Wednesday, September 11, 2024
Homeलेखजीवन म्हणजे काय ? : १

जीवन म्हणजे काय ? : १

जीवन म्हणजे काय? या विषयी प्राप्त झालेले लेख रोज एक प्रमाणे आज पासून आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
– संपादक

रे जीवना…… जरा सांग ना……….!

सतत बदलत जातात जीवनाचे रंग…. स्वतःच्या अनेक छटा दाखवूनही….. कायम असते एक झाक ….सदैव….! आकांक्षांचे उंचच उंच मनोरे…… मनातल्या मनातच करून ठेवलेली स्वप्न शिल्पे……. ध्येयाकडे झेपावलेली पावले….. अनेक जय….. तसेच पराजयही….. कितीही प्रयत्न केला तरीही जीवनाचे गहिरे भाव व्यक्त होतीलच असे नाही….. प्रत्येक जीवन असतं एक स्वतंत्र अस्तित्व लाभलेलं…… एका व्यक्तीचे अंतरंग….. त्याला लाभलेली सुखद क्षणांची सोबत…… दुःखद क्षणांची रडलेली साथ….. पराभवांचे बोचरे सल….. तर कधी विजयाचा उन्माद….. जसं दोन चेहऱ्यांचं सारखे पण नवीन…. तसंच प्रत्येक जीवन नवीन…,. वेगळं….!कदाचित…. पाण्यासारखं…!
पाणी कधी एखाद्या अल्लड युवतीप्रमाणे खळाळतं असतं…, तर कधी…… मौन धारण करून तप आरंभलेल्या महान तपस्व्या सारखं शांत….. कधी एखाद्या जातीवंत योध्याप्रमाणे सर्वस्व झोकून देणारं… कधी तेच असतं…. स्वतःच अस्तित्व गमावून बसलेल्या नदीच्या कोरड्या पात्राप्रमाणे ठणठणीत…. केवळ कोरडे दगड….. शेवाळ्याची साथ घेऊन..,. उन्हामुळे आपलं ‘शेवाळपण ‘ गमावून बसलेला…..!
साकारतं जीवन कधी खळाळत्या निर्झरात …… जणू एखाद्या अल्लड युवतीचं खळाळत हास्य….! त्याचं ते खळखळणं…. कितीतरी वेळ आपल्या कानात….. मधुर नादाचं गुंजारव करीत राहतं….. मरगळ झटकून जाते…. जसा खूप दूरच्या प्रवासाचा वाटसरू.., निसर्गाच्या छायेत विसाव्यासाठी येतो….. आपल्या सौंदर्य आणि मोहुन टाकणारी वनश्री..,.. त्याला सोबत एखाद्या खळाळत्या नागमोडी निर्झराची…. जणू सुंदर युवतीच्या त्या सौंदर्याला कळस ठरलेलं तिचं खळी पाडणारं खळाळतं मोहक हास्य….! विसावतो तो तेथे क्षणकाल…. मागील प्रवासाची मरगळ झटकून… एका नव्या उभारीने…. पूर्वीच्या प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून गेलेला असतो…..! जीवनात दुःखा नंतर आलेले सुखाचे क्षणही…. कडवट भूतकाळाच्या आठवणी…. मागे टाकून मनाला सतत पुढे चालण्यासाठी प्रेरित करीत असतात…. हो ना…?
कधी कधी……. अनेक महाकाय खडकांच्या सानिध्यात….स्वतःच आसन मांडून मोठी तपश्चर्या आरंभलेल्या……महान योग्याच्या रूपात डोकावतं जीवन.,…. शांत…. आत्मलिन….डोह बनून….. हा डोह ही लोकांच्या नजरेतून सुटत नाही…. सगळीकडे वैराण.. ओसाड दिसत असताना…. पाण्यासाठी व्याकुळ होतो एखादा वाटसरू…..! कधी त्याने विचारही केलेला नसतो…… वैराण वातावरणाला……आपल्या अस्तित्वामुळे अधिकच ओसाडपण बहाल करणाऱ्या या खडकांनीही जोपासलाय……..एखादा खोल डोह…… आपल्या मधोमध….!वाटसरू खडका कडे धाव घेतो…. केवळ त्याच्या उंचीवरून….. एखाद्या जलाशयाचा ठाव घेण्याच्या हेतूने….. त्याच खडकाच्या पायथ्याशी…. त्या गहिऱ्या डोहाचं अस्तित्व पाहून….. स्तिमीत होतो…. त्या डोहाला जपणारे खडक मात्र ओसाडच भासतात…… तळाशी जीवनाचा उगम असूनही…..! हे डोह कधीही खळाळते नसतात…. तिथून परतणारा वाटसरू घेऊन जातो सोबत…..एक विचार चक्र न तुटणारं ….! काहीतरी गूढत्वाची जाणीव मनाला स्पर्शून जाते…… खूप काही सामावून ठेवलेलं असतं या डोहाने स्वतःत….,! आपल्या गहिरेपणासोबतच… हिरवं पण ही जपतो हा डोह…,! खरंतर हिरवा रंग चैतन्याचा… पण हे हिरवेपण चैतन्य देऊन जात नाही…. तर उदासीची…. साचलेपणाची छटा मनावर ठेवून जातं….. कारण हे हिरवं पण असतं शेवाळाचं ..,.. याचं रूप इतरांच्या नजरेला गारव्याची अनुभूती तर देत नाहीच..,… पण इतरांच्या नजरेतील गारव्यालाही ते मुकतं….! जीवनाचा खोल अर्थ समजून घेताना.. …. या जीवन डोहाचा गहिरेपणा.. …. आपल्याला स्तब्ध करून जातो ….. हो ना..? जीवनही अगदी तसंच असतं…… नित्यनूतन छटा साकारत……. प्रत्येकाला कळणारं….. तरीही कधीच न वळणारं……….. कित्येकदा ते समजलंय असं भासणारं……… तरीही न उमजणारं…….. एक कोडं……. त्याच्या तळाशी काय काय साचलंय….,. हे त्यात खोलवर शिरल्याशिवाय कळूच शकत नाही…….! भूतकाळाचे सल पोटात दडपूनही…….. अनाहूत भविष्याकडे झेपावण्याची आस सतत उराशी बाळगणारं…….. अतर्क्य…… अनिमिष……. अफाट……. अननुभूत………. सदा आपलंस वाटणारं…….!
कधी साकारतं जीवन धबधब्याच्या स्वरूपात….. तो डोंगर कपारीतून खडतर प्रवास करत येतो….. वाटेला त्याच्या हिरवळ ही येते… कधी कधी…! हा प्रवास चालू असतानाच…. हा धबधबा झोकून देतो…. आपलं सर्वस्व….. एका निश्चित ध्येयाच्या दिशेने…… सुखवून जातात त्याचे तुषार आजूबाजूचा परिसर……. त्याचं हे झोकून देणंही सुखवून जातं कित्येकांना……..!
कधी कधी करपून जातं जीवन….. जगाचे भावना शून्य व्यवहार पाहून……. स्वतः मधलं जीवनच हरवून बसतं….. भर उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या नदीसारखं……! पूर्वी जिकडे पाहून डोळे गारवा अनुभवत होते…. तिकडे डोळ्यांना दिसू लागतं केवळ मृगजळ….. पूर्वी जेथे वारा शीळ घाली प्रत्येक लहरीतून…. जणू पहाटेच्या प्रसन्न प्रहरी कृष्णाच्या बासरीतून नादमुग्ध करणारे मधुर स्वर स्फुरत आहेत…… लक्ष लक्ष गोपींचे चित्त आकर्षुण घेण्यासाठी.. ! पण आज तर मधुर स्वरांचा मागमुसही नाही…. आज तेथे वारा डोकावतो…. पण तो तप्त दुपारी…. पाचोळा स्वतःत गरागरा फिरवत नेणाऱ्या…..आणि त्या काठावरूनच सैरावैरा फिरत जाणारी वावटळ होऊन….! कुठे गेलं ते नदीला पडलेलं…..क्षणकाल गारवा देऊन गेलेलं…..सुख स्वप्न ..?
ठरतं ना…….जीवनही कधीकधी… अनेक सुख स्वप्ने रंगवताना…… स्वतःच एक…दु:स्वप्न..?
कधी कधी साकारतं जीवन एक डबकं ही….. आपलाच हेका कायम ठेवून…. आपली जागा न सोडणारं…., म्हणतात ना वाहतं पाणीच स्वच्छ राहू शकतं…..पण डबक्याला तर वाहते पणाची जाणच नसते…. त्याने ही जपलेला असतो एक ओलावा….. पण चिखलाचं अस्तित्व उभारण्यासाठी….! पण जेव्हा होतात त्या चिखलावर तिरस्करणीय नजरांचे आघात… तेव्हा त्यांच्याही अस्तित्वावर चरे पाडून जातात ते…., म्हणूनच तर….. कुठे कुठे दिसत नसतील ना… मऊ जमिनीला पडलेले तडे….. चिखलाच्या पूर्व अस्तित्वाची जाणीव करून देणारे..,!
या सगळ्या रूपांबरोबरच….. एक अत्यंत व्यापक रूपही आहे……. कधी एखाद्या तपस्व्या प्रमाणे ध्यान मग्न वाटणारं…..लाटां च्या . माध्यमातून अवखळपणे ओसंडून वाहणारं…. दातृत्वाची फार मोठी ताकद सामावून ठेवणारं…. भल्या बुऱ्या सर्वांनाच सारख्याच प्रमाणात सामावून घेणारं…. उदात्त हृदय लाभलेल्या या दात्याच्या हृदयाप्रमाणे त्याचं अस्तित्वही तेवढंच उदात्त असतं…… नजरेचा कण न कण व्यापूनही स्वतः अधिक उरणारं….. नजरेलाही स्वतः सारख्याच एका विशालतेच अद्भुत दर्शन घडवणारं…… उदात्ततेच दान सरसरून देणारं… लाटांच्या अवखळपणाला ओसंडून वाहून जाऊ देत …… काठावरील तृषार्त खडकांना ….. सर्वांगानं न्हाऊ घालणारं…..! जणू ह्याच प्रतीक्षेत तिष्ठत होते ते वर्षानुवर्षे….! त्यांची तुषार्तता मिटवणारे तुषार अंगावर झेलत….. धन्य धन्य होणारे….. उभे असतात काठावर… …. त्यांनी आखून दिलेल्या सीमारेषेत….. कदाचित त्या सीमेपाशी थबकून…… त्यांच्याकडे अनिमीषपणे पाहत……..!
आपणही क्षणकाल थबकून….. साठवावे जीवनाचे रंग….. आपल्या हृदयात…… क्षणाक्षणाला परीक्षा घेणारं…… तरीही हवाहवसं वाटणारं….. जीवन जगावं…. अगदी मनसोक्त….. नेणीवेच्याही पल्याड….. त्याचं अस्तित्व सिद्ध करणार……. कित्येक छटांमध्ये विखुरलेलं ……….. घालावी आर्त साद……… रे जीवना…….. जरा थांब ना…….शब्दांच्याही पलीकडे…….!

— लेखन : सौ. प्रिती प्रविण रोडे. अकोला
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments