होतो आपण देवानंद तेव्हा, कुणी राजेश खन्ना
पिकले आता केस आपुले, कलपच आधार झाला
दाता जागी कवळी आली चावण्याचा हो वांदा
तरीही मजेत जगतो आपण झुलतो आयुष्याचा झुला!
काही सरले काही हरले क्षण काही निसटले
जे करायचे राहून गेले खंत मनास छळते
असेच असते आयुष्याचे गणितच आगळे वेगळे
वजाबाकी अधिक गुणीले आता नको उगाळणे!
कुणी बांधली गाठ रेशमी कुणा हाती पिंपळपान
आयुष्याचा लेखाजोखा विसरून जावे भान
जीर्ण असे जे मनांत काही आठवते स्मरणात
अल्लड होते दिवस आपुले, उरात नाही जान !
सेलिंग इन सेम बोट, जणु वाटा बदललेल्या
आयुष्याचा मुक्काम आता, मार्ग हरवलेल्या
जुनेच धागे जुन्या रजईचे, तरीही उबेजलेल्या
उबेत सारी माया दडली पापणपंखी ओघळलेल्या!
नाही नूतन नाही हेलन काळ जुना संपला
नवतारुण्याच्या तारकांमधे, आता राम नाही उरला
म्हणूनच वाटते जुन्या स्मृतींना द्यावा हो उजाळा
आठवात त्या रमता आपण, झुलतो आयुष्याचा झुला !
— रचना : सुनील चिटणीस. खेड – रत्नागिरी
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800