१५० कोटी लोकसंख्या असलेला आपल्या देशात १० टक्के म्हणजे जवळपास १५ कोटी नागरिक, हे जेष्ठ नागरिक आहेत. अशा या नागरिकांना समाजाने, कुटुंबीयांनी अडचण न समजता शक्ती समजून त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवांचा, विचारांचा तरुण पिढीला आणि पर्यायाने देशाला कसा फायदा होईल, याचा विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन निवृत माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी केले. ते अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघाच्या चोविसाव्या वर्धापन दिनानिमित्त नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
श्री भुजबळ पुढे म्हणाले की, बदलत्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, भावनिक कारणांमुळे देशातील वृद्धाश्रमांची संख्या वाढतच चालली आहे, हे कोणे एकेकाळी संयुक्त कुटुंब पद्धती असलेल्या आपल्या देशाला भूषणावह नाही. नको त्या बाबतीत आपण पाश्चात्यांचे अंधानुकरण न करता आपला इतिहास, परंपरा, कुटुंब पद्धती, नाते संबंध यांचे महत्व आणि त्यांची प्रत्यक्ष जीवनातील उपयोगिता ओळखल्यास आज समाजात वाढत चाललेले घटस्फोट, मानसिक – शारीरिक अनारोग्य, ताण तणाव, बदलत्या कुटुंब व्यवस्थेमुळे केवळ वृद्धांचीच नव्हे तर बालकांची होणारी हेळसांड अशा कितीतरी गोष्टींना निश्चितच आळा बसू शकेल. सरकारच्या जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना, सोयी सुविधा, सवलती जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघ करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून देशातील सर्व जेष्ठ नागरिक संघाचे, त्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांचे संघटन वाढले पाहिजे, अशी अपेक्षा ही श्री भुजबळ यांनी व्यक्त करून या संघाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब टेकाळे यांनी महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक संघ आणि अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघाच्या वाटचालीचा आढावा सादर करून त्यांची कामगिरी, वाटचाल, भावी उपक्रमांची माहिती दिली. जेष्ठ नागरिकांनी आयुष्यात आनंदी राहून इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
नेरूळ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री डी एन चापके यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की, १९७० च्या दशकात जेष्ठ नागरिकांसाठी संघटना स्थापन करण्याची गरज जगभर भासू लागली. म्हणून १९८२ साली युनो ने प्रत्येक देशाने आपले जेष्ठ नागरिकांसाठी धोरण असावे, असे आवाहन केले. परंतु भारतात असे धोरण १७ वर्षांनी जाहीर झाले. २००१ साली डॉ किंजवडेकर यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकार कडे विविध मागण्या सादर केल्या. परंतु राष्ट्रीय स्तरावर असा संघच नसल्याने ७ राज्यातील लोकांनी एकत्र येऊन २००१ साली अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघाची स्थापना केली गेली. या संघाच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने २००७ साली पहिल्यांदा जेष्ठ नागरिकांसाठी धोरण जाहीर करून जेष्ठ नागरिक कायदा लागू केला. पण या कायद्यात सुधारणा करावयाचे विधेयक संसदेत अनेक वर्षे तसेच पडून असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदा जेष्ठ नागरिकांसाठी रेल्वे भाड्यात ३० टक्के सवलत चालू केली. पुढे वाढून ती आता ५० टक्के इतकी झाली आहे. वरिष्ठ नागरिक संघाचे पहिले अधिवेशन २००३ साली मुंबईत झाले. तर पुढील अधिवेशने २००७ जयपूर, २००८ दिल्ली अशी होत आली असून आता या संघाची सदस्य संख्या ३० लाख झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सुंदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री प्रभाकर गुमास्ते यांनी केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
भुजबळ सर म्हणतात ते खरं आहे.देशातील १०%असलेले ज्येष्ठ नागरिक हे देशाचे भूषण आहेत.
खूप छान मनोगत व्यक्त केले आहे.