Wednesday, September 11, 2024
Homeलेख"जीवन म्हणजे काय ?" भाग १०

“जीवन म्हणजे काय ?” भाग १०

जगणे सुंदर आहे

हो अर्थातच… जगणे सुंदर आहेच. मला तरी तसं वाटतं. कारण प्रत्येक माणसाची जन्माला येण्याची वेळ ठरलेली असते तशीच मृत्यूची ही वेळ ठरलेली असते. जन्म आणि मृत्यूमधील हा काळ मनुष्य कसा घालवतो ते मात्र, त्याचं तो ठरवतो. त्याला जगणं सुंदर असावं असं वाटतं असेल तर ते तसं नक्कीच होतं.

“For every ailment under the Sun,
There’s a remedy,
or there’s none
If there is one try
to find it,
If there is none,
never mind it.”

यात सांगितल्याप्रमाणे काही काही गोष्टी माणसाच्या हातात नसतात मग त्यासाठी खंत करत बसण्यापेक्षा, आहे त्यात आनंद मानला तर जगणं सुंदर होईलच.

प्रत्येकाची सुंदर जगण्याची परिभाषा वेगळी असू शकते. काही थोडक्यात समाधान मानून, आहे त्यात सुखी राहून आपलं जीवन सुखी आणि सुंदर जगतात. तर काही, कितीही मिळालं तरी समाधानी नसतात. त्यामुळे त्यांना सुख म्हणजे काय ते कळतच नाही.

एखाद्या गरजूला, न मागता मदतीचा हात पुढे करणं आणि नंतर ते विसरून जाणं या सारखा आनंद, आपण आवडीची खरेदी करण्यातही नाही. ईश्वर प्रदत्त निसर्ग, सौंदर्याने परिपूर्ण असतो. त्यातील सौंदर्य टिपणं, न्याहाळणं, त्याला स्पर्श करणं हे जगण्यातील सौंदर्य वाढवणारं असतं. तरीही प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो मग मात्र तो यात रमत नाही.

सौंदर्य हा दृष्टिकोनाचा विषय आहे आणि आनंद ‌हा मनाचा.
आनंद आणि सौंदर्यची बट्टी झाली की जगण्याचा उत्सव होतो. जीवन हे परमेश्वराचा प्रसाद वाटायला लागते.

सुंदर जगण्याचे अनेक पैलू आहेत. भावनिक सौंदर्य, हे त्यातील एक. ज्या व्यक्तीच्या भावना मृदू, दुसऱ्यांना जाणुन घेण्याच्या, दुसऱ्याच्या सुख – दुःखात सामिल होण्याच्या असतात त्याचं जीवन सुंदर असणारच.

सुंदर जगणं म्हणजे सतत सुखात लोळणं, असं नसतं. प्रत्येक विपरीत परिस्थितीत धैर्याने उभं राहणं, न डगमगता सत्याला सामोरं जाणं, कष्टाचे दिवस नक्कीच जातील हा विश्वास असणं, हेच खरं जगण्यातील सौंदर्य आहे.

“जगी सर्व सुखी असा कोण आहे ?”
या वाक्यात जीवनसार सामावलं आहे.

सकारात्मक विचार, हा सुंदर जीवनाचा एक मंत्र आहे. सुंदर जीवन म्हणजे काय ? तर जे तुम्हाला भरभरून जिवंत ठेवते, प्रेरणेने भरलेले असते, आपल्यासाठी जगण्यास योग्य असे सगळ्यांशी संलग्नतेने जोडलेले सखोल वातावरण तयार करते, ऊर्जेने भरलेले असते. ते जीवन आणि ते जगणं सुंदर.

ज्यूलियस चार्ल्स हेअर सांगतात, “तुम्हीं जे आहात ते व्हा. आपण आहोत त्यापेक्षा चांगलं बनण्याच्या दिशेने ही पहिली पायरी आहे.” हे ही खरंय.

सुंदर जगणे मिळावे यासाठी सर्वच संघर्षरत असतात. प्रत्येकात काहीतरी वैयक्तिक कमतरता असतेच. ज्याची जाणीव ही प्रत्येकाला असते. तरीही जीवनात आपल्याकडे असलेल्या, देव कृपेने प्राप्त झालेल्या इतर गोष्टींकडे लक्ष दिलं तर कळेल की आयुष्य सुंदर आहे आणि जगणं आपोआप सुंदर होईल.

हे सौंदर्य शारीरिक, ऐहिक किंवा प्रासंगिक नाही. आपण त्याबाबत बोलत आहोत, जे आपल्याला आयुष्याबद्दल समाधान देते, जगण्याची उर्मी देते आणि जीवनाला उत्साहवर्धक प्रेरणा बनविते.

भरभरून जगणारे मित्र, नातेवाईक, शेजारीपाजारी हे आपलं जगणं सुंदर करत असतात. त्यांचा सहवास आयुष्यात जिवंतपणा आणतो. मा. अरुणाताई ढेरे यांची कविता अशाच सखीला सांगते आहे…

“बाहेर उन्हाचा जाळ,
सखी ये ना आत जराशी
ये उतर असे हे भार तुझे,

भिंतीला टेक जराशी
आयुष्य रोजचेच बाई,
कधीमधीच सोसत नाही “

अशा मैत्रिणी जगणं सुसह्य आणि सुंदर करतात. अशी एकच मैत्रिण मिळाली तरी आनंदाची बाग बहरते. बऱ्याचदा आपल्याला काय हवं ? हे जर आपण जाणून घेतलं तर आपण सुंदर जगू शकतो. आपली आवडनावड, इच्छा, आपल्याला कशाची भीती वाटते, कशाची लाज वाटते, कशामुळे असुरक्षितता वाटते, कशाचा गर्व आहे हे आपलं आपणच आकलन केलं तरी बरंच काही समजतं. मग त्यावर उपाययोजना केली की सगळा गुंता सुटतो. (त्यात कधी कोणाची मदत घ्यावी लागली तरीही चालेल) आपल्याला आनंदी आणि सुखद जीवनाची पायवाट दिसू लागते.

कोणालाही न दुखवता आपल्या मनासारखं जगता येणं ही एक कला आहे आणि ती ज्याला साध्य झाली त्याचं जगणं सुंदर होणारच यात काही शंका नाही.

राधा गर्दे

— लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments