“सौ. रश्मी बर्वे”
इकडे भारतातून कीर्तन विस्मरणात चालले आहे, तर तिकडे अमेरिकेत आपल्या रश्मीताईनी कीर्तनांचा प्रसार करण्याचा विडा उचलला आहे, ही किती कौतुकाची गोष्ट आहे ना ?
सौ. रश्मी बर्वे (माहेरच्या- फडके) ह्या मूळच्या मुंबईतील पार्ल्यातील आहेत पण गेली २४ वर्षे अमेरिकेत, कॅलिफोर्निया मध्ये राहत आहेत. त्यांचे शिक्षण पार्ले टिळक विद्यालय व डहाणूकर कॉलेज येथून झाले. भारतात त्यांनी काही वर्षे हॉटेल व औषध कंपनीमध्ये काम केले. पुढे श्री नितीन बर्वे ह्यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या कॅलिफोर्निया मध्ये गेल्या.
रश्मी यांनी कॅलिफोर्निया मध्ये प्रथम “बाल शिक्षण” ह्या विषयात पदवी मिळवून काही वर्षे एका शाळेत शिक्षिकेचे काम केले. त्यांना खरी आवड संगीत, कला, वाङ्मय, अध्यात्म यांची असल्यामुळे, ह्या सर्व विषयांचा अभ्यास त्यांनी सुरु केला. पण अचानक काही विलक्षण योगायोगाने त्यांना पारंपारिक नारदीय कीर्तन करण्याची प्रेरणा झाली. त्यांची आजी श्रीमती सत्यभामा फडके (गिरगाव) ह्या राष्ट्रीय कीर्तनकार असल्यामुळे, सौ. रश्मीला लहानपणापासूनच कीर्तनाबद्दल खूप जिज्ञासा व आवड होती. त्यानंतर त्यांना असे जाणवले की कीर्तन ही आपली इतकी समृद्ध परंपरा, आता हळू हळू लोप पावत आहे. शहरांत, तरूण पिढीत कीर्तनाबद्दल खूप उदासिनता आहे. तर अमेरिकेबद्दल तर बोलायलाच नको !

रश्मीताईंनी आपल्या संपन्न अशा परंपरेचा प्रचार व प्रसार पुढील पिढ्यांपर्यंत करण्याकरिता कीर्तन विषयाचा सखोल अभ्यास केला. यासाठी त्यांनी अखिल भारतीय कीर्तन विद्यापीठ येथून कीर्तन विशारद व कीर्तन अलंकार ह्या पदव्या प्राप्त केल्या. त्याकरिता त्यांनी दूरस्थ व मुंबईत समक्ष अशा प्रकारे विविध परीक्षा दिल्या.
कीर्तन हा प्रकार सोपा नाही. वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार !
नारदीय कीर्तन हे बहुरंगी आणि सर्व-समावेशक आहे. विविध चालीची पदे, श्लोक, आर्या, दिंडी, साकी, ओवी, याशिवाय पोवाडा, फटका, कटाव आणि मराठी काव्य प्रकारातील इतर अनेक दुर्मिळ वृत्ते कीर्तनात गायली जातात.
पूर्वी कीर्तन हे प्रसार, प्रचार, लोक प्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमांत अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तन होत असण्याचा प्रघात आहे.
आपल्यापरीने हे चालू ठेवण्यासाठी रश्मीताईंनी “कीर्तन विश्व” ह्या संस्थेतून सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त बुआ आफळे यांजकडून पुढील मार्गदर्शन घेतले व आता गेली १० वर्षे त्यांना त्यांच्यावरील गुरुकृपेने सतत कीर्तन सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या कीर्तनसेवेचा लाभ मुंबई, पुणे, कॅलिफोर्निया, अटलांटा, ऑस्ट्रेलिया येथील श्रोत्यांना झाला आहे.

सौ. रश्मी ह्याना कथ्थक नृत्यात देखील रुची आहे तसेच त्या गेल्या काही वर्षात अर्ध मॅरेथॉन (१३.२ मैल) धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होत असतात. त्यांच्या घरात त्यांचे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ह्यांची उपासना नियमाने चालू असते ज्यात वार्षिक २४-तास अखंड नामस्मरण उत्सव, भजन, दैनंदिन ग्रंथ वाचन, चिंतन अश्या विविध व नाविन्यपूर्ण प्रकारच्या साधना अंतर्गत आहेत.
सौ. रश्मी व श्री. नितीन भारतातून अमेरिकेत आलेल्या संत/संगीत कलाकार/अभ्यासक मंडळींना घरी आवर्जून आमंत्रित करत आले आहेत, ज्यात ह. भ. प. श्री चारुदत्तबुआ आफळे, समर्थ भक्त श्री मकरंद बुवा सुमंत ह्यासारख्या सुप्रसिद्ध व ज्ञानी सत्पुरुषांच समावेश आहे.
सौ. रश्मी ह्यांचे पती श्री नितीन ह्यांनी मद्रास आय आय टी तून बी टेक तर मुंबई आय आय टी तून एम टेक पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांच्या क्षेत्रात ते कार्यरत आहेतच, पण आपल्या वैदिक संस्कृती व परंपरेबद्दल खूप आदर आणि अभिमान असल्यामुळे त्यांनी २०२३ मध्ये पौरोहित्य चा अभ्यासक्रम पूर्ण केला असून ते आता तेथील भारतीय समाजाला विविध प्रकारच्या पूजा, विधी, उपक्रम करण्यात मार्गदर्शन करीत असतात. त्यांनी सौ. रश्मी बरोबर “भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज”, पुणे ह्या संस्थेची अमेरिकेतील सर्व जबाबदारी स्वीकारली आहे.

सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात सर्वाना व खासकरून आधुनिक युगातील समाजाच्या मनशांती करता आपल्या प्राचीन व सखोल ज्ञान परंपरेचा लाभ करून देण्या करीत सौ. रश्मी व त्यांचे पती श्री नितीन बर्वे ह्यांनी अमेरिकी ऍरिझोना मध्ये “भीष्म सनातन वैदिक हिंदू युनिव्हर्सिटी” ही ना नफा तटावरील संस्था स्थापन केली आहे. या संस्थेद्वारे ते आता जगातील विद्यार्थ्यांना आपली वैदिक परंपरा, त्यातील सखोल ज्ञान, संस्कार, संस्कृती ह्याबद्दल पदवी व पदव्यूत्तर
अभ्यासक्रम सुरु करीत आहेत. संपूर्ण मानव जात सध्या तणावपूर्ण आणि संतुलित जीवन कसे जगावे ह्या संभ्रमात असताना आपली प्राचीन ज्ञान संपत्ती व परंपरा ह्या सर्व समस्येवर मार्गदर्शन करील असा त्यांचा दृढ विश्वास आहे.
सौ. रश्मी व श्री नितीन ह्यांचा मुलगा चि. ऋग्वेद बर्वे (वय वर्षे १८) हा सांता क्लारा विद्यापीठात जीवशास्त्र ह्या विषयातील पदवी अभ्यास करत असतांनाच, भारतीय शास्त्रीय व सुगम संगीत, तबला शिकत आहे. तो उत्तम पेटी देखील वाजवतो. गेली काही वर्षे तो त्याच्या आईला आणि त्याच्या सहकलाकारांना कीर्तन, भजन, शास्त्रीय संगीत ह्यात तबला किंवा पेटी वर साथ करतो.
अमेरिकेत तरूण पिढी येते आणि नकळत इथली संस्कृती अंगीकारते. पण बर्वे कुटूंब इथे येतांना भारतीय संस्कारांची शिदोरी बरोबर घेऊन आले आहेत आणि त्या संस्कारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झटत आहेत.
रश्मी ताईंना अध्यात्मा चे अगाध, विशाल आकाश खुणावत होते म्हणूनच त्याही त्यात रमल्या आणि त्यांच्या सोबत अमेरिकाही किर्तनात रंगत असते. त्यांना पुढील उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा.

— लेखन : चित्रा मेहेंदळे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800