“ही पानगळ हसवी मज, हळवीशी होई हृदयी
कोमेजलेली पाने, नवसावित्रीची गाणी गाती…”
वाऱ्याच्या मंद झुळुकीने हलकेच झुलणाऱ्या जारुळाच्या फांद्या…
सूर्याच्या उन्हात न्हालेल्या त्या जांभळ्या-पर्पल छटांच्या मोहक फुलांचा सडा…
आणि निसर्गाच्या कुशीत विसावलेले नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यान !
ताम्हण किंवा तामण, जारूळ बोंद्रा ,बुंद्रा या नावांनीही परिचित असलेल्या, ज्याचे शास्त्रीय नाव Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो. चांगली उंच असलेली ही फुल झाडे अनेक ठिकाणी दिसतात.

मे महिन्याची चाहूल लागताच, या उद्यानात जणू सृष्टीचा मोठा रंगोत्सव सुरू होतो. जारुळाच्या गडद जांभळ्या फुलांनी संपूर्ण झाड भारून जातं. त्याचं सौंदर्य इतकं देखणं की पाहणाऱ्याला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातं.
“उधाणलेल्या वाऱ्यासवे,
फुलांनी आज कहर मांडला
हिरव्या पानांत लपलेला,
जांभळा रंग खुलून आला…”
जारुळ किंवा ताम्हण—या फुलांच्या असंख्य छटा… त्याचा सौंदर्यसोहळा काहीसा अलवार, काहीसा गूढ, आणि तरीही मन मोहून टाकणारा. झाडाच्या बुंध्याजवळ पडलेली ती जांभळी पाकळ्यांची चादर पाहिली की वाटतं—या फुलांनी जमिनीला जणू एक शाही शाल अंथरली आहे!
हे जारुळ महाराष्ट्राच्या भूमीचं एक अनोखं लेणं आहे. महाराष्ट्र दिनाच्या सुमारास फुलणारी ही फुले जणू आपल्या मातृभूमीच्या गौरवगीताची आठवण करून देतात. महाराष्ट्राच्या अस्मितेला, त्याच्या सौंदर्याला, त्याच्या निसर्गशोभेला आपली रंगछटा बहाल करणारे हे जारुळ… म्हणूनच ते महाराष्ट्राचं राज्यपुष्प !

“गडद निळ्याजांभळ्या छटा,
फुलांच्या साजिऱ्या गप्पा…
माय मातीच्या अंगणात,
साजरा बहरला जणू सखा!”
कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात—जेथे पाणी भरपूर, तेथेच हा वृक्ष डौलाने उभा असतो. कोकणात त्याला “मोठा बोंडारा” म्हणतात. नदीकाठ, तलावाचे किनारे, पावसाळ्यात गच्च ओल धरून ठेवणारी माती—ही या जारुळाची हक्काची ठिकाणं. पाणी मिळालं की हा वृक्ष फुलतो, त्याचं वैभव फुलवतो !
विसावा उद्यानातील ही ताम्हण झाडे त्यांच्या मोहक फुलांनी लक्ष वेधून घेतात. निसर्गाच्या शांत सुरावटीत त्यांचा बहर जणू एखाद्या सुंदर कवितेचा गाणारा शेर वाटावा…
“संपेल शब्द अन् संपेल अर्थ
फुलांचा गंध उरला तरी…!”
जारुळ फुलले की मनावरही जणू उन्हाळ्यातील पहिल्या सरीसारखं आल्हाददायक, कोवळं समाधान उतरून येतं.
विसावा उद्यानात पसरलेली ही निळसर-जांभळी फुलं पाहताना वाटतं—निसर्गाच्या कुशीत विसावण्याचा हा क्षण नक्कीच अविस्मरणीय आहे…!

— लेखन, छायाचित्रण : विजय होकर्णे. नांदेड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अत्यंत सुंदर अशा जारूळाच्या फुलांची (माझ्यासाठी) नवीन माहिती आपल्या लेखातून खूप छान पध्दतीने दिली आहे. त्यातील व्हिडिओ मुळे तर लेख अजून छान वाटला.
अशाच नवनवीन फुलझाडांवर लिहीत रहा.
अभिनंदन