Wednesday, April 23, 2025
Homeयशकथाजिचे तिचे आकाश…: ६

जिचे तिचे आकाश…: ६

प्रतिक्षा तोंडवळकर

लेखिका चित्रा मेहेंदळे यांच्या वहिनी स्टेट बँक ऑफ इंडियात कामाला होत्या. त्यांनीच चित्राताईना आपल्या आजच्या यश कथा नायिका प्रतिक्षा तोंडवळकर यांच्या विषयी कौतुकाने सांगितले. यामुळेच, प्रतिक्षाताई विषयी लिहिते करण्यास चित्राताईना प्रेरणा मिळाली.
प्रतिक्षाताईचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.
— संपादक

बालपणी पुण्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य! मुलीचे लग्न हेच संसारातले एकमेव व अंतीम कर्तव्य समजणारे, अशिक्षित आई वडिल ! …… मुलगी सातवीत असतांनाच, तिला शाळेतून काढून, १९८२ साली तिचे लग्न लावून देतात. सासरही तसेच फक्त नवरा बुक बाईंडिंगचे काम करत होता. … आंथरूण पाहून पाय पसरावे अशा शिकवणीत रहाणारी तिचीही पिढी .. पण आंथरूणच नसलेली ही मुलगी, पाय तरी कसे पसरणार, स्वप्न तरी कसली आणि कशी पहाणार ? ..

हीच मुलगी काही वर्षांनी बॅंकेत असिस्टंट जनरल मॅनेजर बनेल, असे तिचे भविष्य तेव्हा कोणी सांगितले असते तर त्याला सर्वांनी वेड्यातच काढले असते..
प्रत्यक्षात एखाद्या सिनेमात घडावी अशी ही गोष्ट ”प्रतिक्षा तोंडवळकर” ह्यांच्या आयुष्यात घडली आहे आणि त्याचे सारे श्रेय त्यांच्या जिद्दीला आहे !

काय काय सहन केलं प्रतिक्षा ताईंनी ?

१७ व्या वर्षी मुंबईच्या सदाशीव कडू ह्यांच्याशी लग्न झालं आणि अचानक १९ व्या वर्षी वैधव्यही आलं! नवऱ्यानी विहीरीत उडी मारली, ती पंपावर पडून जागीच त्याचा मृत्यू झाला.
पदरी १ वर्षाचा मुलगा, सासऱच्यांनी घराबाहेर काढलेले, माहेरच्यानी “तू आणि तुझं नशिब” म्हणत आसरा नाकारलेला!शिक्षण फक्त सातवी पर्यंत !… पण मिळेल ते, जमेल ते, काम करत, त्या मुलाला घेऊन, चाळीतल्या सासरच्या घरासमोरील व्हरांड्यात कशाबशा रहात होत्या.
देवानी एक दार बंद केलं तरी दुसरी दोन दारं तो उघडतो ह्यावर प्रतिक्षा ताईंचा गाढ विश्वास आहे आणि तो खराही ठरला आहे … त्यांच्याबाबतीत !

काही दिवसातच स्टेंट बॅंकेतून त्यांना पत्र आलं. नवऱ्यानी तिथे बुक बाईंडिंगचे काम केले होते, त्याचे १०० रूपये, सही करून घेऊन जा म्हणून… प्रतिक्षा ताई मुलाला घेऊन तिथे गेल्या, तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी मुलासाठी काही खाऊ, पैसे दिले. त्यावेळी प्रतिक्षाताईंनी न लाजता, न घाबरतां वरिष्ठांना सांगितले, “ह्या मदतीबद्दल धन्यवाद ! पण मला एखादे काही काम मिळू शकले तर मला त्याची फार गरज आहे “
आता सातवी पास झालेल्या स्त्रिला बॅंकेत काय काम मिळणार ? तिथे सफाई कामगार म्हणून काही महिन्यांनी त्यांना नोकरी मिळाली .ही संधी त्यांनी फुकट नाही घालवली . अक्षरशः ह्या संधीचे त्यांनी सोने केले.
त्याच बॅकेत त्यांनी सफाई कामगार ते असिस्टंट जनरल मॅनेजर हा खडतर प्रवास यशस्वी करून दाखवला जो अनेकांना प्रेरणादायी ठरू शकतो.

प्रतिक्षा ताई मुळातच हुषार होत्या. वाचनाचीही त्यांना प्रचंड आवड होती. त्यांचे सातवीतून नांव काढायच्या वेळी प्रथमच त्यांचे वडिल त्यांच्या शाळेत गेले होते. तेव्हा तिथल्या शिक्षिका पंडीत मॅडम त्यांना म्हणाल्या होत्या.. “तुमची मुलगी खूप हुषार आहे . तिचे लवकर लग्न करून, शाळेतून नांव काढून तिचे खूप नुकसान होईल. नका काढू शाळेतून नांव.
मी शिकवीन तिला. राहिल माझ्याकडे. ती शिकून नक्की डॅाक्टर होईल.“ पण वडिलांनी ऐकले नाही . नांव काढले, लग्न लावले. बॅंकेत सकाळी २ तासाची नोकरी (पगार महिना ६५ रूपये) .. पण म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार .. तसे होते ते! दिवस भर त्या इतर ठिकाणी काम करायच्या. कधी १५ रूपये रोज असे फॅक्टरीत , कधी काही विकत रस्त्यावर, कधी शिवण काम .. जेमतेम १ पोळी पोटाला मिळायची . ती त्या आणि मुलगा अर्धी अर्धी खायच्या.
प्रतिक्षा ताई मिळेल तो पेपर वाचायच्या. एकदा वडापावच्या पेपरात जाहिरात दिसली … “७ वी नंतर एकदम बाहेरून १० वीची परिक्षा द्या”…

बॅंकेत साफसफाई करतांना त्या समजून चुकल्या होत्या कि “आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडायचे असले तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.” तिथे टेबल पुसतांना प्रथमच त्यांच्या मनांत एक विचार यायला लागला , “मी शिकले तर कधी तरी ह्या खुर्चीवर बसेन”. “त्यातच त्यांना हा ….१० वी करता येईल …हा आशेचा किरण दिसला आणि त्या झपाटल्या . बॅंकेतल्या कर्मचाऱ्यांना विचारून त्यांनी फॅार्म भरला. जमतील तिथून ८/९/१० या तीन इयत्तांची पुस्तकं जमवली. काहींनी त्यांच्या मुलांची जुनी पुस्तकं, वह्या कात्रणं, प्रश्नपत्रिका, इत्यादी दिले. रद्दीतून गाईड्स मिळाली .. आणि प्रतिक्षा ताई एक मिनीट ही फुकट न घालवता, अभ्यास करायला लागल्या. स्वतः चा स्वतः अभ्यास करायचा. धडेच्या धडे त्या पाठ करायच्या. पाच पाच वेळा लिहून काढायच्या. गणिते १०/१० वेळा सोडवायच्या. आपणच विषय अशा रितीने आत्मसात करायच्या आणि शिकायच्या . एकीकडे त्यांनी पै पै जमवून मुलालाही शाळेत प्रवेश घेतला . तोही त्यांच्या तालमीत शिकायचा. काही दिवसांनी त्यांच्या सासरच्यांनी नाईलाजांनी त्यांना घरात घेतलं. पण त्यांचे कष्ट, त्रास चालूच होते. दिवसभरात त्यांना अभ्यासाला कमी वेळ मिळायचा आणि रात्री सासू दिवा लावून द्यायची नाही. मग त्त्या छोट्या बाटलीत रॅाकेल घालून, वात घालून, मिणमिणत्या ज्योतीत अभ्यास करायच्या. अशी तयारी झाल्यावर त्या पहिल्या फटक्यात चांगले ६०% गुण मिळवून १० वी पास झाल्या. त्यामुळे बॅंकेने त्यांना सफाई कामगाराहून वरची नोकरी, म्हणजे मेसेंजर (शिपाई) ची पूर्ण वेळाची नोकरी दिली. त्यांचा पगारही वाढला. प्रतिक्षा ताईंच्या चिकाटीचे सर्वांनी कौतुक केले. त्याही सर्वांशीच प्रेमाने, चांगल्या वागायच्या. आपले काम अतिशय निटनेटके करायच्या. कोणाच्या आध्यात मध्यात नसायच्या.

आता प्रतीक्षाताईना पुढे शिकण्याचे वेध लागले. त्यांनी रात्र शाळेत प्रवेश घेतला. संध्याकाळी ४-५ किलोमीटर चालत जा ये करायच्या. अंतर कमी पडते म्हणून त्या स्मशानातून गेलेला रस्ता वापरायच्या. कधी सुरक्षित वाटायचे नाही. पण प्रतिक्षा ताई डगमगणाऱ्या नव्हत्या. आहे त्या परिस्थितीत आपला मार्ग आपणच शोधायचा हे त्या पक्क जाणून होत्या. त्यासाठी शाळेत जायच्या आधी त्यांनी कराटे आणि ज्यूडो चा क्लास केला आणि एकटीने रहाण्यासाठी स्वतः ला सक्षम केले. अथक परिश्रम करून त्या १२ वी पास झाल्या.

आता बॅंकेतल्या सहकारी वर्गाला प्रतीक्षा ताईंच्या शिक्षणाची तळमळ जाणवायला लागली. सर्वच त्यांना सहकार्य करत होते ही किती सकारात्मक गोष्ट होती! स्टेट बॅकेचे पण त्याबद्दल कौतुक करायला हवे.
प्रतिक्षा ताईंना क्लार्क म्हणून नोकरी करायची तर पदवीधर असणे गरजेचे होते. त्यासाठी अभ्यास सुरू करायला त्यांची एका पायावर तयारी होती. त्यांनी सांताक्रूजच्या एस्. एन्. डी. टी. कॅालेजात प्रवेश घेतला. शनिवार रविवार वर्गातला अभ्यास, इतर वेळी वेळ मिळेल तिथे आणि तेव्हा अभ्यास.!…… बॅंक, मुलगा आणि अभ्यास इतकेच त्यांचे विश्व होते. थोडे पैसे हातात आले तरी इतर कसलीही करमणूक करायचा विचार तेव्हा त्यांनी केला नाही. अर्थात त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. त्या मानसशास्त्र हा विषय घेऊन बी.ए. झाल्या.
त्या आधी त्यांच्या आयुष्यात एक खूप चांगली घटना घडली. त्यांच्या बॅंकेतच, त्यांच्यासारखे मेसेंजर म्हणून काम करणारे
प्रमोद तोंडवळकर ह्यांनी त्यांच्याशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली. प्रतिक्षा ताईंची एकटीची जी वाटचाल चालू होती त्यात त्यांना साथीदार मिळणार होता. पण प्रतिक्षा ताईंनी लग्न पदवी परिक्षा झाल्यावरच करीन अशी अट घातली. त्यांना परत शिक्षण अर्धवट सोडायचं नव्हतं. शिवाय त्यांचा मुलगा विनायक हा कायम त्यांच्याबरोबरच राहिलं हेही स्पष्ट केलं आणि प्रमोद ह्यांच्याकडून ही वचन घेतलं कि ते ही पुढे पदवी पर्यंत शिक्षण घेऊन बॅंकेत मेसेंजरच न रहाता क्लार्क बनतील आणि तसे ते ही नंतर शिकले आणि प्रतिक्षा ताईही पदवी घेऊन एक पाऊल पुढे गेल्या.

लग्नानंतर त्यांना पतीची साथ शेवटपर्यंत मिळाली. त्यांनी बॅंकेतल्या सर्व परिक्षा हळू हळू द्यायला सुरूवात केली. त्याकाळात त्यांना एक मुलगी आणि मुलगा झाला. त्यांच्या पतीने मुलं आणि घर यांचा एखाद्या आईसारखा सांभाळ केला आणि प्रतिक्षा ताईंनी फक्त बॅंकेतल्या परिक्षा आणि अभ्यास यावर लक्ष केंद्रीत करावे यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांना प्रतिक्षाताईंची शिक्षणाची तळमळ पाहून त्या एक दिवस सहाय्यक महाव्यवथापक (ए.जी.एम.) बनतील असा पूर्ण विश्वास होता आणि त्यांच्या या इच्छे पोटीच प्रतिक्षा ताई पुढच्या परिक्षा देत राहिल्या, प्राविण्या सकट यशस्वी होत राहिल्या. त्यांचा हा प्रवास ३७ वर्षे चालू होता.

सफाई कामगार, मेसेंजर, क्लार्क, ट्रेनी ॲाफिसर, डेप्युटी मॅनेजर, चीफ मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर असा त्यांचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. त्यांची जिद्द, चिकाटी, मेहनत करायची तयारी, हुषारी आणि स्टेंट बॅकेंनी त्याना दिलेली संधी आणि मदत हे सर्वच प्रेरणादायी आहे. त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे.
त्या इथेच थांबल्या नाहीत. सातवीतल्या पंडीत बाई म्हणाल्या होत्या या मुलीला मी डॅाक्टर करीन, त्यांच्या इच्छेमुळे प्रतिक्षाताईंचीही मनांत ती इच्छा राहिली होती. वयाच्या ५७ व्या वर्षी ती त्यांनी पूरी केली. २ वर्षाचा नेचरोपथीचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या नेचरोपथीच्या डॅाक्टर झाल्या.

त्यांच्या या यशाचे सगळे श्रेय त्या ७ वी च्या शिक्षिका पंडीत, बॅंकेतली परिक्षेच्यावेळी नोट्स पुरवणारी मैत्रिण दिपा कुलकर्णी, शेवटच्या परिक्षेच्यावेळी त्यांना रोज ॲाफिस संपल्यावर मार्गदर्शन करणाऱ्या वरिष्ठ अधिकारी पानसे मॅडम, त्यांचे पती प्रमोद तोंडवळकर आणि अर्थातच योग्य संधी, मनोबल देणारा देव ह्यांना देतात.
शेवटचे ए. जी.एम् चे पद मिळाले तेव्हा त्यांनी कुटुंबाला कुलाब्याच्या ताज हॅाटेलात नेऊन तो अविस्मरणीय क्षण साजरा केला. त्यांच्या पतींचे त्याआधी ३ वर्षे, निधन झाल्यामुळे ते फक्त त्याक्षणी प्रतिक्षाताईंबरोबर नव्हते ह्यांचे एक दुःख त्यांच्या मनांत आहे. पण त्यांचे माता पिता, भाऊ, बहिण, मुलं सर्वांचा त्यांना आता पाठिंबा, जवळीक आहे.
एक मोठा बदल त्यांना सुखावतो आहे तो म्हणजे त्यांच्या पेक्षा लहान असलेल्या बहिणीला आई वडिलांनी शाळा सोडून लग्न लावून द्यायची चूक केली नाही. उलट शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. ती एम्.बी.बी.एस्. होऊन डॅाक्टर झाली.
त्यांचा मोठा मुलगा विनायक इंजिनीयर होऊन, आय आय टी पवई मधून पदव्युत्तर शिक्षण घेऊन एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे. मुलगी दिक्षा आणि छोटा मुलगा आर्य ही आपापले क्षेत्र निवडून शिकत आहेत.

प्रतिक्षाताईंनी नोकरीत उच्च पद मिळवूनही आपले वर्तन बदलले नाही. सर्वांशी त्यांनी प्रेमानी संबंध जोडले आहेत, बॅंकेत येणाऱ्या प्रत्येकाला मदत करून, आपुलकीने त्या वागतात म्हणूनच त्या अतिशय लोकप्रिय आहेत. उगाच नाही त्यांना “बॅंक क्विन” म्हणून ओळखत! त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

— लेखन : चित्रा मेहेंदळे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता