षाचे असताना त्यांना एव्हानगेलिस्ट मिशनकडून बोलावणे आले, जे त्यांनी स्वीकारले. त्यांना एक वैद्यकतज्ञ म्हणून काम देऊ केले होते. त्यासाठी यांनी पुन्हा एकदा विद्यापीठात वैद्यक क्षेत्रातील पदवी शिक्षण कठोर परिश्रम घेऊन १९११ मध्ये पूर्ण केले. तेव्हाच त्यांनी जिससचे मानसिक विश्लेषण या विषयावर शोधनिबंध लिहून प्रसिद्ध केला, ज्यात त्याने जीससच्या मानसिक स्वास्थ्याचे समर्थन केले आहे.
१९१२ मध्ये त्यांनी हेलेन बेसलाऊ नावाच्या ज्यु मुलीशी विवाह केला. १९१२ मध्ये वैद्यक क्षेत्रातील पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर १९१३ च्या दरम्यान त्यांनी व त्यांच्या पत्नीने स्वखर्चाने तसेच काही देणग्या घेऊन एक लहानसे इस्पितळ सुरू केले. पहिल्या काही महिन्यातच त्यांना २००० पेक्षा जास्त रुग्णांची सेवा करता आली. विविध दुर्धर आजार झालेले रुग्ण ह्यांच्याकडे उराशी खूप आशा बाळगून लांबून येत असत.
पहिल्या महायुद्धानंतर ते आणि त्यांची पत्नी जर्मनी सोडून फ्रेंच देशाचे नागरिक बनले .पण त्यांच्यावर सेना लक्ष ठेऊन होती. अनेक ठिकाणी त्यांना मजलदरमजल करत सरतेशेवटी त्यांच्या मूळ गावी म्हणजे अल्सेस मध्ये मुक्त करण्यात आले. त्यांनी या काळात धनार्जनासाठी काही भाषणे देऊन इस्पितळ चालू ठेवण्यास मदत केली.

अल्बर्ट श्वाइट्झर यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे आणि लोकोपयोगी कार्य म्हणजे त्यांचा निबंध “जीवनाबद्दल अनासक्त प्रेम”! (Ehrfurcht vor dem Leben). ह्या निबंधात ते म्हणतात,”पाश्चिमात्य जगातील सकारात्मकता लोप पावत चालली आहे. “पुढे ते लिहितात, खऱ्या तत्त्वज्ञानाची सुरुवात चैतन्याच्या सर्वात तात्कालिक आणि सर्वसमावेशक वस्तुस्थिती पासून झाली पाहिजे आणि ती पुढील प्रमाणे तयार केली जाऊ शकते, “मी जीवन आहे आणि मी जीवनाच्या मध्यभागी अस्तित्वात आहे जो जगण्याची इच्छा बाळगतो. “निसर्ग नियमात जीवनाचे एक रूप नेहमी दुसऱ्या रूपाला बळी पडते. तथापि मानवी चेतनेत इतर प्राण्यांच्या जगण्याच्या इच्छेबद्दल जागरूकता आणि सहानुभूती असते. नैतिक मनुष्य या विरोधाभासातून शक्य तितकं सुटण्याचा प्रयत्न करतो. जरी आपण परिपूर्णतेने प्रयत्न करू शकत नसलो, तरी आपण त्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे. जगण्याची इच्छा सतत स्वतःला पुनरुज्जीवित करते कारण ती एक उत्क्रांतीची आवश्यकता आणि आध्यात्मिक घटना असे दोन्ही आहे. जीवन आणि प्रेम याच तत्त्वात विश्वाशी वैयक्तिक व आध्यात्मिक संबंधात रुजलेले आहे. नैतिकता स्वतः प्रमाणेच इतर प्राण्यांच्या अस्तित्वाच्या इच्छेचा आदर करण्याच्या गरजेतून पुढे जाते. असे अत्यंत उत्कृष्ट किंतु कठीण वाटणारे तत्वज्ञान त्यांनी त्यांच्या पुस्तकात मांडले आहे.
त्यांचे मौलिक विचार आपण खालील 👇 लिंकवर क्लिक करून सविस्तरपणे जाणून घेऊ शकता.
ह्याच साहित्यकृतीसाठी अल्बर्ट श्वाइट्झर यांना १९५२ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. ह्याशिवाय त्यांना १९२८ मध्ये ग्योथं पारितोषिक मिळाले आहे व १९५९ मध्ये जेम्स कूक पदक मिळाले आहे.
४ सप्टेंबर १९६५ रोजी ९० वर्षांचे असताना त्यांचे आत्ताच्या फ्रान्स मध्ये लाम्बेरेन ठिकाणी वृद्धापकाळाने निधन झाले.
एकाच आयुष्यात अनेक विविध विषयात रुची असणाऱ्या, वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करणाऱ्या आणि जागतिक इतिहासात साहित्य व कर्म रूपाने उरुन राहणाऱ्या ह्या अलौकिक बुद्धिच्या अवलियाला सादर नमन. ह्या अद्वितीय व्यक्तिमत्वावर एक सिनेमा बनवला गेला आहे तो आपण खालील लिंकवर पाहू शकता.

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अल्बर्ट श्वाइट्झर यांची माहीती छान दिली आहे. जर्मनच्या सुपत्रांची माहीती मिळाली