Saturday, May 17, 2025
Homeयशकथाजर्मन विश्व : १६

जर्मन विश्व : १६

“स्टेफी ग्राफ”

स्टेफी ग्राफ जिचे पूर्ण नाव स्टेफानी मारिया ग्राफ असे आहे, ती जर्मनी मधील अत्युत्तम टेनिस खेळाडू आहे. जगभरात तिच्या खेळासाठी तसेच तिच्या सौंदर्यासाठी ती सुप्रसिद्ध आहे. जर्मनीची आत्तापर्यंत सर्वाधिक जास्त यश आणि कीर्ती मिळवलेली ही टेनिस खेळाडू आहे.

स्टेफी जर्मनी मधील मानहाइम शहरात १४ जून १९६९ रोजी जन्माला आली आणि तिथेच वाढली. हायडी शाल्क आणि पीटर ग्राफ हे तिचे पालक. तिचे वडील टेनिस कोच असल्याने टेनिस चे बाळकडू तिला त्यांच्याकडूनच मिळाले.
ती अवघी ३ वर्षांची असताना घरातच तिच्या वडिलांनी तिला लाकडी टेनिस रॅकेट कशी फिरवायची याचे प्रशिक्षण दिले. ४ वर्षांची असताना ती कोर्टवर सराव करायला लागली होती.
५ वर्षांची असताना ती पहिली टूर्नामेंट खेळली आणि नियमितपणे अशा स्पर्धांमध्ये अव्वल स्थान पटकावू लागली.

ऑक्टोबर १९८२ मध्ये  पहिल्यांदा ती व्यावसायिक स्पर्धा खेळली परंतु तेव्हाच्या प्रथम क्रमांकावर असलेल्या अमेरिकन खेळाडू बरोबर हरली. १९८३ साल जे तिचे पहिले व्यावसायिक कारकिर्द सुरू करणारे वर्ष होते तेव्हा ती केवळ १३ वर्षांची होती. जागतिक स्तरावर तिचा १२४ वा क्रमांक होता. पुढील ३ वर्षे तिने एकही विजेतेपद मिळवले नाही परंतु तिचा क्रमांक हळू हळू वाढत गेला. १९८३ साल संपता संपता तिचा क्रमांक होता ९८ तर १९८४ मध्ये ती २२ व्या क्रमांकावर पोहोचली. १९८५ साली तर ६ व्या क्रमांकावर आली. तिचे वडील तिच्या प्रत्येक खेळावर तसेच सामाजिक कार्यक्रमांवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवत होते जेणेकरून ती क्षमतेपेक्षा जास्त थकणार नाही आणि तिच्या ध्येयापासून हलणार नाही. अर्थातच याचे पर्यवसन तिच्या सातत्याने होणाऱ्या प्रगतीमध्ये झाले.

जगभरात महत्त्वाच्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात :
विंबल्डन,
फ्रेंच ओपन,
ऑस्ट्रेलियन ओपन आणि
अमेरिकन ओपन
.
या चारही स्पर्धांमध्ये 22 वेळा स्टेफीने विजेतेपद पटकावले आहे. सात वेळा विम्बल्डन, सहा वेळा फ्रेंच ओपन, चार वेळा ऑस्ट्रेलियन ओपन तसेच पाच वेळा अमेरिकन ओपन. अशा प्रकारचे यश मिळवणाऱ्या महिलांमध्ये स्टेफीचा जगात तिसरा क्रमांक लागतो. स्टेफीने ऑलिंपिक स्पर्धा तसेच फेडरेशन कप (1987 आणि 1992) या स्पर्धांमध्ये देखील उत्तम कामगिरी बजावली. विशेष म्हणजे 1988 साल तिच्यासाठी “सुवर्ण वर्ष” ठरले कारण ह्याच वर्षी स्टेफीने सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धा तसेच त्यावर्षीच्या सेवूल मध्ये भरलेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये टेनिस मधील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले. अशाप्रकारे तिने “गोल्डन ग्रँड स्लॅम” पूर्ण केले.

यानंतरही अनेक वर्ष स्टेफी ग्राफ खेळत राहिली. मोनिका सेलेस, हेलेना अशा नंतर आलेल्या महिला टेनिसपटूंना देखील तिने हरवले आहे. तिच्या सतरा वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीत तिने एकूण १०७ वेळा एकेरी तर ११ वेळा दुहेरी खेळात विजेतेपद मिळवले. २००० मध्ये तिने निवृत्ती घेतली.

स्टेफी ग्राफने आंद्रे आगासी या अमेरिकन टेनिस खेळाडू बरोबर २२ ऑक्टोबर २००१ रोजी विवाह केला. आंद्रे आगासी हा त्याच्या काळातील प्रथम क्रमांकावर असलेला टेनिस खेळाडू ज्याने एकेरी खेळात ६० वेळा विजेतेपद मिळवले आहे व अनेक वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धा देखील जिंकल्या आहेत.
ह्या दोघांचा विवाह विशेष म्हणजे विवाहबद्ध होताना फक्त दोघांच्या आई उपस्थित होत्या. बाकी कोणीही नव्हते. जागतिक स्तरावर प्रसिद्ध, लोकप्रिय असलेल्या दोन व्यक्तींचा विवाह इतका साधेपणाने झाला हे नवलच आहे नाही का…? ह्या खेळाडू जोडप्याला एक २३ वर्षीय मुलगा व २१ वर्षीय मुलगी आहे. हे ग्राफ आगासी कुटुंब सध्या अमेरिकेतील लास वेगास प्रदेशात राहतात. ह्या दोघांनी आपल्या मुलांना टेनिस खेळाडू होण्याची सक्ती केलेली नाही, हे देखील कौतुकास्पद आहे.

स्टेफी ग्राफने १९८८ मध्ये एक सामाजिक संस्था स्थापन केली जी युद्ध इत्यादी आपत्तींमध्ये जे अनाथ झाले, ज्यांना अत्यंत मोठा धक्का बसलेला आहे अशांसाठी काम करते. ह्या संस्थेचे नाव आहे “Children for Tomorrow”.

स्टेफीची व्यावसायिक कामगिरी पाहून तिला १९९९ सालची सर्वोत्तम महिला टेनिसपटू म्हणून घोषित करण्यात आले होते. तसेच सलग ३७७ आठवडे स्टेफी ग्राफला महिला एकेरीसाठी प्रथम क्रमांकावर राहण्याचे भाग्य मिळाले आहे. तिच्या खेळासाठी तिला अनेक सामाजिक तसेच राजकीय पारितोषिके देखील मिळाली आहेत. खेळाडू म्हणून तिची शैली अत्यंत उत्कृष्ट प्रभावशाली आणि मनमोहक आहे. तिचे चाहते तिच्या खेळाकडे अभ्यासपूर्ण खेळ म्हणून देखील पाहतात. अनेक नवीन खेळाडूंना प्रेरणा देणारा, शास्त्रशुद्ध पद्धतीने खेळला गेलेला आणि शारीरिक क्षमतेचा उच्चांक दर्शवणारा तिचा खेळ तिच्या चेहऱ्याप्रमाणेच सुरेख आहे. तिचे खेळातील काही कौतुकास्पद क्षण तुम्ही खालील 👇 व्हिडिओ मध्ये पाहू शकता.

गंमत म्हणून तिच्या बाबतीत घडलेली एक गोष्ट अशी की स्पर्धा चालू असताना, ती खेळत असताना तिच्या चाहत्यांमधील कोण्या एका प्रेक्षकाने तिला लग्नासाठी मागणी घातली होती आणि तिने प्रसंगावधान राखून तसेच खोडकर उत्तर दिले होते.. ते खालील 👇 व्हिडिओ मध्ये नक्की पाहा.

क्रमशः

प्रा आशी नाईक

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on आमचा वाडा…
कविता बिरारी on पहलगाम
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on स्नेहाची रेसिपी’ – १३
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ४८
विजया वाळुंज on जशाच तसे
अरविंद विनायक ढवळे on “पद्मश्री” उदय देशपांडे
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी on माझी जडणघडण : ४८
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम गोंधळ : संनियंत्रण आवश्यक
Pratibha Saraph on काही अलक
शितल अहेर on जशाच तसे
प्रदीप पाटील on जिचे तिचे आकाश : ८