‘डॅा.आसावरी भट‘
आम्हा मैत्रिणींना कुठल्याही शंका असल्या, सल्ला हवा असला, मदत हवी असली तर कोणाला विचारावे असा प्रश्न आम्हाला कधी पडत नाही. कारण आम्हाला माहित असते, कोणाला विचारायचे ते !
ती व्यक्ती म्हणजे .. डॅा. आसावरी भट..
त्या एम बी बी एस झालेल्या मेडिकल डॅाक्टर आहेत.. आणि संस्कृत घेऊन पी एचडी केलेल्या भाषेतल्या डॅाक्टर आहेत. आम्ही त्यांना आसावरी ताई म्हणतो.
डॉक्टर व्हायचं किंवा उत्तम शिक्षक व्हायचं अशी दोन स्वप्न उराशी बाळगून असणार्या आसावरी ताईंची दोन्ही स्वप्नं पुरी झाली. या बाबत त्या स्वत:ला भाग्यवान समजतात. लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज मधून 1971 साली त्या एम्. बी. बी. एस्. झाल्या. त्यानंतर लग्न झाले. ठाणे येथे काही काळ त्या मेडिकल प्रॅक्टिस करत होत्या. त्यानंतर त्यांच्या यजमानांना परदेशी जाण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांच्याबरोबर गेल्या. परत आल्यावर डिरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विस मध्ये रीसर्च ऑफिसर म्हणून काम करीत होत्या. Technical evaluation of medical termination of pregnancy या project वर काम करत असताना गर्भपातासंबंधीच्या कायद्यात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेत मेडिकल ऑफिसर म्हणून नोकरी घेतली. तेथील दवाखाने, रुग्णालये, प्रसूतिगृहे येथे काम केले. त्यावेळी रुग्णालयाची स्वच्छता तसेच व्यवस्थापन याबद्दलचे महापौर पारितोषिकही त्यांना मिळाले.

हॅास्पिटलमधला अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यातले अनेक किस्से त्या वेळोवेळी दाखला म्हणून सांगत असतात. पेशंटशी, त्यांच्या नातेवाईकाशी अतिशय प्रेमानी वागणार, समजावून सांगणार, त्यांना आपल्या नोकरीत न बसणारीही मदत सतत करणार.. असा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्या हॅास्पिटलमध्ये अतिशय लोकप्रिय होत्या.
आसावरी ताईना संस्कृत भाषेची मनापासून आवड होती. वयाच्या पन्नाशीनंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात संस्कृत भाषा शिकण्यासाठी प्रवेश घेतला. प्रथम डिप्लोमा, नंतर वेदांत हा विषय घेऊन एम्. ए. ची परीक्षा त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर ‘Bharatamuni”s Naatyashaastra in the light of symbolism’ ह्या विषयावर त्यांनी पी. एच् डी. पदवी प्राप्त करून त्या मुंबई विद्यापीठाच्या विद्यावाचस्पती झाल्या. डॉ. गौरी माहुलीकर त्यांच्या गाईड होत्या. अनेक कार्यशाळा आणि परिसंवादामध्ये त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. त्यातील काही मान्यताप्राप्त जर्नल्समधून प्रकाशितही झाले आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये त्या दहा वर्षे अभ्यागत प्राध्यापक होत्या. दोन वर्षे परीक्षक म्हणूनही काम केले आहे. अजूनही त्यांचे निरनिराळ्या विषयांवर अध्यापन चालू आहे. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्याची प्रचीती आजही येते.

आसावरी ताई काही काळ मायथॉलॉजीचाही अभ्यास करत होत्या. त्यांना कन्नड भाषेचेही प्रेम आहे. त्याचाही अभ्यास करून त्यांनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पदविका मिळवली. त्याबद्दल ‘उदयवाणी’ या कन्नड वर्तमानपत्रातून त्यांचे कौतुक केले गेले होते.
आसावरी ताईना अनेक विषयात रुचि आहे. आता वयाच्या पंच्याहत्तरीत समर्थ रामदासांच्या साहित्याचा अभ्यास करून समर्थ विद्यापीठाच्या ‘प्राज्ञ’ पर्यंतच्या सर्व परीक्षा त्या विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. समर्थ साहित्यावर त्या रसाळ व अभ्यासपूर्ण अशी निरूपणेही करतात.अतिशय स्पष्ट पण शांत आवाजात,मध्येच खुसखुशीत विनोद करत, अतिशय ओघवत्या वाणीत त्या बोलतात. कॅालेजमधली मुलंच काय, कुठल्याही वयाचे श्रोते, त्याचे भाषण, निरूपण, रसग्रहण …कुठल्याही विषयावर त्या बोलत असल्या की मंत्रमुग्ध होऊन ऐकत असतात.सतत वाचन करणे, अभ्यास करणे हे त्यांचे प्रवासात, जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी चालू असते.
सामाजिक कार्याचीही त्यांना आवड आहे. समर्थ रामदास एज्युकेशन सोसायटीच्या रात्रशाळेच्या त्या विश्वस्त आहेत. साथसंगत सारख्या महिला मंडळात त्या सक्रिय आहेत. सामाजिक भान असलेल्या अनेक संस्थांशी त्या निगडित आहेत. त्या उत्तम कलाकार आहेत.आपल्या हाताने शंभर एक गोधड्या व दुपटी शिवून त्यांनी अनाथ बालकांना दिली आहेत. भरतकाम, विणकाम तर पहात रहावे असे असते.भरपूर साड्या त्यांनी भरल्या आहेत. त्यांच्या कलाकृती खरोखर बघण्यासारख्या आहेत.
लेखनाची त्यांना आवड आहे. अभूतपूर्व या मासिकात ‘शिवाचा संसार’ नावाची एक मालिका त्यांनी वर्षभर लिहिली होती. तसेच जीवनज्योत व इतर काही मासिकातून त्यांनी दिवाळी अंकासाठी लेखनही केले आहे. आपले इतर अनेक छंदही त्या जोपासतात. अभ्यास, लेखन लेक्चर्स, कलाकुसर, हे आहेच पण त्या सुगरण आहेत, आदरातिथ्य करावे तर ते त्यांनीच! कुठेही नविन ठिकाणी जायचे असले, प्रवास, ट्रिप असो, मदतीला जायचे असले तर त्याची तयारी असते. वयाला मर्यादा नाही हे त्यांच्याकडे पाहून खरे वाटते. ते असतात फक्त आकडे ! तब्येतीची पथ्य सांभाळून, एक जेष्ठ महिला इतके सर्व कसे करते, ह्याचे मला नेहमीच कौतुक वाटते. अतिशय प्रेरणादायी आणि आदरणीय असलेल्या आसावरी ताईं म्हणून अनेक क्षेत्रात भरारी घेणाऱ्या श्रेष्ठ महिला आहेत. त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

— लेखन : चित्रा मेहेंदळे. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
तुमच्या आसावरी ताई त्या आमच्या भट मॅडम. अतिशय प्रेमळ, तळमळीने संस्कृत शिकवणाऱ्या, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणाऱ्या… विद्यार्थी प्रिय शिक्षिका. त्यांनी आम्हाला नुसती संस्कृतची गोडी लावली नाही तर आमच एम ए होईपर्यंत आमच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
चित्रा मेहेंदळे ह्यांनी लिहिलेला डॉ आसावरी भट ह्याच्या परिचयात्मक लेख खूप छान आहे. चित्रा मेहेंदळेंचे सर्व लेख सखोल अभ्यासंती लिहिलेले असतात त्यामुळे ते सुंदर होतात. डॉ आसावरी भट ह्यांचे विशेष कौतुक वाटले हा लेख वाचून.