“योहान वोल्फगांग फॉन ग्योथ“
योहान वोल्फगांग फॉन ग्योथ हे नाव जर्मन साहित्य क्षेत्रातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील साहित्यात देखील अत्यंत मानाने घेतले जाते. योहान वोल्फगांग हे प्रतिभावान कवी, सर्जनशील नाटककार, कादंबरीकार, अत्यंत हुशार शास्त्रज्ञ, महान तत्त्वज्ञानी, समीक्षक तसेच राजकारणी देखील होते. त्यांच्या ८३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि आरोग्यसंपन्न आयुष्यात त्यांनी भरपूर ज्ञानार्जन केले, प्रचंड प्रमाणात लेखन केले आणि अनेकविध प्रदेशांमध्ये प्रवास केला.
भारतीयांसाठी देखील योहान वोल्फगांग हे नाव विशेष आहे कारण ह्यांनीच आपली संस्कृत भाषा शिकून, कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल नावाचे नाटक वाचले. त्यांना ते इतके आवडले आणि भावले की त्यांनी ते डोक्यावर घेऊन नाचत आनंद व्यक्त केला असे म्हणतात. परिणाम अर्थातच असा की त्यांनी त्या नाटकाचा जर्मन भाषेत अनुवाद केला.

माईन नावाच्या नदीकाठी वसलेल्या फ्रँकफुर्ट शहरात २८ ऑगस्ट १७४९ रोजी योहान वोल्फगांग यांचा अत्यंत सधन घरात जन्म झाला. वडील योहान कास्पर प्रख्यात वकील होते तर आई पिढीजात श्रीमंतीचा वारसा घेऊन आलेली होती. ह्या दाम्पत्याला ७ मुले झाली खरी पण केवळ दोनच जगली.
एक म्हणजे योहान वॉल्फगांग आणि दुसरी त्यांची बहीण कॉर्नेलिया. गर्भ श्रीमंतीत वाढत असलेल्या ह्या दोघा बहीण भावांचे शिक्षण घरातच वडिलांच्या मार्गर्शनाखाली उत्तमरीत्या पार पडले. लहानपणीच त्यांना जर्मन भाषेबरोबर फ्रेंच, लॅटिन, ग्रीक, इटालियन ह्या भाषा सुद्धा शिकवल्या गेल्या.
वडिलांची इच्छा म्हणून योहान वॉल्फगाग ह्यांनी वकिली शिक्षण घेतले. विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वीच त्यांचे एक नाटक आणि एक कादंबरी लिहून झाली होती, मित्रमंडळींना ते वाचून दाखवल्यावर, ते अगदीच खराब आहे, वाचण्याजोगे नाही असे वाटून त्यांनी ते जाळून टाकले. वकिली शिक्षण पूर्ण करत असताना त्यांचे लेखन, संपादन कार्य चालू होते. शिक्षण चालू असतानाच त्यांचा एक निनावी कवितासंग्रह प्रकाशित झाला त्याचे नाव “अन्नेटे”.

योहान वॉल्फगाग यांचं बहुतांश लेखन त्यांच्या प्रेम प्रकरणातून स्फुरलेले होते असे साहित्य क्षेत्रात म्हटले जाते. १७६७ दरम्यान ते जेव्हा एका खानावळ चालवणाऱ्याच्या मुलीच्या प्रेमात पडले तेव्हा तिने मात्र एका वेगळ्या जास्त कमाई असणाऱ्या, मोठे पद असणाऱ्या अधिकाऱ्याबरोबर विवाह केला आणि ह्यांनी “दी मिटशुल्डीगेन” नावाचे प्रगल्भ विचारांचे नाटक लिहिले. ह्या नाटकात त्यांनी चुकीच्या व्यक्ती बरोबर विवाहबंधनात अडकल्याने एका तरुणीचा पश्चात्ताप विनोदी पद्धतीने दाखवला आहे.
एप्रिल १७७० पासून ऑगस्ट १७७१ पर्यंत योहान वोल्फगाग फोन ग्योथ ह्यांनी स्त्रासबर्ग मध्ये डॉक्टरेट पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.
स्त्रासबर्ग येथे वास्तव्य असताना समकालीन इतर विद्वानांशी संपर्क झाल्याने त्यांनी जर्मन संस्कृती आणि परंपरा, ख्रिश्चन धर्म, इंग्रजी साहित्य, जर्मन स्थापत्य अशा अनेक विषयांवर अभ्यास आणि चर्चा केल्या. त्यावर त्यांनी लेखन देखील केले. तेथेच अजून एकदा प्रेमात पडून देखील त्यांनी त्या मुलीचा विवाहबंधनात अडकायला नको म्हणून स्वीकार केला नाही व ते परत फ्रँकफुर्ट ला निघून आले.

थोडा काळ लोटल्यानंतर कामानिमित्त परगावी गेलेले असताना योहान वोल्फगाग परत एकदा एका मुलीच्या प्रेमात पडले. पण तिचा विवाह आधीच ठरलेला असल्याने त्यांनी स्वतः ला कामात व्यग्र करून घेतले. त्यांच्या अपुऱ्या, अधुऱ्या प्रेमाचा प्रभाव त्यांच्या लेखनात नेहमीच आढळतो.
जोहांन वॉल्फगांग हे क्रीस्टीयान वूलपियस नावाच्या मुलीबरोबर मात्र अनेक वर्षे विवाहाशिवाय एकत्र राहत होते. पण १८०६ साली दोघेही विवाहबद्ध झाले.

जोहांन वॉल्फगांग यांनी १७७२ ते १७७५ मध्ये जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवून देणारी कलाकृती रचली, जिचे नाव “अरफाउस्ट” असे होते. त्यात काही बदल करून १८३१ साली “फाउस्ट” नावाने ही कलाकृती पून: प्रकाशित झाली.
फाउस्ट ही दोन अंकी शोकांतिका असून ह्यातील नायकाचे नावच फाउस्ट असे आहे. ह्यात मुख्यत्वे प्रेम, आकर्षण, तत्वज्ञान, अध्यात्मिकता, धर्म आणि मृत्यू हे विषय अत्यंत सफाईदाररीत्या हाताळले आहेत. ह्या शोकांतिकेचे वर्णन टायटेनिझम असे करतात कारण हा नायक मानवतेच्या मर्यादेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. तो जादुई शक्ती मिळवण्यासाठी आपला आत्मा एका सैतनाला विकतो. अत्यंत उत्कृष्ट दर्जाची ही कलाकृती उत्कंठा वाढवणारी आणि वाचकाला खिळवून ठेवणारी आहे.

योहान वॉल्फगांग फोन ग्योथ ह्यांच्या इतर प्रसिद्ध कलाकृती म्हणजे विलकोमन उंड अबशिड (१७७५), अर्लक्योनिग (१७८२), प्रोमेथुस (१७८५), मिग्नान ( १७९५), देर झोऊबरलेहरलींग (१७९७), दि वाहलफेरवांडशाफ्टेन (१८०९), थियरी ऑफ कलर्स (१८१०), इटालियन जर्नी (१८१६) इत्यादी.

जर्मन साहित्य वर्तुळात गेली अनेक शतके मानाने झळकणाऱ्या आणि जगाच्या पाठीवर थोर जर्मन साहित्यिक म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्या ह्या महान व्यक्तीच्या सर्व साहित्याचे संकलन केले असता मोठ्या आकाराचे तीस खंड तयार झाले आहेत.
असा हा महान, जागतिक कीर्तीचा साहित्यिक २२ मार्च १८३२ रोजी वायमार शहरात पंचत्वात विलिन झाला.
क्रमशः

— लेखन : प्रा आशी नाईक. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान
अभ्यासपूर्ण वेचक लिखाण