Wednesday, September 11, 2024
Homeलेखजीवन म्हणजे काय ? : २

जीवन म्हणजे काय ? : २

“जीवनातील खरा आनंद”

माणसाने जीवनात स्वतःचा आनंद तर उपभोगावाच! परन्तु, स्वतःच्या आनंदासोबत इतरांनाही त्यात सहभागी करुन घ्यावे. त्यापेक्षा इतरांना निस्वार्थीपणे मदत करावी. तसेच, त्या मदतीनंतरचा त्यांच्या चेह-यावरील दिसणारा आनंद हा खरा आनंद असतो. तोच त्यांचा आनंद आपल्याला ख-या अर्थाने समाधान देणारा आनंद असतो. हे इतकं सहज आणि सोपं असताना सध्याच्या या काळातील माणसं मात्र या गोष्टीकडे पुर्णपणे दूर्लक्ष करतात असेच सध्याचे चित्र आहे. तसेच, बहुतांशी माणसं ही दिखाऊ, खोट्या स्वरूपाच्या आनंदाकडे आकर्षित होऊन ते खूप आनंदी असल्याचे दाखवतात. परंतु,तसं पाहिलं तर त्यांचा तो आनंद हा वरवरचा असतो.

पूर्वीच्या काळात म्हणजे, पन्नास वर्षांपूर्वी तेव्हा, ब-याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती होती. तसेच, विभक्त कुटुंब पद्धती सुरु झाल्यानंतरही तेव्हाही, एकेका कुटुंबात आठ दहा सदस्य असायचे. सर्व जण दिवाळी, दसरा आहे सर्व सण आनंदाने, प्रेमाने साजरे करीत असत. तेव्हा, टी.व्ही. नव्हता. त्यामुळे, मुख्यत्वे करुन घरातील मनोरंजनाचे साधन म्हणजे, एकमेव मोठ्या आकारातील रेडिओ होता. त्यावर लागणारे विविध कार्यक्रम, भक्तीगीते, भावगीते, प्रवचने, किर्तने हेच सर्व लोकांचे मनोरंजनाचे अत्यंत आवडते माध्यम होते. साधन होते. नंतर फार थोड्या लोकांकडे रेकाॅर्ड प्लेअर, टेपरेकाॅर्डर आले.

कुटुंबातील भाऊबहीण सामंजस्याने त्या मनोरंजनाच्या साधनांद्वारे मनमुराद आनंद घेत असत़. मोठी बहीण किंवा भावाला कधी कधी स्वतःच्या मनाला मुरड घालावी लागत असे. दूस-यांना त्यांच्या मनासारखे कार्यक्रम ऐकू द्यावे लागत असे. त्यामुळे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसे. तसेच, कौटुंबिक वातावरणही शांत, आनंदी असे. तसेच, कुटुंबातील माणसेही एकमेकांना स्वार्थाविना सर्व प्रकारची भरपूर मदत करीत असत. तेव्हा, त्यांच्या‌ मनातील, चेह-यावरील आनंद हा खरा आनंद असतो. तोच आनंद खरं आत्मिक समाधान देणारा असतो. हे दिसून येत असे. पण, सध्याच्या काळातील परिस्थिती आणि लोकांचे स्वभाव खूपच बदललेले आहेत. सध्या स्वार्थीपणा हा बहुतेकांचा प्रमुख गुण झाला आहे. खरा आनंद कसा असतो ! आणि तो कशात असतो ! हे माणसाने अनुभवल्याशिवाय आणि ते उमगल्याशिवाय त्याला ख-या आनंदाचं महत्व आणि त्यापासून मिळणारे समाधान! याची तृप्तता त्यांना अनुभवता येणार नाही. यासाठी, माणसांनी कोणत्याही गोष्टीचा, वस्तूंचा अतिहव्यास सोडला पाहिजे. तरच, त्या माणसांना जीवनात समाधान मिळू शकेल. माणसाला जीवन जगण्यासाठी पैसा तर हवा असतोचं. पण, दिवसरात्र फक्त पैशांचाच विचार करीत, अमाप पैसे मिळविण्याचे मार्ग शोधणे आणि गडगंज इस्टेट मिळवित राहणे एवढंच फक्त माणसाचं जीवन नाही.

निसर्गात फिरत राहणे, निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत राहणे. निसर्गातील फुलांच्या दरवळलेल्या सुगंधाचा मनमुराद सुवास घेत आनंद उपभोगणे तसेच, विविध फळवृक्षांच्या मधुर फळांचा आस्वाद घेणे. त्यात आपल्यासोबत इतरांनाही सहभागी करुन घेणे.यासारखे दूसरे सुखसमाधान नाही. मित्रमंडळींसोबत हास्यविनोद करीत मनसोक्त गप्पा मारणे. धार्मिक, साहित्यिक कथा, लेख, कविता व कादंबरी, तसेच, सांस्कृतिक, सामाजिक विषय, पर्यटनस्थळे व निसर्गरम्यजश ठिकाणे यावर चर्चा करणे,भाष्य करणे यासारखा मुल्यवान दूसरा आनंद नाही. हे उपभोगण्यास मिळायला सुध्दा नशीब लागते.

गडगंज इस्टेट, संपत्ती, सोने, दागदागिने अमाप धनदौलत यातच आयुष्यभर रमणा-या माणसांना हे सुखसमाधान लाभत नाही. कारण, ते नाशवंत सुखाच्या पाठीमागे लागलेले असतात. पैशांचा, सोन्याचा व संपत्तीचा मोह नसणा-यांनाच हे अक्षयसुख लाभत असतं. कायमस्वरूपी आनंद हा गरजवंतांना तनमनधनाने मदत करण्यानेच मिळतो. पण, सध्या माणसं तात्कालिक आनंदाच्या मोहातच स्वतःला धन्य समजत आहेत. स्वतःला उच्चभ्रू समजणारी, श्रीमंतीची प्रतिष्ठा जपणारी माणसं स्वतःला माणूस म्हणवून घेणारी अशी ही माणसं मोठमोठ्या मेजवान्या (पार्ट्या) करीत असतात. आणि पर्यटनावरही लाखों रुपये खर्च करीत असतात आणि सोकाॅल्ड तात्कालिक आनंद उपभोगत असतात. पण, अशी माणसं अनाथ आश्रमांना, मूकबधीर विद्यालयांना किंवा वृध्दाश्रमांना कधीही देणगी देत नाहीत.

त्यातून मिळणा-या आनंदास ते वंचित होतात. फार थोडी माणसं अशी आहेत की, जी अशा प्रकारचा उत्कृष्ट आनंद उपभोगत असतात. त्यातील काही माणसं गरीब, मध्यमवर्गीय सुध्दा असतात. निसर्गसौंदर्य पाहण्यातही मनमुराद, मनसोक्त असा आनंद मिळतो. निसर्गसौंदर्य रसपान आणि विविधरंगी पक्षी निरीक्षण करणे यांतून मिळणारं समाधान अवीटगोडीचं आहे.

अवर्णनीय,अवीट गोडीचा सदोदीत टिकणारा असा अजून एक आनंद! म्हणजे आषाढी एकादशी निमित्ताने निघणारी आषाढीची “पंढरीची वारी” हा आहे. वारीमध्ये तरुण वारकरी, वृध्द वारकरी, वृध्द वारकरी बायका, वृध्द पुरुष वारकरी सर्वजण पायी चालत अडीचशे, तीनशे कि.मी.ची वारी करीत असतात. श्रीविठ्ठलदेव आणि भक्त यांच्यातील अंत:करण भक्तीचा हा महिमा आहे.
शेवटी काय ! तर स्वतः आनंदी राहून इतरांना त्रास न देता आनंद देत राहणे हाच जीवनातील खरा आनंद आहे !

— लेखन : मधुकर निलेगावकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments