चित्रकार सौ.माधवी रामराजे पाटील यांनी त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पन्नास चित्रांचे प्रदर्शन नुकतेच पुणे येथे आयोजित केले होते.
या निमित्ताने जाणून घेऊ या, त्यांची चित्र सफर….
चित्रकार सौ.माधवी रामराजे पाटील यांना लहानपणापासूनच चित्रकलेचा छंद ! अन् आजही त्यांनी तो छंद केवळ जोपासला नाही तर, वाढविलाही आहे.
माधजींचे तिचे वडील श्री.गुलजारसिंग राजपूत हे नंदुरबार येथील महाविद्यालयात वाणिज्य विभाग प्रमुख होते. तिथेच माधवीजीं चोपटे मॅडमकडे चित्रकलेचं दोन वर्षे शिक्षण घेतलं. त्यानंतर जी टी पी कॉलेजमध्ये बी.ए.(अर्थशास्त्र) पूर्ण केलं. परंतु एम.ए.(अर्थशास्त्र) करताना दरम्यानच्या काळात आईला ब्लड कॅन्सरची बाधा होऊन आई ऐन उमेदीच्या काळात मृत्यू पावली. परिणामी माधवीवर तीन भावांची जबाबदारी आली. तथापि त्या डगमगल्या नाहीत. कारण आधीच आईने त्यांना धीट बनवलं होतं. त्यामुळे प्रत्येक आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरं जावून आपले चित्रकलेतील लक्ष्य त्या गाठू शकल्या.
पण अशा ताणतणावाच्या वातावरणात त्यांना एम.ए. पूर्ण करता आलं नाही. तसेच चित्रकलेकडेही थोडं दुर्लक्ष झालं.
पुढे १९९६ मध्ये लग्न झाल्यावर त्यांच्या मिस्टरांची पोस्टिंग बेंगलोर येथे झाली. तेथे गुरुवर्य एच.कौशिक यांच्याकडे इंडियन आर्ट व तंजावर पेंटिंगचे त्यांनी ६ वर्षे प्रशिक्षण घेतलं.
कालांतराने २००८ मध्ये बेंगलोरहून पुणे येथे स्थलांतरित झाल्यावर एसएनडीटी कॉलेज मध्ये एम.ए.पूर्ण केलं. त्यानंतर २०१९ साली एमआयटी लोणी काळभोर येथे मास्टर ऑफ फाईन आर्ट पूर्ण केलं.
माधवीजींनी अशाप्रकारे संघर्षाचा एक एक टप्पा पार करून चित्रकलेत प्राविण्य प्राप्त केलं. आज पन्नाशी गाठूनही त्या वेळात वेळ काढून पेंटिंगमध्ये व्यस्त रहातात, याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या अथक परिश्रमाची परिणिती म्हणजे पुणे येथील ख्यातनाम कलादालन बालगंधर्व रंगमंदीर येथे त्यांनी रेखाटलेल्या पेंटिंग्जचे प्रदर्शन भरवण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्या अप्रतिम प्रदर्शनास विविध क्षेत्रातील शेकडो मान्यवरांनी भेटी देऊन त्यांचे व त्यांच्या पेंटिंगचे तोंड भरून कौतुक केलं. खरं तर, हीच त्यांच्या परिश्रमाची खरी पावती आहे.
अनेक चित्र प्रेमींनी त्यांना पेंटिंगच्या किमती विचारल्या. परंतु त्यांनी विकण्यास साफ नकार दिला. त्यांच्या मते कला लोकांना दाखवायची असते, पण विकायची नसते. कारण तिचं मूल्य सांगणं अतिशय अवघड आहे. व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता, माधवीजींनी आपली पेंटिंग्ज संग्रहित करण्यास प्राधान्य दिलं. यावरून त्यांचे चित्रकलेवरील अपार प्रेम प्रतिबिंबित होते. हीच सच्या चित्रकाराची ओळख आहे.
माधवीजींना पुढील वाटचालीसाठी न्यूज स्टोरी टुडे पोर्टलकडून मन:पूर्वक शुभेच्छा !
– देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
माधवीताईंचे मनापासून अभिनंदन तसेच त्यांना पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जिद्द असली की वय कधीच आडवे येत नाही आणि वाटेतले अडसरही सहज नाहीसे करता येतात हे वर्षाताईंनी सिद्ध केले आहे.
🌹 पन्नासावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
माननीय श्री.भुजबळ साहेब,
खूप छान उपक्रमातून आपण माहिती देत असतात
त्याबद्दल धन्यवाद 🌹🌹
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ