ये जीवन है, इस जीवन का यही है यही है रंग रूप, थोडे गम है थोडी खुशियां यही है यही है छांव धूप………., ऊन पावसाचा खेळ म्हणजे जीवन. ऊन सावल्यांचा खेळ म्हणजे जीवन. मुसळधार कोसळणारा पाऊस म्हणजे जीवन अन रिमझिम झरणाऱ्या श्रावणधारा म्हणजे जीवन. रणरणत्या उन्हातली तीव्र काहिली म्हणजे जीवन अन शरद ऋतुतला हवाहवासा थंड थंड गारवा म्हणजे जीवन. पाच सात मुलांचा बाप की एकही संतान नसणारा बाप म्हणजे जीवन? मान्यवर शेषन – श्रीधरन यांच्या सारखे उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान होणे की अशिक्षित राहून वीटभट्टीवर घाम गाळणे म्हणजे जीवन ? श्रीमंताच्या घरची पंचपक्वांनांची मेजवानी की एकवेळच्या जेवणाची भ्रांत छळणारे संकट आसमानी, म्हणजे जीवन ?
जीवन समजणे, उमगणे, प्रत्यक्ष जगणे खरंच तसं कठीण आहे. ठेवीले अनंते तैसेचि रहावे की त्या अनंतामध्ये काही भला, सुकर मार्ग शोधून जीवन अधिक आनंदी बनवणे हे खरं तर व्यक्तिसापेक्ष आहे. हे असं सारं जेंव्हा डोळ्यासमोर येत ना तेंव्हा प्रश्न पडतो जीवन म्हणजे काय रे भाऊ ? अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कळणं म्हणजे जीवन, मला आठवेना तुला आठवेना कशी रात्र गेली कुणाला कळेना हे न कळणं म्हणजे जीवन. हिरव्या रंगाचा छंद राया पुरवा मला हिरव्या पालखीत मिरवा, असं हिरव्या पाचूचं लेणं ल्यालेले क्षण मिरवण्याची इच्छा असणं म्हणजे जीवन.निलाजरेपण कटीस नेसूनी निसुगपणाचा शेला असा निर्लज्जपणाचा कळस म्हणजे जीवन ? घडा घेऊन शिरी घाट चढलीस कशी, आडवाटेवरी आज अडलीस कशी असं अचानक वाटेवरती अडणं म्हणजे जीवन का ? उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, आकाश तारकांचे उचलून रात्र गेली असं अनुभवयास येणं म्हणजे जीवन, की मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले म्हणजे जीवन ?
प्रियाविन उदास वाटे रात, रिमझिम झरणाऱ्या श्रावणधारांमध्ये अशी उदास वाटणारी रात्र म्हणजे जीवन ! चांदण्या रात्रीतले ते स्वप्नं तू विसरून जा मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा, प्रेमाचे स्वप्नं अधुरे राहिले अन हाती प्रेमाची निशाणी येणं म्हणजे जीवन का ? की हवे ते मिळाले अशा रम्य काली नवी रूप राणी नवा साज ल्याली ….. स्वप्नांची पुर्तता होणं म्हणजे जीवन! झोपाळ्यावाचून झुलायचे असे सहज फुलून येणारे दिवस म्हणजे जीवन, तुझी मूर्त माझ्या उरी राहते, जरी आंधळी मी तुला पाहते, आंधळी असून सुद्धा डोळस प्रेम करणं म्हणजे जीवन का ? जन्मभराच्या श्वासाइतुके मोजियले हरी नाम असा जन्मभर जप करणे म्हणजे जीवन की झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा…… हा दुबळेपणा झटकून जगणं म्हणजे जीवन? एकाने दुसऱ्यास गिळावे हीच जगाची परंपरा तू जपून टाक पाऊल जरा, जीवो जिवस्य जीवनम् अशा अतर्क असणाऱ्या अनेक गोष्टी म्हणजे वास्तवातले जीवन.
माणसा माणसातलं माणुसपण हरवत चाललेलं असताना “माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे” अशी मनोभावे भावपूर्ण प्रार्थना करणे म्हणजे माणुसकीचे दर्शन घडवणारे जीवनच जणुं. “कर्मण्ये वाधिका रास्ते मा फलेषु कदाचनम्” कोणत्याही फळाची काही अपेक्षा न धरता जगणे म्हणजे जीवन. अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम, सब को सन्मती दे भगवान, अशी सर्व धर्म समभाव प्रार्थना करणं म्हणजे जीवन. जग लवकरच पाण्याखाली बुडणार आहे त्याची काळजी घेऊन निसर्ग जपणं म्हणजे जीवन. प्रेमप्रकरणातून कित्येक खून होत असतात ते कसे टाळता येतील हे उमगणे म्हणजे जीवन. चौऱ्यांशी लक्ष योनीतून एकदाच मिळालेला मानवाचा जन्म, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे खुल्या दिलाने स्विकारणे म्हणजेच …….. जीवन.
ये जीवन है इस जीवन का यही है यही है रंग रूप, थोडे गम है थोडी खुशियां यही है यही है छांव धूप…….. म्हणजेच जीवन. पिंपळपानांची झुळूक अन वाचकांच्या भेटीला जाण्याची सप्तरंगी वाटचाल पापणपंखीतून व्यक्त करणे म्हणजे जीवन, हे वास्तव मी अनुभवत आहे यालाच ‘जीवन ऐसे नांव’ म्हणावे अन कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हा विचार मनांत न आणता जीवनात ही घडी अशीच राहू दे असा सकारात्मक विचार करून छान आनंदाने जीवन जगत रहावे, तेच खरे जीवन.

— लेखन : सुनील चिटणीस.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800