आम्ही शेतावर राहायला गेलो होतो. पप्पांनी गावापासून दूरवर डोंगराळ, आदिवासींच्या जवळ शेती विकत घेतली होती. त्याचे कारण होते त्या गावातील आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर करून त्यांचे प्रश्न सोडवले होते. त्यांनीच पप्पांना सांगितले की जोशी जागा विकत आहेत तुच ती घे. मग जोशींना फार मोठ्या भांडणातून सोडवल्यामुळे त्यांनी सांगातले की भाई तू थोडेथोडे पैसे दे. पप्पांनी ते मान्य केले.
गाव गच्च जंगलाचे होते. जंगल तोडून शेत करायचे होते.काम सुरू होते. लाकडी फळ्यांचे घर बांधून तयार झाले. आम्ही दोन वर्षांनी राहायला गेलो. आमची शाळा तीन कि.मी.वर होती. रोज चालत जावे लागे.
आता शाळा ते घर सुरु झाले. तिन्हीसांजेला हातपाय धूऊन, प्रार्थना, अभ्यास सुरु होत असे. आई, आजी जेवणाच्या गडबडीत असत. आम्ही एका कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत असू. तव्यावर भाकरीचा खमंग सुवास दरवळत असे. आई कधी जेवायला हाक मारते असं वाटे. आईने हाक दिली की भरधाव वेगाने पुस्तके दफ्तरात जात असत. मग सर्वांचे पाट, पाणी, ताट ठेऊन सर्व एकत्र बसत. जेवणे आटोपल्यावर सर्वांच्या गाद्या सज्ज होत असत. थोडावेळ अंगणात शतपावली, नंतर पप्पांची गोष्ट ऐकत बसत असू. रात्रपाळीचा काका शेकोटी पेटऊन बसत असे. कधी तोपण गोष्टी सांगत असे.
एक दिवस काका दुसर्या गावात गेला. आम्ही लवकरच झोपलो होतो. तितक्यात गोठ्यातली जनावरे आवाज करू लागली, सुटण्याची झटापट करू लागली.पप्पा म्हणाले जवळपास वाघ आला आहे. इतक्यात बिबळ्या आमच्या ओटीवरील खंड्या कुत्र्याबरोबर झटापट करत होता. दोघेही एकमेकावर उड्या मारत होते. पप्पा आजीला म्हणाले, “मी बंदुक घेऊन बाहेर जातो”. आजी रागावली व म्हणाली, “जाऊ नकोस. तो ऊलटा फिरून घरात येईल”. पप्पा थांबले. पण थोडा अंदाज घेऊन मला म्हणाले, “चल टाॅर्च दाखव. वाघ खंड्याला घेऊन पुढे निघाला आहे. आम्ही जातो. आजी हो म्हणाली व तिने दरवाजा बंद केला.
आम्ही घराच्या मागे निघालो. पप्पांनी अंदाज घेत गुडघ्या खालच्या लेव्हलवर गोळी मारली. बहुतेक त्या आवाजाने वाघाने कुत्र्याला सोडले होते. तो पर्यंत गावातले आदिवासी काठ्या घेऊन धाऊन आले. सर्व जण फार दूर पर्यंत चालत असताना खंड्याचा विव्हण्याचा आवाज आला. आता माझ्या हातातली टाॅर्च लाडक्या काकाने घेतली होती. तो पुढे आम्ही मागे. आम्ही खंड्याजवळ गेलो तो विव्हळत होता. त्याचा कान बिबळ्याने नेला होता. अंगावर त्याच्या नखांच्या ओरखड्यातून रक्त येत होते.मी रडायला लागले. त्याला थोपटले.पप्पांनीपण त्याला थोपटले. तो हात चाटू लागला. शरदने खंड्याला उचलून घेतले. आम्ही घरी आलो. आईने बाहेरच्या चुलीवरील गरम पाणी व डेटाॅल बालदीमधे टाकून दिले. पप्पांनी खंड्याच्या जखमा धुऊन पुसून पावडर लावली. माझी सर्व भावंडे खंड्याभोवती बसून रडर होती. आजी म्हणाली, “रडू नका रे। आपला खंड्या चांगला होईल.”
त्या दिवशी खंड्याला घरातच ठेवले. गावकर्यासाठी आजीने काळा चहा दिला. ते घेऊन निघून गेले. आम्ही सर्व जण दुःखातच झोपलो. सकाळी प्रत्येकजण खंड्याचे लाड करून ब्रश करायला जात होते. पप्पानी खंड्याला दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्याला बैलगाडीने लाडक्या काकाने नेले.
त्याला ड्रेसींग करून दुपारी आणले. आईने त्याला चिकन, भात खायला दिले.पण त्याने जरासेच खाल्ले. पप्पांनी त्याच्या भातात औषध टाकले होते. आम्ही खंड्याला आज पण आमच्या गादीजवळ झोपवा असे पप्पांना सांगितले. आजी म्हणाली अरे । तो रात्रभर रडेल. कोणाला झोपून देणार नाही”. पप्पा म्हणाले, “अगं, त्याला औषधाची गुंगी येईल”. आम्ही त्याला थोपटून झोपलो.
सकाळी खंड्या उभा राहीला नाही. त्याने दूधपण प्यायले नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मधेच तो रडत असे.
पप्पा म्हणाले, “खंड्याला बिबळ्याचे विष चढले आहे तो काही जगणार नाही”. आम्हाला रडायला आले. आजी म्हणाली नाही रे मुलांनों । तो बरा होईल. तुम्ही देवाला सांगा. आम्ही सर्वांनी देवासमोर हात जोडून सांगितले, “देवा, आमच्या खंड्याला लवकर बरे कर।”
पाच दिवसाने खंड्या मेला. आम्ही शाळेतून येऊन त्याच्या जवळ गेलो. पप्पा म्हणाले, “मुलांनो ! आपला खंड्या दुपारीच गेला. आता लाडक्या काका त्याला घेऊन जाईल. आम्ही त्याच्या भोवती बसून जोराजोरात रडत होतो. पप्पा, आजी, आई सर्वजण म्हणत होते मुलांनो तो आपल्या वाडीतच आहे.
आम्ही सर्वजण वाडीत गेलो. काकानी त्याला खड्यात ठेवले. हळद, कुंकू, तांदूळ, फुले वाहिली. आम्ही रडत रडत फुले टाकत होतो. थोड्या वेळाने आमच्या रडण्याचा आवाज वाढू लागला. सर्व क्रिया झाल्यावर आम्ही घरी आलो. संध्याकाळी प्रार्थना करतानापण रडत होतो. कोणीच जेवायला तयार नाही. पप्पा जेवणासाठी आमची वाट बघत होते. आम्ही रडतच होतो. मग ते रागावले व ओरडून म्हणाले”, कारट्यांनो ! तुमचा बाप मेला नाही ! जेवा भराभर नाही तर मार खाल। मग आम्ही हळू रडू लागलो. आमचा श्वास गुदमरत होता. तरी रडत होतो. आजी ने आम्हा सर्वांना थोपटऊन झोपवले।vआम्ही हळूहळू झोपेच्या आहारी गेलो.स्वप्नात खंड्या नेहमी सारखा बस स्टाॅपवर आला होता. मला चाटून दफ्तर घेऊन आम्ही घरी चालत होतो…. तो पर्यंत आजी उठवत होती. मी खंड्याच्या रिकाम्या जागेकडे बघत होते.
— लेखन : अंजली सामंत. डहाणू
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800