Monday, September 9, 2024
Homeलेखजीवन म्हणजे काय ? : ७

जीवन म्हणजे काय ? : ७

जीवन म्हणजे काय ? या विषयी आपण विचार, अनुभव, मनोगते मागवली होती. एकूण ७ जणांनी या विषयावर लेखन केले.आजचा सातवा व अंतिम भाग. सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार.
– संपादक

“जीवनात ही घडी अशीच राहू दे…” असं मनापासून वाटतं.
तेव्हाच “जिंदगी का सफर है ये कैसा सफर.. कोई समझा नहीं कोई जाना नहीं….”

जीवन.. हा साधा सोपा सरळ शब्द. खरेतर, जीवनाची सरळ व्याख्या करायची म्हटली तर “जन्म ते मरण यातील आयुष्य म्हणजे जीवन…” असं आपण सामान्यपणे म्हणू शकतो.
जीवनावर खूप विचारवंतांनी, साहित्यिकांनी, आपल्या संतांनी, धर्मग्रंथात ही विस्तृतपणे लिहिलेले आहे. अनेक भाषेतही आहे‌.ज्यांची जशी बौध्दिक कुवत, ज्ञानार्जन आहे तसे ते वाचून अभ्यासून समजून घेतात. वाचाल तेवढी ज्ञानगंगा आपली जिज्ञासा पूर्ण करायला खळखळत आहे.

मी एक सर्व सामान्य, जेष्ठ गृहिणी आहे, मला जीवन जसं कळलं तसंच मी ते लिहायचा प्रयत्न करत आहे. शब्दांची, वाचनाची, स्वरांची आवड, संयुक्त कुटुंबात वाढलेली, नांदलेली व संवेदनशील मनाच्या अनुभव निरिक्षणातूनच जीवनदर्शन आपोआप घडत जाते तसं हा एक प्रयत्न. संस्कारांचा आपल्या जीवनात फार मोलाचा वाटा आहे, त्याचप्रमाणे आपली बुद्धी ते स्वीकारण्यास अनुकुल हवी. सत्शील कुटुंबात घरातील लहान थोर व्यक्तींचं आचरण, भोवताल व आपले मित्र मैत्रिणी हे सुसंस्कृत व सुसंस्काराला कारणीभूत असतात. हे सांगायचं कारण, जीवनच त्यावर अवलंबून असतं. मनाची जडणघडण, स्वीकार नकार, सकारात्मक, नकारात्मक सगळं वैचारिक पातळीवरच निर्णय घेतले जातात. उन्हासोबत सावली, सुखासोबत दु:ख, रात्री नंतर दिवस… ठरलेलाच. बालपणापासून ते अनुभव आपण घेतो पण तेव्हा घरातील मोठी माणसं ती झळ लागू देत नाहीत. जसं जसं मोठे होतो तसं तसं जीवन वाटतं तितकं सहज सोपं नाही हे कळू लागतं..

पूर्वीच्या पिढीत अनेक बहीण भावंडं, हुषारी असूनही ते हवे ते शिक्षण घेऊ शकले नाही. मुलींना तर शिक्षण स्वप्नवतच. तिच्या इच्छेला प्राधान्य नसे. पण हे जीवन स्विकारण्याचा सकारात्मक दृष्टिकोन सगळे नक्कीच बाळगत. परिस्थीती समजून घेत‌. कुटुंबातील अडचणी, समजून घेत सामंजस्याने वाट्याला आले ते जीवन आनंदाने स्वीकारत.
पण आज ते वातावरण नाही, प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा, पराकाष्ठेचे प्रयत्न करूनही जीवनात यश हुलकावणी देतं आणि व्यक्ती हतबल होते. निराशेच्या गर्तेत जात आत्महत्येसही‌ प्रवृत्त होते. हे कटु वास्तव आहे समाजातील. फुलोंके रास्तें म्हणत चालावं तर काटे खुपू लागतात, सपनोंके रंगीन महल बघता बघता वास्तव जीवनात धडाधड कोसळतात.

काही जवळच्या घटना…
उच्चशिक्षित इंजिनिअर तरुणाला मोठ्या कंपनीतील नोकरी सोडून घरी यावं लागतं, वडील आजारी, चाळिशीतील भावाचं अकस्मात निधन .. नूतन परिणीत वधूचं जीवनच अख्खं बदलतं…. अपघातात आईवडिल जातात, एक मुलगा एकीकडे मुलगी दुसरीकडे अशी विभागून जबाबदारी घेतली जाते.

सुखी सोन्यासारखी मुलं, हसरं, प्रसन्न आनंदी कुटुंब अकालीच कुटुंब प्रमुखाला ह्रदयविकाराच्या झटका आल्याने क्षणात दु:खाच्या गर्तेत कोसळते…. ही काही भोवतालची उदाहरणे….. सगळ्याच तर्हेची असुरक्षितता मनाला ग्रासते….पण जीवन थांबत नसतं… मार्ग काढत पुढे जायचं असतं. जबाबदारी पूर्ण करायच्या असतात. नव्याने कंबर कसून जीवनाला सामोरे जावे लागते.

काही नशीबवान असतात ज्यांना जीवनात सतत सौख्यच मिळतं.. पण असं कमीच. जीवन हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेले वस्रच. जीवन हे कधीच माघारी वळत नाही. गेलेला प्रत्येक क्षण केवळ आठवणीतच उरतो.
जीवनात संयम, उदारता, धीरोदात्तपणा राखणे प्रत्येकाला आवश्यक आहे. कुठल्याही आकस्मिक घटनेवर तीव्र दुःख, क्रोध, निराशा टाळून शांतपणे, संयमाने विचारपूर्वक वागायला हवे.
बघता बघता मुठीतून आयुष्य सरसर गळत असतं. जे प्रयत्ना पलिकडचं, हातातच नाही त्याचं विचार न करता आहे ते जीवन प्राप्त परिस्थितीत सुखी आनंदी करावं. पैसा, संपत्ती आज आहे तर उद्या नाही, स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा, समाजात सत्कार्य करून नाव मिळवावं… जीवन एकदाच मिळते ही चिरंतन जाणीव ठेवली तर जीवनातील क्लेशदायक घटना विसरून सकारात्मक घटनांनी मन समृध्द ठेवता येईल.

झाल्या गोष्टींचा, चुकांचा स्वीकार करत आहे ते उर्वरित आयुष्य अधिक सुंदर, पारदर्शी, समाधानी करता येईल. जीवन प्रवाही आहे, त्या प्रवाहात आपण निर्मळ मनाने विहार करावा, कलेची साधना करत अंतीम क्षणापर्यंत तनमनाला आरोग्यदायी ठेवत जीवनवाट सहजतेने चालता येते….!!

अरुणा दुद्दलवार

— लेखन : अरुणा दुद्दलवार. दिग्रस, जिल्हा -यवतमाळ
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments