Saturday, April 13, 2024
Homeयशकथाजिद्दी भाग्यश्री बानायत

जिद्दी भाग्यश्री बानायत

सध्या नाशिक महानगरपालिकेमध्ये अपर आयुक्त म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीमती भाग्यश्री बानायत यांची माझी पहिली भेट 22 वर्षांपूर्वी म्हणजे 10 ऑगस्ट 2002 रोजी अमरावती येथे माझ्या महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगर येथील माझ्या निवासस्थानी झाली.

झाले असे की आम्ही 12 मे 2000 रोजी विदर्भातील मुले बहुसंख्येने प्रशासनात जावी म्हणून महाराष्ट्राचे सध्याचे प्रधान सचिव व तेव्हाचे यवतमाळ जिल्हाधिकारी श्री विकास खारगे यांच्या हस्ते अमरावतीला डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीची स्थापना केली. त्यानंतर 10 ऑगस्ट 2002 रोजी आम्ही सध्याचे औरंगाबादचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी व बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री सदानंद कोचे यांच्या हस्ते अमरावतीला स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व अभ्यासिकेची सुरुवात केली. पहिल्याच दिवशी पहिलीच विद्यार्थिनी म्हणजे भाग्यश्री बानायात. भाग्यश्री मला म्हणाली सर मी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे राहत आहे. सध्या मी महाविद्यालयात शिकत आहे. माझी आई आजारी असते. मी नियमितपणे ग्रंथालयात व अभ्यासिकेत येऊ शकणार नाही. तुम्ही मला घरी पुस्तके देणार का ? भाग्यश्रीची ही माझी पहिली भेट व पहिला सुसंवाद.

आज जेव्हा मी मागे वळून पाहतो आणि भाग्यश्रीची यशोगाथा नजरे खालून घालतो तेव्हा भाग्यश्रीने जे यश संपादन केलेले आहे ते निश्चितच तरुण पिढीला मार्गदर्शन ठरेल असेच आहे. स्वतः सुप्रसिद्ध सनदी अधिकारी असताना देखील भाग्यश्री मॅडम तुम्हाला जेव्हा भेटतील तेव्हा तुम्हाला एक मैत्रीण भेटल्याचा आनंद होईल. त्यांचे राहणे बोलणे, प्रेमाने सुसंवाद साधणे, आणि चेहऱ्यावर कायम असणारे हास्य हे तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहील.

खरं म्हणजे 2000 हा काळ अमरावती विभागात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल नव्हता. अमरावतीत तर स्पर्धा परीक्षेचे वातावरणही नव्हते. भाग्यश्री तेव्हा अमरावतीच्या विद्याभारती महाविद्यालयामध्ये शिकत होती. आमच्या घराजवळच असलेल्या अप्रतिम कॉलनीमध्ये ती राहत होती. वडील अध्यापक तर आई मुख्याध्यापिका. पण आई सतत आजारी असायची. वडिलांनी एक काम केले. भाग्यश्रीला स्पर्धा परीक्षेची तोंड ओळख करून दिली आणि तिला शाळेत असताना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा उपक्रमांमध्ये भाग घेण्यास सांगितले. त्याचबरोबर शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामध्ये तिला सहभागी होण्यास सांगितले. एक दिवस तिच्या वडिलांचे एक विद्यार्थी जे तेव्हा ठाणेदार झाले होते, ते तिच्या वडिलांना भेटायला आले आणि त्यांनी तिच्या वडिलांना जोरदार सँल्यूट मारला. आणि ते ठाणेदार म्हणाले सर मी तुमच्यामुळे घडलो. भाग्यश्रीला हा प्रसंग प्रेरणादायी वाटला. या प्रसंगातून तिचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू झाला.

मोर्शी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी राहून अभ्यास करणे म्हणजे अवघडच काम. पुस्तके नाहीत. सभोवतालचे वातावरण स्पर्धा परीक्षेच्या अनुकूल नाही. पण “श्रृंखला पायीच असू दे मी गतीचे गीत गाईन. दुःख झेलण्यास आता आसवांना वेळ नाही” या न्यायाने भाग्यश्री झुंज देत राहिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत राहिली. मध्यंतरी आजारी असलेल्या आईची सेवा करीत राहिली. वडिलांचे आकस्मिक निधन झाले. जवळच्या नातेवाईकांनी हिस्से वाटणी करण्यासाठी आग्रह धरला. घेतला काढून खांदाओळखीच्या माणसांनी अशी परिस्थिती झाली. मदत करण्याऐवजी हिस्सेवाटणी करण्यासाठी नातेवाईक पुढे आले. पण भाग्यश्रीने हार मानली नाही. “कोशिश करने वालो की कभी हार नही होती. पंख होने से कुछ नही होता हौसलो से उडान होती है.” या न्यायाने भाग्यश्री संकटावर मात करीत राहिली.

पहिली नोकरी मिळाली की अमरावतीला विषयतज्ञ म्हणून. अमरावती ते मोर्शी हे अंतर 55 किलोमीटरचे आहे. रोज 110 किलोमीटर येणे आणि जाणे. आजारी आईची सेवा करणे हे व्रत तिने स्वीकारले. पण या व्रताबरोबरच तिने स्पर्धा परीक्षेचा व्यासंग सोडला नाही. राजपत्रित अधिकाऱ्यांची परीक्षा तिने दिली. आणि बघा कुठल्याही प्रकारचे फारसे मार्गदर्शन नसताना परिस्थिती अनुकूल नसताना नोकरी करीत असताना तिने संपूर्ण महाराष्ट्रातून ओबीसी विद्यार्थिनी मधून पहिला क्रमांक प्राप्त केला .”जितने वाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग से करते है.” याचा प्रत्यय तिने आपल्या जिद्दी स्वभावातून आणून दिला. ती राजपत्रित अधिकारी झाल्यानंतर तिच्या सभोवतालचे वातावरण बदलले. स्पर्धा परीक्षेसाठी अनुकूल असे वातावरण होते. ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत नागपूर येथे विक्रीकर कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून रुजू झाली. तिचे सहकारी तिला म्हणायला लागले भाग्यश्री मॅडम तुम्ही जर एमपीएससी परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्या येऊ शकता तर तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस या परीक्षेची तयारी का करीत नाही ? भाग्यश्री तर महत्त्वाकांशी मुलगी. तिला हे पटले आणि तिने नागपूरला सेवेत असताना आयएएसची तयारी सुरू केली. तिच्या मदतीला तिच्याच कार्यालयात सनदी अधिकारी असलेले श्री संजय धिवरे यांनी मोलाची मदत केली. सर्व प्रकारची पुस्तके, सर्व प्रकारच्या नोट्स आणि मुलाखतीसाठी सर्व तयारी त्यांनी तिच्याकडून करून घेतली. सेवेत असल्यामुळे पुण्या मुंबईला दिल्लीला जाणे तिला शक्य नव्हतं . शिवाय आईचे आजारपण. बाबा नसल्यामुळे आईकडे लक्ष देणे देखील गरजेचे होते. भाग्यश्रीच्या परिश्रमाला यश आले आणि भाग्यश्री केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाली. मॉक इंटरव्यू देण्यासाठी दिल्लीला जाणे गरजेचे होते. पण नोकरीमुळे ते शक्य होत नव्हते. पण श्री संजय धिवरे यांनी तिची नागपुरातच मुलाखतीची तयारी करून घेतली. ती आपला जीवनपट आपल्या नजरे खालून घालत होती. तिला यश समोर दिसत होते.

दिल्लीला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भवनामध्ये ती इंटरव्यूला गेली. समोरचे पॅनल कडक होते. कमी मार्क्स देण्यामध्ये त्या पॅनलचा नावलौकिक होता. भाग्यश्रीने कोणताही ताण तणाव न ठेवता प्रामाणिकपणे मुलाखत दिली. तिने सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे तर दिलीच. पण त्यांना प्रति प्रश्नही केले. सहसा मुलाखतीमध्ये प्रतिप्रश्न करण्याची प्रथा नाही. पण भाग्यश्रीने ती मोडीत काढली. मुलाखतीमधील एका सदस्याने तिला विचारले तुम्ही सनदी अधिकारी झाल्यानंतर प्रामुख्याने कोणता प्रश्न हाताळणार आहात ? ती म्हणाली, मी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा प्रश्न हाताळणार आहे. सदस्य म्हणाले. इतरही बरेच प्रश्न आहेत. तुम्ही शेतकऱ्यांकडेच का लक्ष देणार आहात ? भाग्यश्री म्हणाली, सर या जगाचा अन्नदाता शेतकरी आहे. आमच्या विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण फार मोठे आहे आणि म्हणून या अन्नदात्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे मला गरजेचे वाटते.

मुलाखत देऊन जेव्हा भाग्यश्री बाहेर आली. तेव्हा तिला फारशी यशाची अपेक्षा नव्हती. कारण तिने पॅनल मध्ये सदस्यांना प्रतिप्रश्न केले होते. पण तिने मांडलेली भूमिका ही सत्याची न्यायाची व नीतीची होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. आणि भाग्यश्री आय ए एस अधिकारी झाली. तिची निवड आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या नागालँड कॅडर साठी झाली.आणि तिथे रुजू होऊन तिने धडाडीने विविध पदांवर सेवा केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात रेशीम संचालक, शिर्डी संस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आता नाशिक महानगर पालिकेत अप्पर आयुक्त म्हणून सेवा बजावत आहेत.

भाग्यश्री आज सर्व सामाजिक माध्यमावर तिच्या व्याख्यानामुळे तिच्या यशोगाथेमुळे चर्चेत आहे. तिची यशोगाथा ही प्रत्येक मुला मुलींसाठी प्रेरणादायी आहे. आज तर सर्वत्र स्पर्धा परीक्षेचे पेव फुटलेले आहे आणि भाग्यश्री जेव्हा तयारी करीत होती तेव्हा साधी पुस्तके देखील मिळविणे कठीण झाले होते. पण तिने त्यावर मात करून यश संपादन केले. आजही भाग्यश्री सनदी अधिकारी झाली तरी तुम्ही तिला भेटायला गेले तर आपण एका मित्राला भेटत आहोत. आपण मोठ्या बहिणीला भेटत आहोत. असाच भास तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. परवा आम्ही आमची अमरावतीची सुकन्या व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या सृष्टी देशमुख हिचा अमरावतीला भव्य सत्कार केला. भाग्यश्रीलाही बोलावले. भाग्यश्रीचे बाळ तेव्हा लहान होते. तरी पण तिने नकार दिला नाही. ती कार्यक्रमाला आली. तिने केलेले मार्गदर्शन ऐकण्यासाठी सभागृहामध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. मी जेव्हा जेव्हा भाग्यश्री मॅडमला फोन करतो आणि कार्यक्रमाला बोलावतो. तो कार्यक्रम लहान आहे की मोठा आहे. याचा विचार न करता भाग्यश्री मॅडम माझ्या कार्यक्रमाला येतात. मुलांना मार्गदर्शन करतात आणि नवीन पिढीला दिशा देऊन जातात.

आज सर्वत्र जागतिक महिला दिन सप्ताह संपन्न होत आहे. अशा या जागतिक महिला दिनाच्या सप्ताहानिमित्त भाग्यश्री मॅडमला हार्दिक शुभेच्छा व विपरीत परिस्थितीशी झुंज देऊन त्यांनी यश संपादन केले त्यानिमित्त त्यांना मानाचा मुजरा.

प्रा डॉ नरेशचंद्र कठोळे

— लेखन : प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे.
संचालक, मिशन आयएएस. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments