“उषा दिपक फाल्गुने”
तुम्ही गीत रामायणातली गाणी अनेकांच्या तोंडून ऐकली असतील. पण रामनवमीच्या दिवशी त्यातली १३ गाणी, “पुणेरी आवाज” या एफ एम वर शीळेवर म्हटलेली ऐकली होतीत का ? ती म्हटली होती, सध्या अमेरिकेत रहात असलेल्या उषा दीपक फाल्गुने ह्यांनी. तिथून रेकॅार्ड करून त्यांनी ती गाणी पाठवली होती.
उषाताई ह्या अतिशय सुरेख शीळ वाजवतात, कुठलीही गाणी त्या वाजवू शकतात. अनेक ठिकाणी त्यांनी कार्यक्रमात, स्पर्धेत, शीळ वाजवली आहे. बक्षिसं मिळवली आहेत.
त्या अभिमानाने सांगतात… “मुंबईत रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स फोर्ट येथे केमिस्ट्री मध्ये एमएससी करत होते तेव्हा केमिस्ट्रीची प्रॅक्टिकल्स करता करता वेळ लागायचा. त्यामुळे साईड बाय साईड हळू आवाजात शिट्टी वाजवून गाणी म्हणायला लागले. तिच सवय नंतर इतकी लागली की मी कॉलेजमध्ये शिकवायला लागले आणि मुलांची प्रॅक्टिकल्स घेणे व त्यांची जर्नल्स तपासणे इत्यादी करताना सहजरित्या अगदी माझ्या नकळत शिट्टीवर गाणे म्हणत असायचे. हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर कॉलेजच्या वार्षिक संमेलनात मला त्याबद्दल फिश पॉंड पण मिळाला होता.
डॉक्टर नवरा मिळाल्यामुळे त्यांची गेट-टुगेदर होत असायची, तेव्हा उषाताईंच्या “शीळ गाण्यां”ची पण फर्माईश व्हायची. त्यांच्या मिस्टरांना वेगवेगळे देश पाहायची आवड असल्यामुळे जवळजवळ 33 देशांमध्ये त्यांची भटकंती झाली. त्यावेळी फिरताना, बस प्रवास, रेल्वे प्रवास, विमान प्रवास इत्यादी मध्ये सहजरित्या टाईमपास म्हणून त्या गाणी गुणगुणायच्या. आजूबाजूच्या सीट्सवर बसलेल्या लोकांना कुठून तरी शिट्टीचा आवाज आला की ते कोण पुरुष शिट्टीवर गाणी म्हणत आहे ते पाहायला इकडे तिकडे शोधायचे आणि जेव्हा त्यांना एक स्त्री गाणं म्हणत आहे हे ऐकून खूप कौतुक वाटायचे. मग तेव्हा पण तिथे एखादा कार्यक्रम व्हायचा. आता त्या भारत सरकारच्या एका प्रसिद्ध प्रयोगशाळेतून शास्त्रज्ञ म्हणून निवृत झाल्या आहेत.

उषाताई या मुळच्या कोयनानगर इथल्या, उषा माधव दंडवते. त्यांनी मुंबईच्या फोर्टमधील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून एमएससी ही पदवी प्राप्त केली. तद्नंतर मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रातून डिप्लोमा इन न्युक्लिअर मेडिसिन, पुणे विद्यापीठाचा डिप्लोमा इन हायर एज्युकेशन असे दोन डिप्लोमा मिळविले. त्यानंतर त्यांनी लेक्चरर म्हणून कॅालेजात काम केले. पुढे त्यांना भारत सरकारच्या पुणे येथील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीत संशोधन करण्याची संधी मिळाली.
तिथे संशोधन करत असतांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वैद्न्यानिक प्रकाशनांमधून त्यांचे ३६ शोंधनिबंध प्रसिध्द झाले. २००७ साली त्यांची स्वित्झरलॅंड मधील प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. तिथे त्यांना नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या ३ विजेत्यांना कामानिमित्त प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली होती.

उषाताईंनी निवृत्त झाल्यावर राहिलेले छंद जोपासायचे ठरवले. त्याप्रमाणे आता त्या त्यांच्या छंदात छान रमतात. कविता करणे हा त्यांचा छंद आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झालेल्या कविता स्पर्धेत त्यांना बक्षिस मिळाले होते. त्या उत्कृष्ट भरतकाम, क्रोशाच्या गोष्टी करतात. हल्लीच त्या मोत्याचे दागिने बनवायला शिकल्या. त्यांचे शीळवादन तर सतत चालू असते.

उषाताईंनी कॅालेज मध्ये असतांना बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कॅालेजची प्रतिनिधी म्हणून खेळून तिन्ही प्रकारात बक्षिसं मिळवली होती. “रायगडाला जेव्हा जाग येते” या नाटकातील संभाजीचा प्रवेश त्या करायच्या आणि त्यात त्यांना बक्षीस मिळाले होते.
अशा हरहुन्नरी उषाताईंना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

— लेखन : चित्रा मेहेंदळे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
उषा,
अगदी हरहुन्नरी आहेस तू. अनेक गोष्टी शिकलीस, त्या सर्वांचा सराव ठेवलास, आणि मिळेल तिथे एकेक सादर करित गेलीस. कला हाती घेतलीस. तुझ्यासारखी हुषार मैत्रीणचा अभिमान आहे. खूप खूप शुभेच्छा! अशीच करित रहा आनंद उधळीत रहा….
अलका /वंदना