गोड वाहते नदी तरी पण, खारे पाणी करतो सागर
किती जपा मग जीव लावुनी, आयुष्याची झिजते चादर
दिवस उगवला आणि संपला, इतकेच कसे असेल जीवन
अनेक गोष्टी आहेत इथे, तुम्ही शोधता निव्वळ भाकर
दुपार झाली जगता जगता, तरी तुला ना मर्म उमगले
हेही माझे तेही माझे, अता तरी तू मनास आवर
नेता नसतो कधी आपला, झोपे मधुनी जागा हो बघ
कधीतरी तो येतो हसतो, तुला दावतो नुसते गाजर
हरकत नाही तुझ्या हवेल्या, गगन चुंबु दे आणखी जरा
परंतु मित्रा खाली बघ, अन् तुला फुटू दे थोडा पाझर
सांगू आई कमी भासते पदरा पेक्षा आभाळ मला
दिले किती तू कसे घेउ मी, फुटकी तुटकी माझी घागर
काय सांगता मला मित्रहो, प्रेम कसे ते द्यावे घ्यावे
खिशात माझ्या घेउन फिरतो, मी प्रेमाचा अमृत सागर
— रचना : यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800