पैसे वाचवणारा ससा…
“पैसे वाचवणारा ससा” हे वाचून कुतूहल वाटलं ना ? वाटणारच. कारण खरोखरच हा ससा पैसे वाचवणारा आहे. मुलांचा आवडता ससुल्या तयार केल्यास बच्चे लोक खुश तर होतीलच शिवाय त्यात पैसे टाकल्यामुळे बचतीची सवय पण नकळतच लागेल.तुम्हाला,तुमच्या मुलांना अगदी सहज जमण्यासारखा हा ससा आहे.
सुरूवातीला एका पुठ्ठ्यावर पांढरा कागद किंवा कापड फेव्हीकॉलने चिकटून घ्यावे. त्यावर सशाचे एखादे सुंदर आकर्षक उभे चित्र काढून घ्यावे. त्या आकाराने तो पुठ्ठा कापावा. चेहरा, पाय, शेपटी इत्यादी पांढरा रंग तसाच ठेवून बाकी मस्त रंगात रंगवावे. त्याच्या तोंडाच्या ठिकाणी ब्लेडने कापून चिल्लर पैसे, नोटा जाण्याएवढी पोकळी तयार करावी. त्यातून हे पैसे आत टाकता येतील.
आता हे चित्र एक लांबट चौकोनी ठोकळ्यावर पक्के करावे. नंतर त्याच्या मागील बाजूस त्याच ठोकळ्यावर एक गोल उभट आकाराचा डब्बा (पावडरचा डब्बा ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे सशाच्या उंची एवढा असावा) चिकटवून पक्का करावा. त्यालाही सशाच्या तोंडाच्या आकाराने कापून घ्यावे की सशाच्या तोंडातून टाकलेले पैसे त्या डब्यात पडतील. तो डब्बा देखील सुंदर चित्र चिकटवून आकर्षक बनवावा.
आता हा पैसे वाचवणारा ससा अर्थातच मिनीबॅंक पूर्णपणे तयार होईल. डब्बा संपूर्ण बंद असल्यामुळे मुलांना एकदा टाकलेले पैसे परत काढता येणार नाहीत आणि पैसे आपोआपच जमा होतील. पैसे वाचवणाऱ्या सशाचे बच्चे मंडळींना नक्कीच आकर्षण वाटेल आणि त्यात ते आवडीने पैसे टाकतील.असा हा पैसे वाचवणारा ससा आवडल्यास कॉमेंट्स करायला विसरू नका !
— लेखन : अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
व्वा सुंदर ससा….मुलांनो चला लवकर बनवायला बसा
बचत शिकवणारा ससा आवडला.
सुंदर ससा बचत करणारा